>> वैश्विक, [email protected]
‘पर्सिव्हरन्स’ म्हणजे सोप्या भाषेत सततचे प्रयत्न किंवा चिकाटी. मंगळावर गेलेल्या याच नावाच्या ‘रोव्हर’विषयी आपण पूर्वी वाचलंय. आता त्याने लावलेल्या नव्या ‘शोधा’संबंधी जाणून घेऊ या. ‘पर्सि’ हे टोपणनाव असलेली मंगळावरची ही मानवनिर्मित गाडी (रोव्हर) 18 फेब्रुवारी 2021 पासून तेथे भ्रमण करत आहे. एवढ्या काळात या रोव्हरची भ्रमंती झाली ती 27 किलोमीटर एवढीच. परंतु ही ‘एवढीच’ सफर पृथ्वीवरून नियंत्रित करून मंगळपृष्ठावर घडवणं हे सोपं काम नाही. त्यासाठी संशोधक आणि नियंत्रण कक्ष त्यावर अव्याहत नजर ठेवून आहे. 30 जुलै 2020 रोजी मंगळाकडे झेपावलेल्या या यानाची पूर्वतयारी 2010 पासून सुरू होती. मात्र अवकाशात गेल्यावर अवघ्या 29 आठवडय़ांत ते मंगळावर उतरलं. एका वर्षाचे आठवडे 52 असतात हे इथे लक्षात घ्यायला हवं.
तर एवढय़ा काळात ‘पर्सिव्हरन्स’ने अत्यंत चिकाटीने आपली कामगिरी उत्तमपणे बजावत मंगळपृष्ठावरची विविध प्रकारची माहिती सातत्याने पृथ्वीकडे पाठवण्यात यश मिळवले असून या वेळी त्याने एका चकचकीत विवराचा वेध घेतला आहे. पर्सिव्हरन्सला जे काम देण्यात आलं होतं त्यामध्ये मुख्यत्वे, मंगळावरील वाऱ्याच्या ध्वनीचे रेकॉर्डिंग करणे, तसेच तिथल्या सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वीच्या नेरेट्वा वॉलिस त्रिभूज प्रदेशातील सपाट आणि खडबडीत भागात भ्रमण करणे व जेझेरो विवर तळापासून वरपर्यंत तपासणे अशा विविध गोष्टी होत्या. त्याने त्या निमूटपणे पार पाडल्या. तिथल्या चमकत्या खडकांना ‘ब्राइट एन्जल’ हे नाव देण्यात आलंय, तिथेही ते पोहोचलं.
आपल्या दोन सख्ख्या ‘शेजाऱयां’पैकी यान उतरवण्यायोग्य आणि कदाचित भावी काळात वस्तीयोग्य वाटणाऱया मंगळाबद्दलचं कुतूहल पृथ्वीवर दिवसेंदिवस वाढतंय. मात्र याच मंगळाने 1938 मध्ये अमेरिकावासीयांना कमालीचं भयभीत केलं होतं हे ठाऊक आहे. त्याची गोष्ट अशी. होय, गोष्टच कारण एच. जी. वेल्स या कादंबरीकाराने 1898 मध्ये लिहिलेल्या ‘वॉर ऑफ द वर्ल्डस’ या विज्ञानकथेवर आधारित एक रेडिओ कार्यक्रम 30 ऑक्टोबर 1938 च्या संध्याकाळी ‘व्हाइस ऑफ अमेरिका’ या त्यांच्या रेडिओवरून प्रस्तृत झाला.
‘मर्क्युरी थिएटर’ने हा कार्यक्रम रेडिओवरून सादर केला तो ‘हॅलोविन’ या त्यांच्या सणाच्या आधीच्या संध्याकाळी. एक तासाच्या या कार्यक्रमात दिग्दर्शक ऑर्सन विलेस यांनी अशा काही प्रभावी पद्धतीने हे नभोनाटय़ प्रसारित केलं की, ते ऐकणाऱया लाखो श्रोत्यांना ते कथानक काल्पनिक नसून खरं वाटलं आणि संपूर्ण अमेरिकाभर (यूएसमध्ये) एकच हलकल्लोळ माजला.
असं काय होतं या कथानकात? तर ‘हॅलॉविन’साठी संगीताचा कार्यक्रम सुरू असताना मध्येच ‘बातम्यां’ची वेळ होते. त्यामध्ये मंगळावर भयंकर विस्पह्ट होत असल्याचं सांगितलं जातं. मग पुन्हा पियानोवादन सुरू होतं. ते थांबवून परत बातमी येते की, एक आगीचा लोळ मंगळावरून पृथ्वीकडे येतोय. त्यावर खगोल शास्त्र्ाज्ञांच्या प्रतिक्रिया सांगितल्या जातात. पुन्हा कार्यक्रम सुरू होतो न होतो तोच बातमी येते की, ते मंगळावरचं यान होतं. त्यांनी पृथ्वीवर हल्ला केलाय. हा सगळा त्या कथानकाचाच भाग असतो, पण एच. जी. वेल्स यांनी त्यांच्या कादंबरीत इंग्लंडमधल्या शहरांची खरी नावे लिहिली असल्याने ऑर्सनही, न्यूयॉर्क, न्यू जर्सी अशी नाव घेत कथानक रंगवू लागतात. ऐकणारे जाम घाबरतात. शेवटी खरे पोलीस या स्टुडिओपर्यंत पोहोचतात. तोपर्यंत अमेरिकेत ‘मार्शियन’ किंवा ‘मंगळे’ जीव आपला नाश करतील या धास्तीने थैमान घातलेलं असतं. दुसऱया दिवशीही ‘न्यूयॉर्क टाइम्स’सह अनेक वृत्तपत्रांची हेडलाईन होते. पुस्तकाचं माध्यम वेगळं आणि ‘प्रसारणाचं’ वेगळं याचा अंदाज ऑर्सन यांनाही आला नसल्याचं ते मान्य करतात.
आज तीच अमेरिका त्याच जीवसृष्टीहीन मंगळावर वैज्ञानिक प्रयोग करत आहे. ‘पर्सिव्हरन्स’ने तिथल्या कोणेएके काळी असतील अशा तळय़ांचा शोध घेऊन तिथले नमुने गोळा केले आहेत. जांभळय़ा रंगाचे कार्बोनेट्स आणि हिरव्या रंगाची सिलिका सापडल्याचं प्रसिद्ध झालंय. चकाकत्या विवरात कधी काळी पाणी असावं असं वाटतं.
मंगळावरून कोणी ‘आक्रमण’ करून पृथ्वीवर येण्याची शक्यताच नाही हे एव्हाना आपल्याला समजलंय. उलट आपण पृथ्वीवासीच आता मंगळावर ‘संशोधनात्मक’ आणि पर्यटन मोहिमा काढण्याइतपत पुढारलो आहोत. भयचकित करणाऱया ‘काल्पनिक’ कथेतल्या मंगळावर वास्तवात ‘सिलिका’चा तळ असलेली चमचकीत विवरं सापडतायत आणि मानवनिर्मित ‘रोव्हर’ त्यातून फिरतंय!
1938 ते 2024 पर्यंत घडलेला हा जाणिवेतला बदल विज्ञानाने घडवला आहे हे लक्षात घ्यायला हवं. जमलं तर ‘वॉर ऑफ वर्ल्डस्’चा तो यूटय़ूबवरचा 1938 चा ‘ब्रॉडकास्ट’ जरूर ऐका. आता त्याची केवळ गंमत वाटेल!