विज्ञान-रंजन – पृथ्वीवरचा ‘मंगळ!’

आपल्याकडच्या नवग्रह-स्तोत्रात मंगळाचा उल्लेख ‘धरणीगर्भसंभूतम्’ असा का केला असेल ठाऊक नाही. परंतु मंगळ आणि चंद्र हे पृथ्वीपासून ‘निर्माण’ झाल्याची कल्पना अनेक संस्पृतींमध्ये बराच काळ होती. आपल्याकडे चंद्र ‘क्षीरसागरातून’ उत्पन्न झाल्याची कथा आहे, तर चंद्र हे पृथ्वीचे अपत्य आहे का याची चर्चा पाश्चात्य संस्कृतीमध्येही व्हायची. त्या त्या काळातल्या या संकल्पना. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तत्कालीन साधनांच्या मर्यादा लक्षात घेता कोणी संपूर्ण विश्वाचा विचार करत होते, आपले ‘निष्कर्ष’ मांडत होते हे महत्त्वाचे… तर चंद्र, मंगळ आता नेमके कसे आहेत याची वैज्ञानिक कल्पना आली आहे. चंद्र, मंगळावर माणसाने याने पाठवलीयत, तर चंद्रावर माणसाने पदार्पणही केलेय.

चांद्रविजय झाला. त्यालाही आता बरीच वर्षे लोटली. माणसाचा या पुढचा ध्यास आहे, केवळ मंगळावतरणाचा नव्हे तर तिथे जाऊन वसाहत वगैरे करता येते का ते जाणून घेण्याचा. परंतु चंद्राइतका मंगळ ‘सोपा’ नाही. त्याच्या आणि चंद्राच्या पृथ्वीपासूनच्या अंतरात अक्षरशः जमीन आणि अस्मानाचा फरक आहे. चांद्रपृष्ठ आणि मंगळपृष्ठ यांच्यात काही मूलभूत तफावत असून मंगळपृष्ठ लोहमिश्रित खडकमातीचं आणि म्हणूनच लाल दिसतं. दुर्बिणीतून किंवा नुसत्या डोळ्यांनीही मंगळ लालसरच दिसतो. त्यामुळे त्याला निखाऱ्यांसारखा धगधगीत तांबडा अशा आशयाचं ‘अंगारक’ असंही नाव मिळालं. मग मंगळवारी येणारी ‘चतुर्थी अंगारकी’ झाली.

पृथ्वीपासून कमीत कमी 5 कोटी आणि जास्तीत जास्त 7 कोटी अंतराच्या लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरणारा मंगळ जेव्हा जवळ असतो, तेव्हा त्यावर पोहोचायचं तरी अंतराळ यानाला सगळा प्रवास व्यवस्थित झाला तरी किमान सात ते आठ महिने लागतात. एवढा प्रवास करून तिथे जायचं आणि तिथल्या 95 टक्के कार्बनडॉयऑक्साइड, 3 टक्के नायट्रोजन तसेच उतरलेला अ‍ॅगॉन या वायूंच्या थराखाली ‘सुखाचा श्वास’ घेऊन रहायचं, हे आपल्यासारख्या ऑक्सिजनवर जगणाऱ्यां जिवांना कसं जमायचं?

त्यासाठी तिथे आपल्याला अनुपूल अशा ‘कॅप्सूलयुक्त’ थरांची ‘युक्ती’ करावी लागेल किंवा अन्य काही मार्ग शोधावे लागतील. एक बरं आहे की, आतापर्यंत संशोधकांना मंगळ बऱ्यांपैकी समजलाय. त्यामुळे त्याची कृत्रिम प्रतिकृती किंवा आर्टिफिशियल मॉडेल अथवा तत्सम म्हणजे ‘सिम्युलेटेड’ वातावरण इथे पृथ्वीवरच निर्माण केलं तर? ही कल्पना संशोधकांसाठीही थरारक आणि आव्हानात्मकही होती.

