मुद्दा – मृत्युपत्राची आवश्यकता व उपयुक्तता

>> दिलीप प्रभाकर गडकरी

मृत्यू ही कल्पना प्रत्येकाला दुःखदायी वाटली तरी मृत्यू हीच जीवनातील एकमेव निश्चित घटना आहे. जीवनात अन्य कोणतीही गोष्ट घडेल किंवा घडणार नाही, पण मृत्यू मात्र निश्चित येणार यात शंकाच नाही. भारतात पहिले मृत्युपत्र इ.स.1758 साली केले असल्याची नोंद असली तरी नंतरच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत असल्याने एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्या व्यक्तीची स्वतंत्र मिळकत नसल्यामुळे कुटुंबप्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली संपत्तीचे वाटप होत असे. कालांतराने विभक्त कुटुंब पद्धत सुरू झाली व पैसा हाच परमेश्वर मानण्यामुळे संपत्तीबाबत वादविवाद सुरू झाले. त्यामुळे मृत्युपत्राची आवश्यकता वाटू लागली.

मृत्युपत्र म्हणजे आपल्या निधनानंतर आपल्या मिळकतीचे वाटप कसे व्हावे, यासंबंधी मृताने व्यक्त केलेली इच्छा. कायदेशीर भाषेत ‘मृत्युपत्र म्हणजे ते करणाऱया व्यक्तीने आपल्या मिळकतीची व्यवस्था आपल्या मृत्यूनंतर कशी व्हावी यासंबंधीच्या इच्छेबाबत कायदेशीररीत्या केलेली उद्घोषणा’.

सध्या मी, माझी बायको व माझी मुलं इतके छोटे कुटुंब राहिले आहे. अनेकांना आईवडिलांच्या जबाबदाऱया नको असतात. त्यामुळे संपतीबाबत वादविवाद होतात. काही वेळा एखाद्या कुटुंबात तीन मुलं असतात. त्यापैकी एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी अथवा आजारपणासाठी जास्त खर्च केला जातो व त्यामुळे त्याची आर्थिक प्रगती खूप होते. अशा वेळेस आईवडिलांना असे वाटत असते की, आपल्या निधनानंतर ज्या मुलाच्या शिक्षणावर जास्त खर्च न झाल्याने त्या मुलाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्याला आपल्या निधनानंतर मिळकतीतील जास्त हिस्सा मिळावा.

अशा वेळेस मृत्युपत्र लिहिले असेल व त्यात तसा उल्लेख केला असेल तरच त्यांच्या मनासारखे वाटप होते, अन्यथा कायद्याने अपत्यांना सारखे वाटप होते. गृहकलह टळावेत आणि कोर्टकचेऱया होऊ नयेत व आपल्या इच्छेप्रमाणेच आपली मालमत्ता आपल्या मृत्यूनंतर वाटली जाऊ शकते. त्यामुळे आपल्या पत्नीला कोणाच्याही मेहेरबानीवर अवलंबून रहावे लागणार नाही. ती सन्मानाने जगू शकेल अन्यथा तिला वृद्धाश्रमातसुद्धा रहावे लागेल.

मृत्युपत्र कायदेशीर करण्यासाठी अनेक बाबींची पूर्तता केलेली असणे आवश्यक आहे. ते स्टॅम्पपेपरवर करण्याची सक्ती नसली तरी सुरक्षित राहील आणि वारसांना वेळेवर मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. मृत्युपत्राची भाषा सुस्पष्ट असावी. यासंदर्भात अरुण गोडबोले यांचे 172 पानी पुस्तक जरूर वाचावे. 160 रुपये किंमत असलेल्या पुस्तकात मृत्युपत्र कसे लिहावे याबाबत योग्य मार्गदर्शन केले आहे. ज्यांना मृत्युपत्र करायचे असेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे.