
>> आशा कबरे–मटाले
खऱयाखुऱया स्त्री-पुरुष समानतेमध्ये स्त्रियांना कुठलाही अधिकचा उदोउदो, गौरव नकोच आहे. स्त्राrही पुरुषासारखीच हाडामांसाची माणूस आहे, तिलाही तशाच आशा-आकांक्षा, इच्छा-गरजा, क्षमता-अक्षमता आहेत याचा स्वीकार झाला तरच खरीखुरी स्त्राr-पुरुष समानता अवतरेल.
मार्च सुरू होण्याच्या आधीच हल्ली 8 मार्चच्या महिला दिनाची चाहूल लागते. महिला मोठय़ा संख्येने सक्रिय मतदार म्हणून पुढे येऊ लागल्याने राजकीय नेतेमंडळींच्या त्या ‘लाडक्या’ होऊन बसल्याच आहेत. यंदा तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गेल्या रविवारच्या ‘मन की बात’मध्ये ‘महिला दिना’चा उल्लेख केला. महिलादिनी आपण आपली एक्स, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांवरची अकाऊंट्स एक दिवसासाठी निवडक प्रेरणादायी महिलांना सोपवणार असून या महिला त्यांचे काम आणि अनुभव त्यादिवशी देशवासियांसमोर ठेवतील असं मोदींनी जाहीर केलं आहे. काही तरी नवीन करणाऱया वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करणाऱया महिलांना पंतप्रधानांकडून ही संधी मिळणार आहे. एक दिवसासाठी नारी शक्तीला समर्पित असा हा उपक्रम असणार आहे. असेच असंख्य ‘प्रतिकात्मक’ कार्यक्रम महिला दिनाच्या दिवशी होतील. त्यात गैर काहीही नाही, परंतु निव्वळ एक दिवस जाहीर सभा-समारंभ व सोहळ्यांतून महिलांना ‘नारी शक्ती’ संबोधायचं व एरव्ही मात्र घरा-कुटुंबातील स्त्रियांची अवहेलना करायची, त्यांना अनेक बाबतीत दुय्यम दर्जाची वागणूक द्यायची असं कुणी करणार असेल तर ही दांभिक मानसिकता अस्सल स्त्राr-पुरुष समानतेबाबत आग्रही असणाऱया कुणालाही नक्कीच खटकेल. बुरसटलेल्या दृष्टिकोनातून स्त्राr-पुरुषांच्या शारीरिक भिन्नतेकडे पाहणारे स्त्राrला एका बंदिस्त चौकटीत ठेवू पाहतात.
वेगळं काही करणाऱया स्त्रियांचा गौरव करणं हे प्रेरणादायी असेलही, पण जेव्हा आपण घरगुती कामांची जबाबदारी सांभाळणाऱया स्त्रियांचाही गौरव करू, तेव्हा आपण खऱया अर्थाने स्त्राrला व त्या कामांनाही गौण लेखणं थांबवलं असा त्याचा अर्थ होईल. माता, भगिनी, पत्नी अशा भूमिकांमधील स्त्रियांविषयीच आदर कशासाठी? अपत्यप्राप्ती न झालेल्या, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता यांनाही समाजात बरोबरीने आदराचं स्थान का मिळू नये? आनंदसोहळ्यांमध्ये त्यांना खडय़ासारखं वगळून अपमानित करणं कधी थांबणार? मुलगा जन्माला न घालणाऱया स्त्राrची आजही देशातील कितीतरी समाजांमध्ये अवहेलना होते. हेच काय घरातील स्त्रियांनी एकंदरच कसं जगावं, किती शिकावं, नोकरी करावी वा करू नये, लग्न कधी आणि कुणाशी करावं असे सगळे महत्त्वाचे निर्णय अनेक समाजांमध्ये आजही वडील, भाऊ, पती अशा भूमिकांमधील पुरुषच घेत असतात. हेच कशाला कुटुंबातील स्त्रियांच्या जगण्यातील अनेक छोटय़ा-छोटय़ा, सहज घडणाऱया गोष्टींवरही त्यांचं नियंत्रण असतं. मोठय़ाने हसू नये, असे कपडे परिधान करू नये, कुटुंबातील कुणाला तरी सोबत घेऊनच घराबाहेर पडावं, कोणती गाणी ऐकावीत, कोणते सिनेमे पाहावेत, पाहू नयेत असे अनेक करकचून बांधून व जखडून टाकणारे नियम असंख्य स्त्रियांच्या वाटय़ाला आजही येताना दिसतात. महाराष्ट्रासारख्या प्रगत, पुरोगामी राज्यात शहरी भागांमध्ये परिस्थिती बरीच बदलली आहे हे खरं आहे. आपल्याकडे किमान विशिष्ट स्तरातील काही घरांमध्ये मुला-मुलींना शिक्षण, करीअर आदी बाबतीत बऱयापैकी समान संधी, समान स्वातंत्र्य मिळताना दिसतं, पण तरीही वर्षानुवर्षांच्या पुरुषप्रधानतेच्या दृष्टिकोनातील मानसिकता इथे-तिथे डोकावत राहतेच.
