>> महेश उपदेव
गडचिरोलीच्या लेखा मेंढा गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करून देणारे आणि पर्यावरण व वनाधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भ एका जाणत्या गांधीवादी व आदिवासींच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱया कार्यकर्त्याला मुकला आहे. एका अतिदुर्गम भागातल्या बहुतांशी अशिक्षित, आदिवासी गावाच्या समूहमनानं ठरवलं तर काय बदल घडून येऊ शकतो याची ही गोष्ट. म्हटलं तर गावची, पण म्हटलं तर हे गाव ज्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यामागे चालला त्या मोहनभाईंची गोष्ट म्हणजे मेंढाची गोष्ट. मोहन यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने 2009 मध्ये मेंढा (लेखा) व मर्दा या आदिवासी गावांना सामुदायिक वनहक्क दिले होते. मोहन यांनी तिथे वृक्षमित्र नावाची संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेला 2016 मध्ये मानाचा जमनालाल बजाज पुरस्कार देण्यात आला होता. गोंड आदिवासी मेंढालेखा गावाने जे करून दाखवले, ते देशात कोणालाही जमले नव्हते. या पाचशे लोकवस्तीच्या गावाने दीड कोटींचे वार्षिक उत्पन्न घेऊन दाखवले. आजपर्यंत प्रत्येक निर्णय बहुमताने नाही तर सर्वसहमतीने सातत्याने करून दाखवले. अर्थात हा सगळा अनेक दशकांचा मोठा संघर्ष आहे. तो संघर्ष संसदेत आणि सरकार दरबारी नव्या कायद्यांच्या आणि नियमांच्या निर्मितीपर्यंत गेला आहे. त्या प्रक्रियेचा परिणाम केवळ या एकाच गावावर झाला असे नाही, तर आज देशातल्या कित्येक गावखेडय़ांसाठी मेंढय़ाचा संघर्ष पथदर्शी झाला आहे. मोहन हिराबाई हिरालाल हे मूळचे विदर्भातल्याच चंद्रपूरचे, पण सत्तरीच्या दशकात तरुण मोहनभाईंना त्यांच्या आयुष्याची दिशा मिळाली. तेव्हाची तरुणाईच एका भारावलेल्या संक्रमणातून जात होती. जयप्रकाश नारायणांनी ‘संपूर्ण क्रांती’ची हाक दिली होती. त्याला राजकीय परिमाणासोबत रचनात्मक ‘नवनिर्माणा’चीही एक दिशा होती. ती दिशा मोहनभाईंसारख्या अनेक तरुणांना आपलीशी वाटली. मोहनभाईंना ती गांधी, मग विनोबा या मार्गाने गडचिरोलीतल्या मेंढालेखा गावात घेऊन आली. जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीचे ते सक्रिय सदस्य होते. गांधीजी-विनोबाजींच्या जनशक्तीच्या प्रबंधावर त्यांचा विश्वास होता. 1984 मध्ये गडचिरोली जिह्यात त्यांनी ‘वृक्षमित्र’ संस्थेची स्थापना केली. ते निःस्वार्थी सहयोगी मित्र (सहकारी मित्र), आणि ग्रामस्वराज संकल्पनेचा प्रसार करणारे एक जाणकार कार्यकर्ता होते. वन संवर्धन, टिकाऊपणा, समानता आणि सुरक्षा या तीन प्रमुख पैलूंवर जोर देत त्यांनी भूमिका बजावली. मोहन हिराबाई हिरालाल यांच्या ज्ञानाने आणि दिग्दर्शनामुळे मेंढा (लेखा) येथील लोकांना ग्रामसभा अधिक सर्वसमावेशक, सहभागी आणि सक्रिय करण्यात मदत झाली. त्यांनी गावकऱयांना महिलांचा सहभाग, दारूबंदी, वनसंरक्षण आणि हक्क, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, सांस्कृतिक हक्क, युवा सक्षमीकरण, शाश्वतता, समानता आणि सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत केली.
मोहन हिराबाई हिरालाल यांनी गावकऱयांमध्ये जंगलांवरील त्यांच्या कायदेशीर हक्कांबद्दल जागरुकता निर्माण केली. ज्यामुळे स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सहभागी वनव्यवस्थापन लोकप्रिय करण्यात मदत झाली. यामुळे 2009 मध्ये सरकारने वन हक्क कायदा 2006 अंतर्गत मेंढा (लेखा) आणि मर्दा या गावांना सामुदायिक वन हक्क प्रदान केले. मेंढा (लेखा)चे क्रांतिकारी घोषवाक्य ‘दिल्ली आणि मुंबईत आमचे सरकार आहे, पण गावात आम्हीच सरकार आहोत,’ हे गाव आणि तेथील लोकांच्या भावनेचे उदाहरण देते. 2013 मध्ये, मोहन हिराबाई हिरालाल आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनंतर, मेंढा (लेखा)च्या ग्रामदानाच्या सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्या आणि गावाला महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम 1964 अंतर्गत ग्रामदान गाव म्हणून घोषित करण्यात आले.
दारू हा या सगळ्या भागाचाच प्रश्न होता. पण दारूचं सेवन करणारे पुरुष ग्रामसभेतही असल्यानं महिला तिथं येऊ शकत नव्हत्या. त्यांची अट होती की गावात दारूबंदी करा आणि गावानं ते ऐकलं. गावात दारूबंदी झाली. गावात दारू आणणाऱयांसाठी दंडाचे नियम ग्रामसभेनं केले आणि मग महिलांच्या सहभागाने मेंढय़ांची ग्रामसभा भक्कम झाली. आजही गावच्या प्रत्येक निर्णयात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. पण अधिकारांच्या पहिल्या निर्णायक लढाईत जो विजय मेंढय़ानं मिळवला, तो केवळ महिलांमुळे.
प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणाऱया सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील आणि महात्मा गांधी, विनोबा आणि संत तुकडोजी महाराज यांच्या सिद्धांतानुसार काम करणाऱया चळवळीतील या ज्येष्ठ कार्यकर्त्याला अभिवादन.