शुभ संकेत येणाऱ्या मान्सूनचे!

>> माणिकराव खुळे

देशात या वर्षी ‘ला-निना’ व आयओडी व युरेशियातील कमी हिमवृष्टीने पावसासाठी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.साहजिकच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महाराष्ट्रातील पावसासंबंधी विचार केल्यास महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचीच शक्यता आहे. अर्थात या अधिक पावसाचे वितरण कसे होते यावरच पडणारा पाऊस लाभदायी की नुकसानदेही, याचे उत्तर अवलंबून असेल. या वर्षी मान्सूनचे संकेत चांगले असले तरी मान्सूनचे आगमन वेळेतच होईल हे आजच सांगता येणार नाही.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पहिल्या टप्प्यातील अंदाजानुसार या वर्षी देशात येत्या पावसाळ्यात गुणात्मकदृष्ट्या (क्वॉण्टिटेटिवली) 106 टक्के अधिक 5 टक्के पाऊस अपेक्षित आहे की, जो (104 ते 110 टक्के) श्रेणीत म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेच्या श्रेणीत मोडतो. तसाही देशात जून-सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत जर 96 ते 104 टक्के श्रेणीत पाऊस पडला तर तो सरासरी इतका पाऊस पडला असे मानले जाते. त्यामुळे अंदाजातील अंकानुसार नकारात्मक शक्यतेचा जरी विचार केला तरी ही शक्यता (106 टक्के वजा 5 टक्के) म्हणजे तरीदेखील ती 101 टक्के येते की, जी सरासरी इतक्या म्हणजे (96 ते 104 टक्के) पावसाच्या श्रेणीत मोडते. त्याचबरोबर अंकानुसार सकारात्मक शक्यतेचा विचार केल्यास ही शक्यता (106 अधिक 5) 111 टक्के येते की, जी सरासरीपेक्षा अत्याधिक म्हणजे शेवटच्या पावसाच्या श्रेणीत मोडते. म्हणून दोन्ही अंगांनी विचार केल्यास देशात जून-सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाचीच शक्यताच अधिक जाणवते व तसा अंदाज बाहेर आला आहे.

या वर्षी 2024 च्या पूर्वमोसमी काळात म्हणजे मार्च, एप्रिल व मे 2024 पर्यंत ‘एल-निनो’ कमकुवत होण्याची शक्यता असून 2024 च्या मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यांत म्हणजे जून, जुलै महिन्यात एन्सो तटस्थ होण्याची शक्यता जाणवते. मान्सूनच्या उर्वरित दोन महिन्यांत म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ‘ला-निना’चा उदगम होण्याची शक्यता जाणवते. यंदाच्या पावसाळ्याच्या जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीतील पूर्वार्धात म्हणजे जून व जुलै या दोन महिन्यांचा एन्सो तटस्थतेचा काळ की, जो मान्सूनला पूरक ठरणारा असल्यामुळे पावसास अनुकूल असणार आहे, परंतु हा काळ मान्सूनच्या आगमनाच्या संक्रमणाचा काळ असतो. त्यात पूर्वमान्सून सरीही कोसळत असतात, परंतु मान्सूनच्या वाटचालीत मान्सून करंट काय असेल, ते त्या वेळच्या प्रणालीवर अवलंबून असेल. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या उत्तरार्धात म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ‘ला-निना’बरोबरच भारतीय महासागरात धन ‘भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता’ (पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल) विकसित होण्याची शक्यताही आहे. शिवाय 2024 च्या गेलेल्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत पृथ्वीच्या उत्तर अर्धगोलात तसेच युरेशिया भागातील बर्फाळ देशांत सरासरीपेक्षा कमी झालेल्या हिमवृष्टीमुळे म्हणजेच या तिन्ही अवस्था देशातील मान्सूनला अधिक पूरक असून देशाला सरासरीपेक्षा अधिक पाऊस देण्याची शक्यता जाणवत आहे.

