प्रयोगानुभव – गोष्ट संयुक्त मानापमानाची इतिहासाच्या सोनेरी पानाची

>> पराग खोत

इतिहासातील एक सोनेरी पान उलगडत एका प्रमुख घटनेची चित्तचक्षू चमत्कारिक गोष्ट सांगणारे नाटक ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’. संगीत नाटकांच्या आठवणी जाग्या करण्याबरोबरच इतिहासाचे दस्तऐवजीकरण करणारा हा नाट्यप्रयोग अविस्मरणीय असा आहे.

जुन्या संगीत नाटकांचे नव्या आणि दमदार संचात पुनरुज्जीवन करून त्यांचे गतवैभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्कार्य आताही काही रंगकर्मी मोठय़ा निष्ठेने करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर इतिहासातील एक सोनेरी पान उलगडण्याचे आणि अनेकांना माहीत नसलेल्या एका प्रमुख घटनेची चित्तचक्षू चमत्कारिक गोष्ट सांगण्याचे कार्य एका नाटकाने केले आहे आणि ते नाटक आहे ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची!’ लेखक अभिराम भडकमकर यांनी ‘बालगंधर्व’ हा ग्रंथ सिद्ध केला आणि त्याअनुषंगाने संशोधन करीत असता त्यांना ही अफाट कल्पना सुचली असावी आणि म्हणूनच नाटककार अभिराम भडकमकर यांनी ही अभूतपूर्व घटना नाटकाच्या रूपाने आपल्यासमोर आणली हे भाग्यच आहे.

गंधर्व नाटक मंडळी आणि ललित कलादर्श या दोन प्रतिष्ठित आणि म्हटले तर प्रतिस्पर्धी नाटक कंपन्या. एकाच संगीत नाटकाचे वेगवेगळ्या संचांत प्रयोग करून त्यांना एका उंचीवर घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले. प्रेक्षकांनीही रसिकतेचे दान दोघांच्या पदरात टाकून त्यांचा गौरव केला होता. मात्र 1921 साली महात्मा गांधींनी टिळक स्वराज्य फंडात देणगी देण्याचे आवाहन समस्त देशवासियांना केले. या फंडात आपलेही योगदान असावे अशी बालगंधर्वांची इच्छा होती, परंतु डबघाईला आलेल्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. अशातच डॉ. भडकमकर यांच्या एका सुहृदाने सुचविलेल्या कल्पनेने सगळे चित्रच पालटले आणि इतिहासात नोंद करून ठेवावा असा एक नाट्य प्रयोग 1921 साली सादर झाला. त्याचीच ही गोष्ट. बालगंधर्व आणि संगीतसूर्य केशवराव भोसले या दोन दिग्गज प्रतिस्पर्धी नटांनी एकत्र येऊन ‘संगीत मानापमान’ या नाटकाचा प्रयोग करण्याच्या कल्पनेनेच खळबळ उडाली होती, पण तो प्रयोग झाला आणि त्याचीच साद्यंत हकिकत कथन करणारे हे नाटक आहे.

लेखकाने हे सारे तपशील नीट अभ्यासून मांडले आहेत. फंडाला मदत करण्याची बालगंधर्वांची आंतरिक इच्छा, पण कंपनी डबघाईला आल्याने त्यांची होणारी तडफड, त्यांनी केशवरावांची घेतलेली प्रत्यक्ष भेट आणि केशवरावांच्या मनात असलेला बालगंधर्वांविषयीचा पराकोटीचा आदर, इतरांनी केलेला विरोध झुगारून या दोघांनी प्रयोग करण्याची दाखवलेली तयारी आणि त्यावेळी समाजात घडत असलेल्या गोष्टी या सुसूत्रपणे गुंफून हे नाटक उभे केले आहे. या कल्पनेला खुद्द नाटककार काकासाहेब खाडिलकर यांनी केलेला विरोध आणि त्यावर केशवराव भोसल्यांनी काढलेला तोडगा या प्रयोगाला तत्कालीन नाट्य रसिकांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि त्याची इतिहासात झालेली नोंद यांचा धांडोळा घेण्याचे काम हे नाटकामागचे नाटक करते. त्या काळी काही आण्यांत किंवा एक-दोन रुपयांत नाटकाचे प्रयोग होत असताना शंभर रुपयांचे तिकीट लावून प्रयोग करण्याचे धाडस दाखविणाऱ्या या मंडळींना आणि त्यांना तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा प्रयोग हाऊसफुल्ल करणाऱ्या प्रेक्षकांना अभिवादन करणारे हे नाटक आहे.

