साहित्य जगत- अशी ही दिल्ली

>> रविप्रकाश कुलकर्णी

सरहद, पुणे’ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली येथे 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान होत आहे. म्हणजेच आज या संमेलनाचे सूप वाजेल. मग देशाच्या कानाकोपऱयातून या संमेलनासाठी म्हणून आलेली मराठी रसिक मंडळी आपापल्या गावी परतील. अर्थात या आठवणी पुढच्या संमेलनापर्यंत नक्की राहतील. एवढेच नाही तर त्याचे पडसाद निमित्ता निमित्ताने पुढील संमेलनापर्यंत उमटतच राहतील, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. हेही संमेलन त्याला अपवाद राहणार नाही हे सांगायला भविष्यवेत्याची गरज नाही. हे मी कित्येक वर्षे जी अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं अनुभवली आहेत त्या अनुभवातून सांगतो आहे.

यंदाच्या संमेलनाचा वृत्तांत, अनुभव सांगायच्या पूर्वी संमेलनाच्या आधी आणि प्रत्यक्ष संमेलनात जे अनुभव आले त्याबद्दल सांगावे म्हणतो. ‘दिल्ली तो बहुत दूर है…’ हे वचन आता जणू वाक्प्रचार झाला आहे. हे संमेलन दिल्लीत करूया यासाठी ‘सरहद, पुणे’ या संस्थेने मागणी करताच आणि नंतर ती मागणी मान्य केल्यानंतर ‘दिल्ली तो बहुत दूर है’ याचा उच्चार आणि पुनरुच्चार इतक्या वेळा झाला की यापूर्वी असे कधीही घडले नसेल. हा वाक्य प्रयोग केव्हा आणि कसा झाला असेल? याबाबत अलीकडच्या काळात तरी कुणी स्पष्टीकरण, खुलासा केलेला आढळत नाही. मनात आले कुणी नाही तर आपणच शोधून पाहूया.

शोधा म्हणजे सापडेल या बाण्याने मदत करणे आमचे मित्र अजित पाटणकर मदतीला आले. ‘इनूज दिल्ली दूर अस्त’ असा उर्दू वाक्प्रचार आहे. याचा अर्थ दिल्ली अभी बहुत दूर है. हा शब्दप्रयोग पहिल्यांदा चिस्ती संप्रदायाचे एक सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया यांनी केलेला दिसतो. कित्येक वर्षाने हा शब्दप्रयोग अखेरचा मुगलसम्राट बहादुर शाह जफर यांनी केला. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने एका मागोमाग एक अशी भारतीय संस्थाने काबीज करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला तेव्हा बहादुर शहाने इंग्रजांना उद्देशून म्हटलं, ‘अभी तो दिल्ली बहुत दूर है.’

अलीकडच्या काळात मात्र, विशेषत राजकीय पक्ष केंद्रात म्हणजे दिल्लीत स्वबळ दाखवण्याचे प्रयत्न सुरू करतो. आपले सरकार स्थापण्याचे स्वप्न पाहू लागतो तेव्हा हमखास, विशेषतः विरोधी पक्षाला हिणवण्यासाठी ‘दिल्ली तो बहुत दूर है’ हा शब्दप्रयोग वापरला जातो.

अशीच गाजलेली घोषणा म्हणजे ‘चलो दिल्ली!’ अर्थात ती सुभाषचंद्र बोस यांनी केलेली होती. भारतीय राष्ट्रीय सेना INA ने बर्मा विरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली. त्यात विजय मिळाल्यानंतर पुढचा पल्ला अर्थातच हिंदुस्थान होता.

सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे भाषण करताना आपल्या सैन्याला चेतावणी म्हणून आदेशयुक्त घोषणा दिली – चलो दिल्ली! हिंदुस्थानला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी केलेले हे आवाहन होते. त्याचा प्रचंड परिणाम झाला होता. त्यामुळेच ‘चलो दिल्ली’ या घोषणेशी सुभाष चंद्र बोस यांचे नाव कायमचे जोडले गेलेले आहे. दिल्लीतील सत्ताकेंद्र हे प्रमुख आणि संपूर्ण देशावर प्रभाव टाकणारे केंद्र असल्यामुळे दिल्लीकडे साऱयाच भारतीयांचे लक्ष असते.

दिल्ली कायम मोहिनी टाकते आणि आजतागायत ती मोहिनी टिकून आहे याचे कारण तेच आहे. त्यामुळेच दिल्लीबद्दल ज्यांनी दिल्ली अनुभवलेली आहे त्यांच्याबद्दल आवर्जून लिहिलेले दिसते. पण ते इतके उलट सुलट आहे की संभ्रम पडावा, दिल्ली आहे तरी कशी?

हे निरीक्षण पहा, कुणाला ‘नाही’ म्हणायचे दिल्लीवाल्यांच्या दरबारी संस्कृतीला कठीण वाटत असावे. किंवा आपण दिल्लीचे असून दिल्लीची माहिती नाही हे परक्यांशी कबूल करणे त्याला कमीपणाचे वाटत असेल. त्यामुळे तुम्ही जर एखाद्याला अमुक ठिकाण कुठे आहे किंवा अमुक वस्तू कुठे मिळेल, असे विचारले तर तो तुम्हाला “आगे जाकर देखिये!’’ असे सांगेल. कदाचित आगे जाकर तुम्हाला हवे ते मिळाले नाही म्हणजे जी तुमची फजिती होते ती पाहण्यातही त्याला आनंद वाटत असेल. कारण दिल्लीकरांच्या दरबारीपणाच्या मागे एक मिस्कीलपणाही दडलेला असतो, असे अनुभवाने कळून येते.

म्हणून दिल्लीकरांच्या वागण्यातला दरबारीपणा आणि बोलण्यातला डौल यांना तुम्ही दिल्लीला गेलात तर जपा, ही आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन. संस्कारांची आणि सभ्यतेची अत्यंत पुसट छटा असलेल्या माणसाचीसुद्धा भाषा इतकी सफाईदार, डौलदार आणि अलंकृत असते ती काही न सांगता खूप सांगितल्याचा आणि काही न देता सर्वस्व देऊन टाकल्याचा ते बेमालूम आभास निर्माण करतील. हे निरीक्षण आहे ऑक्टोबर 1940. लेखक रा. भिजोशी.

त्यानंतर जयवंतराव टिळक (अशी ही दिल्ली), गंगाधर इंदूरकर (दिल्ली दिनांक), अशोक जैन (राजधानीतून) अशा मोजक्याच पुस्तकातून दिसलेली दिल्ली, अनुभवलेली दिल्ली आपले डोळे उघडणारी आहे. यातून आम्ही मराठी लोक काही शिकणार आहोत का?

या संमेलनापासून तो फरक पडावा अशी सुरुवात तरी आपण करूया. मग कदाचित आपण म्हणू शकू- दिल्ली बहुत दूर नही है!