
>> दीपिका कोळंबे–साटम
मालवणी माणूस आणि गजाल हे समीकरण सर्वश्रुत आहे.मुळातच माणूस हा सामाजिक प्राणी. त्यात मालवणी माणूस तर गप्पिष्ट. चार लोकांमध्ये बसून गप्पा मारल्याशिवाय त्याला चैन पडत नाही… या गप्पा म्हणजेच मालवणीतल्या गजाली.
पूर्णिमा गावडे-मोरजकर ही सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावातली मालवणी लेखिका. ‘गजाल गाथण’ हा तिचा पहिला कथासंग्रह. पण तिच्या कथा वाचून तसे वाटत नाही. लेखिकेची भाषेवरची पकड, मालवणी माणसांचे स्वभाव, त्यांच्या सवयी, त्यांच्या लकबी लेखिकेने अचूक टिपल्या आहेत. लेखिकेच्या भाषेचा लहेजा थोडा कोंकणी आहे; पण भाषा मात्र आंब्यासारखी गोड आणि फणसासारखी रसाळ आहे.
पहिली कथा ‘नाळ’ यामध्ये मुक्या जनावरांनासुद्धा लोभ, जिव्हाळा, प्रेम या भावना असतात, हे सांगितले आहे. दुसऱया ‘शेवटचे घटका’ या कथेत, नवराबायको हेच नाते शेवटपर्यंत टिकते. त्यामुळे दोघांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे याची उपरती आयुष्याच्या शेवटी होते, जेव्हा एकाने दुसऱयाला हार घालायची वेळ येते असे लेखिका सुचवते. तिने ‘नाटकाची गजाल’मध्ये भोळीभाबडी बायको आणि तिचे खुळे प्रेम दाखवले आहे. ‘हुलप’ या कथेत मिरश्यांगेच्या हुलपात भंगलेल्या स्वप्नामुळे हवालदिल झालेला शेतकरी लेखिकेने दाखवला आहे. ‘आयेची माया’ या कथेत मुंबईवरून येणाया मुलासाठी लगबगीने जेवण करणारी आई आणि तेवढय़ाच प्रेमाने खाजेरे अळूची भाजी खाणारा विजू लेखिकेने चितारला आहे. ‘लांबचो पल्लो’ या कथेत, गाडी जपून चालवा नाहीतर लांबचा पल्ला गाठाल असा काळजीवजा सल्ला द्यायला लेखिका विसरली नाही. ‘उमाळो’, ‘आजीवालो नातू’ आणि ‘मायेची नाती’ या गजालीतून लेखिकेने नात्यांची घट्ट वीण विणली आहे. ‘न्हयवरची भेट’मध्ये दोन प्रेमी जिवांचा भेटीसाठी आसुसलेला जीव, त्यासाठी त्या प्रेमी युगुलांचा आटापिटा याचे वर्णन लेखिकेने केले आहे. ‘गैरसमज’ कथानकातून गैरसमजातून गोष्टी कोणत्या थराला जाऊ शकतात त्याचे एक उत्तम उदाहरण लेखिकेने चितारले आहे. गावातलेच बाऊल (चोर) कसे कोंबडय़ा लंपास करत होते हे ‘आणि बाऊल गावलो’ या गजालीतून अतिशय मिश्किलपणे लेखिका सांगते. अशा एकूण 15 कथांमधून लेखिकेची प्रतिभाशैली, संवादलेखन, मालवणी भाषेवरचे प्रेम, त्यातूनच लाल मातीशी तिची जोडलेली नाळ दिसून येते. या भूमीने जगाला आपली गजाल ऐकवली आहे तशी गजाल सांगायलाही समर्थपणे शिकवली आहे. त्या गजाली सांगण्याच्या समर्थ वारशाची परंपरा वाहत राहील. हा वारसा चालवणाऱया अनेक आवाजांपैकी पूर्णिमा गावडे-मोरजकर हा आजचा नवा समर्थ आवाज आहे हे नक्की.
पद्मनाभ रंगनाथ यांनी चितारलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ एकदम साजेसेच. समुद्र, शिडाच्या नौका, माशांची गाथण… तसेच या पुस्तकातील कथा म्हणजे कोकण, तिथली माणसे, परिसर, निसर्ग यांच्या कथा…जणू पुस्तकात एकत्र ओवलेल्याच!
गजाल गाथण
लेखिका ः पूर्णिमा गावडे-मोरजकर
प्रकाशक ः सिंधुदुर्ग प्रतिष्ठान प्रकाशन, मुंबई
स्वागतमूल्य ः 150 रुपये