खोटा परंतु खऱ्यांसारखाच ‘मंगळ’ पृथ्वीवर पुठे बनवायचा. एखादा ‘देखावा’ बनवण्यासारखंच हे होतं, पण या बंदिस्त ‘देखाव्या’त एकदा आत शिरलं की, पृथ्वीशी वर्षभर संपर्क तुटणार होता. अशीच भन्नाट कल्पना वापरून ‘द टमन शो’ नावाचा मस्त इंग्लिश चित्रपट बनवला गेला आहे. त्या तरुणाचं ‘ते’ त्यांच्या जन्मापासूनच जग ‘वेगळं’च असतं आणि त्याचा ‘शो’ बाहेरच्या जगात सुरू असतो. तिथून बाहेर पडायचा ‘दरवाजा’ असतो. परंतु तिकडे ‘तो’ जाणार किंवा पोहोचणार याची आटोकाट काळजी घेतली जाते. ‘त्या’चं काम…

तसंच काहीसं ‘मंगळ वातावरण’ अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातल्या ‘जॉन्सन स्पेस सेंटर’ने तयार केलं. त्यांच्या प्रयोगशाळेच्या एका दरवाजापलीकडच्या 1700 चौरस फुटांच्या जागेत एक ‘मंगळ’ तयार करण्यात आला आणि एका दिवशी लॅबचं दारं उघडून कमांडर केली हेस्टन, रॉस ब्रॉकवेल, नेथन जोन्स आणि अॅन्का सेलेरिऊ असे चार ‘मंगळनिवासी’ तब्बल 378 दिवसांसाठी पृथ्वीवरच पृथ्वीपासून दूर झाले. 25 जून 2023 रोजी लॅबचा दरवाजा बंद झाला आणि क्षणभरात 5 कोटी किलोमीटर पल्याडच्या मंगळावर दाखल झालेल्या या मंडळींच्या स्वागताला थ्रीडी प्रिंटिंगद्वारा घडवलेला हुबेहूब मंगळ दिसला! तशाच वायूंचं वातावरण, तीच लाल माती, दगड, खड्डे, टेकड्या आणि पृथ्वीच्या केवळ 38 टक्के गुरुत्वाकर्षण असलेल्या ग्रहावर आता त्यांना राहायचं होतं. या प्रकल्पाचं नाव होतं, ‘अल्फा डय़ुन्स’ (Alfa Dunes) तिथे ते यशस्वीपणे राहिले. या निवासात त्यांनी मंगळावर चालण्याची प्रॅक्टिस केली. टोमॅटोचं पीक घेतलं. अंतराळात बराच काळ टिकणारं अन्न खाल्लं. अचानक पृथ्वीवरची यंत्रणा ‘बिघडली’ (इथे बिघडवली) तर काय करायचं याचा मनोधैर्य अबाधित राखून सराव केला. त्यांचा संदेश ‘पृथ्वीवर’ पोहोचायला 22 मिनिटं लागतील हे त्यांना ठाऊकच होतं, पण संपर्कच तुटला तर काय करायचं त्याचाही अनुभव घेतला. थ्रीडी प्रिटिंगद्वारे बनवलेल्या,4 बेडरूम, डायनिंग आणि कार्यदालन (वर्कप्लेस) असलेल्या जागेत या चौघांची राहण्याची सोय होती. दोन महिला आणि दोन पुरुष असे चार जण 378 दिवसांची मंगळयात्रा यशस्वीरित्या पूर्ण करून 6 जुलै 2024 रोजी (लॅबचं दार उघडल्यावर) पृथ्वीवर सुखरूप परतली. उद्याच्या मंगळवारीची ही पूर्वतयारी. 2030 पर्यंत अनेकांना मंगळावर जायचंय म्हणे. त्यांचं मंगल चिंतू या!

ता.क.

खऱ्यां मंगळावर मात्र ‘पर्सिव्हरन्स’ला प्लॅस्टिकचा कचरा आढळलाय आता बोला!

विनायक