कारण पॉझिटिव्ह आयओडी हासुद्धा भारत देशाचा ‘ला-निना’ च समजला जातो. तसेच कमी हिमवृष्टी म्हणजे भारत देशात अधिक पाऊस पडण्यासाठी अनुकूलता मानली जाते. मान्सूनच्या आगमनासंबंधी असेही एक निरीक्षण आहे की, ‘एल-निनो’च्या नंतर येणाऱ्या ‘ला-निना’ वर्षात मान्सून वेळेत येतो. बघू या, 2024 चा मान्सून कोणत्या तारखेला देशात तसेच महाराष्ट्रात कोणत्या तारखेला प्रवेशतो. ‘ला-निना’च्या मान्सूनचा शेतपिकांसाठी प्राथमिक अवस्थेतील नियोजनाचा विचार करताना खरीप पेरणी तर होणारच आहे, परंतु मान्सूनच्या आगमनावरच पेरणी कधी होणार, हे ठरू शकते. कदाचित मान्सूनचे आगमन उशिरा झाले तर पेरणीचे वेळापत्रक बिघडू शकते. तेव्हा संयम ठेवूनच खरीप पिकांच्या पेरणीस सामोरे जावे, असे वाटते. खरिपाच्या बाबतीत फारच उतावीळ न होता सावधच पावले टाकावीत, असे वाटते. नाहीतर खरिपाच्या दुबार पेरणीला सामोरे जावे लागू शकते.

2024च्या येणाऱ्या ‘ला-निना’च्या मान्सूनमुळे सुरुवातीला खरीप हंगामाला काहीशी पाणीटंचाई जाणवणार असली तरी खरीप उत्तरार्धात व पूर्ण रब्बी हंगामात शेतपिकांना पाण्याची चांगली उपलब्धता होऊ शकते. ऑगस्ट महिना तसेच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांतील पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा व शिवाय कदाचित स्वाती अशा सव्वादोन महिन्यांच्या पाच नक्षत्रांपैकी दोन किंवा तीन नक्षत्रांतून दहा ते पंधरा पावसाळी दिवसांतून मात्र चांगला पाऊस होऊ शकतो, असे वाटते. म्हणजे रब्बी हंगामाची स्थिती चांगली असू शकते. नद्यानाले खळाळतील. त्यामुळे विहिरी, तळी, धरणक्षेत्रात तसेच जमिनीत पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसेल असे वाटते. कदाचित महाराष्ट्रासाठी दोन वर्षे पुरेल इतका जलसाठाही या 2024च्या ला-निनाच्या मान्सूनने झाला तर आश्चर्य वाटावयास नको असे वाटते.

ज्या ठिकाणी सध्या सिंचनासाठी अल्प पाण्याची उपलब्धता असेल अशा शेतकऱ्यांनी आगाप मका, कपाशी व आडसाली ऊस लागवड केली तरी येणारा मान्सून कदाचित मदत करू शकतो असे वाटते. जेथे सध्या सिंचन व्यवस्था नसेल अशा ठिकाणी व जिरायत क्षेत्रात मका, सोयाबीन व कडधान्यांची पेरणी काहीशी उशिरा होण्याची शक्यता जरी असली तरी हंगाम वाया जाणार नाही असे वाटते, परंतु खरीप लाल कांद्याच्या लागवडीला काढणीदरम्यान होणाऱ्या अतिवृष्टीच्या आपत्तीलाही कदाचित सामोरे जावे लागेल असे वाटते. दक्षिण अर्ध महाराष्ट्रातील क्षेत्रात ज्वारी पिकास या वर्षीच्या मान्सूनने चांगलीच मदत होऊ शकते असे वाटते. किडीचा प्रादुर्भावही कमी जाणवेल असे वाटते. 31 मेदरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाजानंतर अजून चित्र स्पष्ट होईल.

मागील तीन आठवड्यांपासून (6 एप्रिल) अवकाळी पाऊस व गारपिटीचे असलेले महाराष्ट्रातील वातावरण चार दिवसांनंतर म्हणजे 30 एप्रिलपासून निवळण्याची शक्यता जाणवते. सध्या जरी वातावरण निवळले असले तरी पण 40 ते 50 दिवसांचा पूर्व-मोसमी हंगाम अजून बाकी आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस, उष्णतेची लाट, चक्रीवादळ निर्मितीसारख्या वातावरणीय घटनांची शक्यता ही असतेच. त्या त्या वेळच्या वातावरणीय प्रणालीनुसार सूचित केले जाईल.

(लेखक ज्येष्ठ हवामान तज्ञ (सेवानिवृत्त) आहेत)