>> विजय पांढरीपांडे
मराठी भाषेला निवडणुकीचे निमित्त साधून का होईना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अत्यंत आनंदाची, अभिमानाची बाब आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी हा संकल्पपूर्तीचे समाधान देणारा क्षण आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून आनंदोत्सव साजरा करताना मराठी भाषेचे संवर्धन, तत्संबंधी आव्हाने, त्याअनुषंगाने येणारी जबाबदारी याचे भान ठेवणे तितकेच गरजेचे आहे.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून उच्च शिक्षण यावर भर दिला आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा पदवीचे किंवा पदव्युत्तर उच्च शिक्षण घेताना अडचणीची वाटते. ही अडचण दूर करताना अनेक ठिकाणी मातृभाषेतून बोलण्याचा प्रयत्न काही प्राध्यापक करतात, पण अनेक इंग्रजी शब्दांना, संकल्पनांना पर्यायवाचक मराठी शब्द नाहीत. असतील तरी ते क्लिष्ट आहेत. त्यामुळे विषय नीट समजावताना, समजून घेताना दोन्ही पक्षी अडचणी येतात. सायन्स, इंजिनीअरिंग, मेडिकल, संगणक अशा अनेक विषयांत मराठीत उत्तम पुस्तके नाहीतच. या प्रक्रियेत कोणते शब्द मराठीत वापरायचे अन् कोणते शब्द मूळ इंग्रजीतले तसेच ठेवायचे हे तार्किक विचाराने ठरवावे लागेल. याबाबतीत प्रसिद्ध संगणक तज्ञ अच्युत गोडबोले यांनी गेल्या दहा-बारा वर्षांत लिहिलेली विविध विषयांवरील मराठी पुस्तके आदर्श वस्तुपाठ ठरू शकतील. त्यात सुधारणाही करता येतील. फिजिक्स, केमेस्ट्री, गणित, बायोलोजी, इलेक्ट्रॉनिक्स अशा इंजिनीअरिंगसह सर्व विषयांत मराठीतून सोपी पुस्तके येणे गरजेचे आहे. हिंदीत हा प्रयोग आयआयटी कानपूरचे प्रा. एच. सी. वर्मा यांनी फिजिक्स विषयात उत्तम प्रकारे केला आहे. एखादा प्राध्यापक अमुक विज्ञान विषयाचा इंग्रजी माध्यमातून शिकवणारा उत्तम प्राध्यापक असेल, पण तो मराठी अनुवादाचे काम तितक्याच प्रगल्भपणे करू शकेल याची खात्री नाही. मुळात विषय उत्तम समजणे अन् तो इंग्रजीतून मराठीत तितक्याच प्रभावीरित्या समजावणे हे सोपे काम नाही, पण हे अशक्यही नाही. सरकारकडून अभिजात दर्जा मिळाल्यानंतर लाभणारे अनुदान या भाषांतर प्रकल्पासाठी विवेकाने वापरता येईल. सर्व विषयांत व सर्व विभागांत नव्या व्याख्या, नव्या संकल्पना, नवी समीकरणे, प्रयोगपद्धती हे सारे सध्या सोप्या भाषेत लिहावे लागेल आणि अनुवादित करावे लागेल. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर खरे तर हे काम युद्धपातळीवर सुरू व्हायला हवे होते, पण सरकारपासून विद्यापीठापर्यंत शैक्षणिक काम कमी अन् घाणेरडे राजकारण जास्त अशी दुर्दैवी परिस्थिती असल्याने याबाबतीत फारशी हालचाल झाल्याचे ऐकिवात नाही. आता तरी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने निमित्त साधून आपण खडबडून जागे व्हायला हवे.
