>> आशा सावरकर-रसाळ
कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला या व्यक्तीने एका मराठी कुटुंबाला मारहाण केली व मराठी लोक कसे घाणेरडे असतात, मटण-मच्छी खातात हे बोलून त्याने त्याचा परप्रांतीय माज महाराष्ट्रात राहून दाखवला होता. त्यानंतर पांडे नावाच्या एका मराठी माणसाच्या घरात घुसून त्याला मारहाण केली. मला स्वतःलादेखील हा अनुभव आला.
मी कल्याण पूर्व लोकग्राममधील माझ्या घरी टू व्हीलरवरून रस्त्याने येत होते. मला वाटेत अय्यप्पा देवाची मिरवणूक लागली. आपल्या येथे कोणत्या ना कोणत्या धार्मिक उत्सवाच्या मिरवणुका निघतच असतात… तशीच ही मिरवणूक रस्त्याने जात होती. त्या मिरवणुकीपासून माझे घर दोन-तीन मिनिटांच्या अंतरावर होते व तेथून जाण्यासाठी रस्ताही मोकळा होता. म्हणून मी कडेकडेने टू व्हीलरने सावकाश जाण्यास निघाले असता त्या मिरवणुकीतील चार जण अचानक माझ्या गाडीसमोर आले नि माझी टू व्हीलर पकडून मला अडवलं व बोलले, इथून जायचे नाही. आमची मिरवणूक चालली आहे. मी त्यांना विनंतीवजाच बोलली की, अण्णा यहाँ से रस्ता है और मै आराम से जा सकती हूँ. मेरा घर यही दो मिनट में आयेगा. मी शांत स्वरात बोलत असताना ते चारीच्या चारी जण माझ्यावर तुटून पडले. आम्ही बोलतोय ना, इथून जायचं नाही. चल मागे फीर. मला घाटी बोलले. मात्र एक मराठी भाषिक मुलगी म्हणून मी त्यांना तोडीस तोड उत्तर दिल्यानंतर त्या चार पुरुषांपैकी एकाने मला धक्का देऊन पळून गेला.
मी पोलिसांना फोन केला. नेहमीप्रमाणे पोलीस वेळेत आलेच नाहीत. मी तशीच कोळसेवाडी पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना त्या सर्वांचे फोटो दाखवले. तोपर्यंत त्या परप्रांतीय लोकांना कळलं होतं की मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची कल्याण येथील पदाधिकारी (भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख) आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या आयोजकांचा मला फोन आला की, मॅडम सबसे गलती हुआ है. प्लीज आप कंप्लेंट मत करना. तोपर्यंत माझं एफआयआर लिहिण्याचं काम सुरू झालं होतं. थोड्या वेळात ते सर्व लोक पोलीस स्टेशनला आले. ते माझी सतत माफी मागत होते. आपण महाराष्ट्रीय लोक खूप मोठ्या मनाचे आहोत. त्यांनी माफी मागितली, त्यामुळे मी तक्रार दाखल केली नाही.
परंतु या घटनेवरून मला एकच सांगायचे आहे की, आम्ही प्रांतवाद, भाषावाद करत नाही. या महाराष्ट्राने व येथील जनतेने सर्वांना सामावून घेतले आहे. तुम्ही इथे पोटापाण्यासाठी येता, पण म्हणून आमच्या राज्यात येऊन तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका. आम्ही काय खावं काय खाऊ नये, हे सांगू नका. आमच्याच गावात आम्हाला कुठल्या रस्त्याने जायचे किंवा नाही जायचे हे ठरवायला जाल तर या माझ्यासारखी व्यक्ती तरी हे खपवून घेणार नाही आणि मराठी जनतेनेही इतकी मोकळीक यांना देऊ नये की हे आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतील. आपण सारे भारतीय एक आहोत. पण आता पुन्हा वेळ आली आहे की, आपण आपली मराठी अस्मिता दाखवून द्यायची. आपल्या जाज्वल्य महाराष्ट्राची अस्मिता जपलीच पाहिजे.