लेखक, दिग्दर्शकांनी हा सगळा घटनाक्रम नीटपणे मांडला असला तरी काही राहून गेले असे वाटत राहते. नाटक कंपन्यांचा कारभार, सामाजिक परिस्थिती आणि सगळ्या संबंधितांची चित्रे उभी करताना पात्रांची गर्दी झाली आहे. काही कलाकारांना अनेक भूमिका वठवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या भूमिका मनावर ठसत नाहीत. दोन प्रतिस्पर्धी नाटक कंपन्यांमधला संघर्ष तीव्रतेने उभा राहात नाही. मात्र या काहीच गोष्टी सोडल्यास नाटक व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करते.

दिग्दर्शक ऋषीकेश जोशी यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक हे नाटक बसविल्याचे जाणवते. शंभर वर्षांपूर्वीचा उभा केलेला काळ, एकाच वेळी अनेक पात्रांच्या हालचाली, रंगमंचाच्या पुढच्या आणि मागच्या भागाचा केलेला यथायोग्य वापर यासोबतच प्रेक्षकांना तुलनेने नव्या असलेल्या नट संचाकडून करवून घेतलेली चोख कामे या जमेच्या बाजू आहेत. संगीत नाटकाचा प्राण असलेली नाट्य पदे दुसऱ्या अंकात बहार उडवून देतात. सर्वच कलाकारांनी चांगली कामे केली आहेत. बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्या भूमिकांसाठी दुहेरी पात्र रचना करण्याची कल्पना फर्मासच. त्यामुळे त्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वातील कंगोरे आणि प्रयोग सादर करण्यामधील जोश यांना वेगळे परिमाण लाभले आहे. आशीष नेवाळकर यांनी बालगंधर्वांच्या व्यक्तिमत्त्वातील ऋजुता आणि लडिवाळपणा तर हृषीकेश वांबुरकर यांनी केशवरावांच्या स्वभावातील जोश छान दाखवला. उत्तरार्धात ‘संगीत मानापमान’च्या प्रयोगात अजिंक्य पोंक्षे आणि ओंकार प्रभुघाटे यांनी अनुक्रमे भामिनी आणि धैर्यधराच्या भूमिकेतील बालगंधर्व आणि केशवराव भोसले सादर करताना उत्तम गायकीचा अनुभव दिला. एकाहून एक सरस नाट्यगीते एकामागोमाग एक सादर होत असताना प्रेक्षकांना ब्रह्मानंदाची अनुभूती येते. संगीतकार कौशल इनामदार यांनी मूळ पदांना तकाकी देण्याचे काम चोख केले आहे. इतर सर्वच कलावंतांनी बहुविध भूमिका साकारून असंख्य पात्रे असलेल्या नाटकाचा तोल सांभाळला आहे. त्यांचा समन्वय साधणेही छान जमले आहे. नटी आणि गृहिणी अशा दोन भूमिका ठसक्यात सादर करणारी अश्विनी जोशी हे नाटकातील एकमेव स्त्राr पात्र आहे. नाटक कंपन्यांची बिऱहाडं, सामाजिक परिस्थितीचे दर्शन आणि घराघरांतील चर्चा हे सगळे नेपथ्य आणि प्रकाश योजनेतून दाखवणे हे एक आव्हान होते ते प्रदीप मुळ्ये यांनी समर्थपणे पेलले आहे. रंगभूषा आणि वेशभूषेतून त्या काळातली सगळीच पात्रे गत वैभवासह उभी राहतात हे या नाटकाचे अजून एक वैशिष्टय़ आहे. एक दंतकथा बनून राहिलेल्या या ऐतिहासिक घटनेचे नाटक सादर करणाऱ्या निर्माते श्यामराज पाटील आणि अनंत वसंत पणशीकर यांच्या गुणग्राहकतेचे कौतुक करायला हवे. संगीत नाटकांच्या आठवणी जाग्या करण्याबरोबरच इतिहासाचे दस्तऐवजीकरण करणारा हा नाट्य प्रयोग अविस्मरणीय होतो. प्रत्येकाने हा नाट्यानुभव अवश्य घ्यावा असाच आहे.

[email protected]