अलीकडेच रणवीर अलाहाबादिया या यूटय़ूबरने एका कार्यक्रमात केलेल्या टिप्पणीवरून बराच गदारोळ झाला. अलाहाबादियाने त्या कार्यक्रमातील स्पर्धकाला त्याच्या पालकांच्या संदर्भात जो प्रश्न विचारला, त्यावर सर्व स्तरांतून निषेध नोंदवला गेला. अलाहाबादिया, रैना यांच्याविरोधात कारवाईचे पाऊलही उचलले गेले. सगळ्यांनाच ते विधान अत्यंत आक्षेपार्ह वाटलं. पण त्या विधानातून जे ध्वनित होतं तशाच अर्थाच्या आई-बहिणीवरच्या शिव्या आपल्या देशात अगदी सर्रास दिल्या जातात. खालच्या स्तरातील किशोरवयीन मुलांपासून ते उच्चभ्रू वर्गातील निव्वळ इंग्रजीत संवाद साधणाऱयांपर्यंत कुणालाही आई-बहिणीवरच्या या लैंगिक उल्लेख असलेल्या शिव्या हिंदी-इंग्रजीतून देताना काहीच खटकत नाही. कैक वेळेला कथित सुसंस्कृत समाजात आसपास स्त्रियांचा वावर असतानाही पुरुष बेधडक अशा शिव्यांचा वापर करतात.
हेच कशाला राजकीय क्षेत्रातील एखाद्या ज्येष्ठ स्त्राrबद्दल आपल्याकडे कुठल्या पातळीवर खाली घसरून टिप्पणी केली जाते? नटय़ांचेही तेच. त्याच वयाचे या नटय़ांचे नवरे मात्र त्यांच्या मुलीच्या वयाच्या नटय़ांसोबत हिरो म्हणून काम करताना दिसतात. अगदी साठीपासष्टीच्या पुरुषाने एखादी तरुण नटी ‘हॉट’ दिसते असं म्हटलं तर चालतं, पण हेच उद्गार त्याच वयाच्या एखाद्या स्त्राrने काढले तर चालतील? पन्नाशीत आल्यानंतरही सुडौल असणाऱया एखाद्या अभिनेत्रीचं तुलनेने बऱयाच तरुण अभिनेत्याशी प्रकरण जुळलं तर तिचा उल्लेख समाजमाध्यमांवर हमखास ‘बुढ्ढी घोडी’ असा होतो. तशाच स्वरूपाच्या नात्याचा बभ्रा झालेले राजकीय नेते मात्र उजळ माथ्याने कार्यरत राहतात. उत्तर प्रदेशात काही वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने बलात्कार प्रकरणासंदर्भात बोलताना “लडके है, लडकों से गलतियां हो जाती है’’ असे उद्गार काढले होते. आजही आपल्या एकंदर समाजाची मानसिकता अनेक बाबतीत पुरुषांनी एखादं गैरवर्तन केलं तर त्यास माफी, पण तेच वर्तन स्त्रियांनी केलं तर मात्र तो गुन्हा असंच असल्याचं दिसून येतं. नारी शक्ती म्हणत एखाद दिवसापुरतं मखरात बसवणं आणि एरव्ही बरोबरीचं माणूसपणही नाकारणं यातूनच हा सारा विरोधाभास व दांभिकता तयार होते.
अशा महिला दिनाच्या एका दिवसाच्या कौतुकसोहळ्याचा तिटकारा वाटतो. अस्सल आणि बेगडी स्त्राr-गौरवातील फरक समजून घेऊन यंदाचा महिला दिन साजरा करूया.