याचबरोबर महाराष्ट्राबाहेरील राज्यांत अनेक मराठी भाषिक राहतात, त्यांच्याही भाषिक अडचणी सोडवल्या पाहिजेत. हैदराबाद येथे 100 वर्षांपेक्षा जुनी विवेकवर्धीनी शिक्षण संस्था आहे. त्याच्या मराठी शाळा व कॉलेजची अवस्था फार वाईट आहे. त्यासारख्या संस्थेला संजीवनी देणे गरजेचे आहे. एकेकाळी उत्तम असलेल्या उस्मानिया विद्यापीठातील मराठी विभागातील विद्यार्थ्यांची रोडावलेली संख्या अन् अभिजात संशोधनाचा दर्जा हेही चिंतेचे विषय आहेत. याप्रमाणेच इतर राज्यांतील आकाशवाणी पेंद्रावरील मराठी कार्यक्रमाचा दर्जा सुधारणे, चांगल्या कार्यक्रमासाठी अनुदान वाढवणे आवश्यक आहे. मराठी नाटके फारशी महाराष्ट्राबाहेर जात नाहीत. गेलीच तर तिकिटाचे दर अवास्तव असतात. महाराष्ट्रातही नाटकाच्या थिएटरची अवस्था दयनीय आहे. त्याबद्दल प्रशांत दामले यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ नटांनी घसा पह्ड तक्रारी केल्या आहेत. खरेतर मराठी रंगभूमी, मराठी नाटय़संगीत, भावगीत, लोककला अशा सर्वच बाबतीत खूप काही करण्यासारखे आहे. जितकी दळणवळण साधने, इंटरनेट, बिग डेटा हे गरजेचे तितकेच नाटय़, चित्रपट, संगीत, लोककला ही मराठी संस्कृती जपणे व तिचे संवर्धन करणेदेखील गरजेचे. आधीच इंग्रजीने आपल्या भाषेची वाट लावायला सुरुवात केली आहे. जिथे पर्याय नाही तिथे इंग्रजी शब्द वापरायला हरकत नाही. टेबल, पेन, रेल्वे, बँक, चेक, आधारकार्ड, पॅन नंबर असे अनेक शब्द मराठीच्या अंगणात छानपैकी रुळले आहेत. तरीही बोलताना धेडगुजरी भाषा
न बोलता प्रमाणभाषा बोलणे, लिहिणे गरजेचे आहे. आज इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या अनेक तरुण मुलामुलींना मराठी वाचता येत नाही व बोलणेदेखील अनेकदा अशुद्ध असते. इकडून परदेशात गेलेल्या कुटुंबात नव्या पिढीचे मराठी वाचन नसल्यात जमा म्हणता येईल.
मराठी मासिके ही एकेकाळी फार मोठी वाचन संस्कृती होती. गेल्या काही दशकांत अनेक अभिजात दर्जेदार मासिके बंद पडली. आता फक्त दिवाळी अंक उरलेत. तेही काही मोजके अपवाद वगळता दर्जा पार घसरलेले. कोविडचे निमित्त काय झाले मराठी प्रकाशन व्यवसायदेखील खिळखिळा झाला. हौशी लेखकांवर स्वतः पैसे खर्च करून पुस्तके प्रसिद्ध करण्याची वेळ आली. मग मानधन, कॉपी राईटची बातच सोडा. मासिके बंद पडल्याने कथा, कविता लेखन कमी झाले. नव्या दर्जेदार कादंबऱ्यांची प्रतीक्षाच करावी लागते. पूर्वीसारख्या जाडजूड ऐतिहासिक कादंबरीची बातच दूर! मराठी वाचनालये ओस पडली आहेत. अनेक बंददेखील पडली. पूर्वी फिरते घरपोच वाचनालय असायचे. आता नव्या पिढीला अर्थ सांगावा लागेल. एकूणच मराठी वाचन संस्कृती मंदावली आहे. त्यातही मोबाइल, सोशल मीडिया या नव्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीने मराठी पुस्तक हातात घेणे जवळपास बंद केले आहे. अनेक मुलाखतींत एकही पुस्तक न वाचलेले उमेदवार मी बघितले आहेत. जी वाचत नाहीत ती माणूस म्हणून वाचणार कशी, असा प्रश्न पडतो अशावेळी.