>> स्नेहा अजित चव्हाण
प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असते ते आईला. प्रेम व त्यागाची मूर्ती म्हणजे आई. ‘आई’ या शब्दात संपूर्ण विश्व सामावलेले असते. लहान मुलांच्या मुखातून पहिला शब्द येतो तो आई.
धरणीलासुद्धा धरणी माता असे आपण संबोधतो.
आपल्या देशाचा उल्लेख करताना आपण भारतमाता असा करतो. 15 ऑगस्टला ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा करतो. नदीलासुद्धा आईची उपमा देतो. जसे गंगा मैया, संथ वाहते कृष्णामाई. अशा अनेक रूपांमध्ये आपण आई बघतो. पंढरपुरातील पांडुरंगालासुद्धा आपण ‘माऊली’ अशी हाक मारतो. आईचे गोडवे व आईवरून पोवाडे गातो. आई म्हणजे फक्त दोनच अक्षरांचा शब्द नाही. ‘आई’मधील ‘आ’ म्हणजे आत्मा व ‘ई’ म्हणजे ईश्वर. पण ‘आई’ या शब्दावरून सर्रास शिवी देणारे अनेक जण मी अवतीभवती अगदी सहजपणे बोलताना पाहिले आहेत. खरंच, आईवरून शिवी देणारे शूर आहेत का?
आईच्या नावावरून एखादी शिवी देणे म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे का? मारामारी करताना, भांडण झाले की, आईवरून शिवी देणे कितपत योग्य आहे?
खरं तर प्रत्येक स्त्राrचा आई म्हणून आदर करायला हवा. कुठलीच आई आपल्या मुलाला शिवी शिकविणार नाही. रस्त्याने चालताना हे सर्रास होते. मला इथे फक्त एवढेच नमूद करावेसे वाटते की, खरंच गरज आहे तर कानाखाली वाजव, पण आईच्या नावाने शिवी नको. आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही.
मूल लहान असताना ते आई-वडील यांच्या सोबत वाढत असतं.
थोडं मोठं झालं की, पालक आणि शाळा यांच्याशी त्याचा संबंध येतो. शाळा संपली की, पालक आणि कॉलेज.
बरं, यामध्ये कुठेच घरात किंवा शाळा- कॉलेजमध्ये शिवी शिकवली जात नाही. मग जी अभ्यासक्रमात नाही, संवादात नाही, घरात नाही, पण समाजात वावरताना कानावर ऐकू येते, तर कधी तोंडातून येते. यामध्ये दोष कुणाचा?
पालक वर्ग, शिक्षकवृंद की समाजाचा?
मला इथे नुसती समस्या मांडायची नाही.
कारण समस्या आहे, तर उपायसुद्धा असतो.
ही एक संयुक्त नैतिक जबाबदारी आहे…
आई-वडील यांच्यामधील पालकत्वाची,
सुजाण नागरिक बनवणाऱ्या शिक्षकवृंदाची,
समाजातल्या प्रत्येक घटकाची.
घर-शाळा-समाज या त्रिवेणी संगमामध्ये घडणारी ही पिढी. नक्की कुठे चालली आहे?
यासाठी घरात वावरताना, शाळेत शिकताना, समाजामध्ये घडताना सुसंगतपणा असणे अत्यंत गरजेचे आहे.
(श्रमिक विद्यालय, जोगेश्वरी)