मल्टिवर्स – अ बॉय कॉल्ड ख्रिसमस, जादुई दुनियेचा प्रवास

>> ड़ॉ स्ट्रेंज

13 वर्षांच्या गोड, तल्लख आणि हुशार अशा निकोलसबरोबर ‘एल्फहेल्म’ या एल्फ्सच्या जादुई नगरीच्या प्रवासाला नेणारा, ख्रिसमसच्या जन्माची कहाणी सांगणारा ‘अ बॉय कॉल्ड ख्रिसमस’ हा चित्रपट खास ख्रिसमस मूव्हीच्या यादीतील आवर्जून बघावा असा.

26 नोव्हेंबर 2021 साली प्रदर्शित झालेला ‘अ बॉय कॉल्ड ख्रिसमस’ हा खरं तर एक जादुई दुनियेचा थक्क करणारा प्रवास आहे. एका यशस्वी चित्रपटासाठी आवश्यक असणारे सर्व मसाले यात ठासून भरलेले आहेत. म्हणायला हा बाल चित्रपट आहे, पण सुरुवातीच्या दृश्यापासून हा सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना अक्षरश गुंतवून टाकतो. हा चित्रपट आपल्याला 13 वर्षांच्या गोड, तल्लख आणि हुशार अशा निकोलसबरोबर ‘एल्फहेल्म’ या एल्फ्सच्या जादुई नगरीच्या प्रवासाला नेतो आणि ख्रिसमसच्या जन्माची कहाणीदेखील सांगतो.

छोटासा निकोलस आपले वडील जोएल यांच्यासोबत एका बर्फाने आच्छादलेल्या प्रदेशात राहत असतो. बर्फामुळे फारसे अन्न उपलब्ध नसते, धान्याची कमतरता आणि जोडीला दारिद्रय़ अशा अनेक संकटांना हे बाप-बेटे सामोरे जात असतात. निकोलसची आई मरण पावलेली आहे. या लहानग्या निकोलसला त्याचे वडील कायम त्याच्या आईच्या एका थक्क करणाऱया प्रवासाची गोष्ट सांगत असतात. त्याची आई अनेक दिवसांचा प्रवास करून, उंच शिखराला पार करून, दोन राक्षसांच्या मधून चालत जात एका अनोख्या नगरीत पोहोचली होती. तिथले लोक उंचीला कमी होते, पण मनाने खूप मोठे होते. त्यांनी निकोलसच्या आईचे स्वागत केले. तिला खूप चांगली वागणूक दिली. तिथून परत येताना निकोलसची आई खूप सारी चॉकलेट्सदेखील घेऊन आली होती.

सर्वत्र काहीसे निराशाजनक वातावरण असताना निकोलसच्या देशाचा राजादेखील परिस्थितीने हताश झालेला असतो. जो कोणी त्याच्या आत्मविश्वास परत आणेल, त्याला एक उमेदीचा किरण दाखवेल अशी गोष्ट आणून देईल त्याला राजा खूप सारे धन आणि दौलत देणार असल्याची घोषणा करतो. धनाच्या आशेने काही गरीब लोक निकोलसच्या आईच्या कथेतील एल्फहेल्म नगरीचा शोध घेण्याचा आणि तिथून राजासाठी काहीतरी भेट आणण्याचा विचार करतात. निकोलसचे वडील जोएलदेखील त्या कंपूत सामील होतात. आपण परत येईपर्यंत ते त्यांच्या बहिणीला निकोलसची काळजी घेण्यासाठी बोलावतात. मात्र भावाची पाठ वळताच ही आत्या निकोलसवर अनेक अत्याचार करायला सुरुवात करते.

आत्याच्या जाचाला कंटाळलेल्या निकोलसच्या हातात अचानक त्याच्या आईने केलेल्या प्रवासाचा नकाशा लागतो आणि तो हरखून जातो. आईची कथा सत्य असल्याचे त्याला उमगते आणि तो वडिलांच्या पाठोपाठ एल्फहेल्मच्या प्रवासाला निघतो. त्याच्या सोबत असतो एकेकाळी त्याने प्राण वाचवलेला छोटासा उंदीर मिका. आता मिका आणि निकोलसची जोडी भव्य अशा हिमप्रदेशातून प्रवासाला निघते. प्रवासात सर्वात आधी त्यांना साथ मिळते एका रेनडिअरची! या प्रवासात मिका बोलायला शिकला आहे हे निकोलसला कळते आणि त्याचा आत्मविश्वास अजून वाढायला लागतो.

प्रदीर्घ प्रवासानंतरदेखील निकोलसला जादुई नगरीचे दर्शन काही घडत नाही. आईच्या कथेत वर्णन केलेल्या दोन राक्षसांमधून म्हणजेच दोन भव्य दगडांच्या पर्वतामधूनदेखील तो प्रवास करतो, पण हाती निराशा येते. श्रमलेला निकोलस प्रवासातच मूर्च्छित होऊन पडतो. आता निकोलसच्या मदतीला धावून येतात दोन एल्फ. ते त्याच्यातला विश्वास जागवतात आणि त्याला दर्शन होते तो शोधत असलेल्या जादुई नगरीचे. निकोलस आनंदाने नगरीत प्रवेश करतो खरा, पण तिथे त्याच्यासाठी एक वेगळेच संकट वाट बघत असते.

एल्फहेल्ममधून एका लहानग्याचे काही मानवांनी अपहरण केलेले असते. पुढे निकोलसला त्या अपहरणकर्त्यांमध्ये एक आपले वडील असल्याचेदेखील समजते आणि तो थक्क होतो. चित्रपट पुढे अनेक वळणे घेतो. निकोलसच्या विश्वासाची आणि धैर्याची परीक्षा तर पदोपदी होते. निकोलस या परीक्षेत पास होतो का? एल्फहेल्ममध्ये साजरा केला जाणारा ख्रिसमस नावाचा सण तो मानवी दुनियेत आणू शकतो का? हे सगळे काही मोठय़ा खुबीने आणि मुख्य म्हणजे अलवारपणे हा चित्रपट आपल्यासमोर उलगडत जाते. निकोलसचा प्रवास निकोलसपासून ते ख्रिसमसपर्यंत कसा पार पडतो हे पडद्यावर फार रंजकपणे साकारले आहे. लहानांच्या जोडीने मोठय़ांनीदेखील हा प्रवास नक्की करायलाच हवा.