जागर- महाराष्ट्राच्या परंपरेचं दर्शन

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

महाराष्ट्राला लोककलांचा मोठा वारसा लाभलेला आहे. या भूमीतली प्रत्येक लोककला ही समृद्ध करणारी आहे. यापैकी एक म्हणजे गोंधळ.’ आमच्या भावकीत, पैपाहुण्यात किंवा गावात कुणाचे लग्न झाले की, त्या मंगलकार्याच्या निमित्ताने त्या घरात गोंधळाचा कार्यक्रम केला जाई. गोंधळ म्हणजे मातृदेवतेची आराधना असते. मंगलकार्याच्या निमित्ताने कुलाचारम्हणून गोंधळाचा कार्यक्रम करण्याची प्रथा महाराष्ट्रात अनेकांच्या घरी आहे. आजही अनेक जण ही प्रथा पाळतात.

गोंधळाचा विधी करणारी ‘गोंधळी’ ही एक भटकी जमात आहे. वर्षानुवर्षे हे गोंधळी देवीची आराधना करीत आहेत. ‘रेणुराई’ आणि ‘कदमराई’ असे दोन पंथ गोंधळ्यांमध्ये आहेत. रेणुराई संप्रदायाचे लोक गोंधळाचा विधी करतात. ‘संबळ्या गोंधळ’ आणि ‘पोतऱया गोंधळ’ असे गोंधळाचे दोन प्रकार सांगितले जात असले तरी आपणाला सर्वांना माहिती असणारा गोंधळ म्हणजे संबळ्या गोंधळ. हाच परिपूर्ण गोंधळ आहे. गोंधळाच्या कार्यक्रमात चार ते पाच लोक असतात. त्यांचा जो म्होरक्या असतो त्याला ‘नाईक’ असे म्हणतात. नाटकातील दिग्दर्शकाचे किंवा पूर्वी संस्कृत नाटकात सूत्रधाराचे जे महत्त्वाचे स्थान असते तेच महत्त्व गोंधळात ‘नाईका’चे असते. संबळ वाजविणारा, तुणतुणे वाजविणारा आणि मंजिरी किंवा टाळ वाजविणारा असे वाद्य वाजविणारे निवडक लोक गोंधळात असतात. गोंधळात स्त्रिया नसतात. पूर्वरंग आणि उत्तररंग अशा दोन भागांत गोंधळ होत असतो. गोंधळी गोंधळाला प्रारंभ करण्याआधी देवीचा प्रतिकात्मक चौक मांडतात. चौक म्हणजे अंगणाच्या मध्यभागी पाट मांडला जातो. त्यावर स्वच्छ वस्त्र टाकले जाते. वस्त्रावर अष्टदल काढून किंवा धान्याची रास ठेऊन त्यावर कलश आणि नारळ ठेवला जातो. याला देवीचा ‘घट’ म्हणतात. या घटासमोर विडय़ाच्या पानावर सुपारी ठेऊन देवीचा अर्थात तुळजाभवानीचा किंवा अंबाबाईचा टाक किंवा मूर्ती ठेवली जाते. पाटाभोवती ज्वारीची धाटे किंवा उसाच्या पाच ताटय़ाचा मखर करून त्यावर फुलमाळ अडकवली जाते आणि भंडारा लावून जागरणाला सुरुवात होते. या चौकासमोर गोंधळी लोक देवीचा गोंधळ सादर करतात. मातृदेवतेचे प्रतीक म्हणून घटस्थापना केली जाते. या घटासमोर दिवटी पेटवतात. यजमानांसह पूजा करतात आणि नंतर प्रत्यक्ष गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. गोंधळाच्या पूर्वरंगात देवदेवतांना ‘आवतण’ दिले जाते.

तुळजापूरची भवानी गोंधळा ये

माहूरगडची रेणुका गोंधळा ये

औंधाच्या यमाई गोंधळा ये

वाईच्या गणपती गोंधळा ये

कोल्हापूरची अंबाबाई गोंधळा ये

शिखरीचा शंभू गोंधळा ये

राहिल्या साहिल्या गोंधळा ये

हे आवाहन गीत असते. खरे तर देवदेवतांना बोलावून त्यांची प्रतिष्ठापनाच येथे केली जाते आणि त्या-त्या देवता तेथे आलेल्या आहेत अशी श्रद्धा बाळगूनच पुढील कार्यक्रम केला जातो. या आवाहनपर गीतानंतर काही पदे, गौळणी म्हणण्याची परंपरा आहे. ही पदे मातृदेवतेचे माहात्म्य सांगणारी जशी असतात, त्याबरोबरच समोर बसलेल्या लोकांचे मनोरंजन करणारीदेखील असतात.

‘मीठ-मिरचीचे भांडण’, ‘नवरा-बायकोचा झगडा’ अशा गमतीदार प्रसंगांची मांडणी त्यातून केलेली असते. समोर बसलेला श्रोता बहुभाषिक असेल तर अनेक भाषांचे मिश्रण असलेली गाणीदेखील गोंधळी म्हणतात. प्रसंगानुरूप हास्यनिर्मिती करून श्रोत्यांचे मनोरंजन केले जाते. श्रीकृष्ण आणि मथुरेच्या गौळणी यांच्या परस्परसंबंधाचे वर्णन करणाऱया रचनाही पूर्वरंगात घेतल्या जातात. संतांनी रचलेल्या गवळणी गोंधळी सादर करीत असतात.

उत्तररंगात गोंधळी एखादी कथा सांगतो. या कथा रामायण, महाभारत या महाकाव्यातील कथेवर किंवा उपकथेवर आधारलेल्या असतात. अन्य पुराण ग्रंथांतील उपकथांवरही गोंधळी कथा सांगतात. लोकसंस्कृतीत परंपरेने चालत येणाऱया लोककथांचाही कौशल्यपूर्ण वापर गोंधळी करीत असतात. पुराणातील मूळ कथा इतकी बदललेली असते की, त्यातून आधुनिक जीवनातील अनेक संदर्भ आलेले असतात. त्यामुळे कथा कधीच जुनी वाटत नाही. समकालीन जीवनाशी नाते सांगणारी एखादी फार्सच्या स्वरूपातील हास्यात्मक कथाही गोंधळी उत्तररंगात लावतात. देवीचे चरित्र सांगणारी आख्याने गोंधळात अधिक असतात. त्यातून देवी माहात्म्य विशद केलेले असते. साधारणपणे गावातील लोकांची संध्याकाळची जेवणं झाली की, गोंधळी कार्यक्रमाला सुरुवात करतात. रात्री सुरू झालेला हा कार्यक्रम सूर्य उगवण्यापूर्वी संपतो. रात्रभर समोर बसलेल्या श्रोत्यांना कार्यक्रमात गुंतवून ठेवण्याचे सामर्थ्य गोंधळ्यांकडे असते. आजही अनेक गोंधळी खेडय़ापाडय़ांत आहेत आणि त्यांचा गोंधळ खेडय़ापाडय़ांतील लोकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांची भक्तीची नि धार्मिक समाधान करून घेण्याची भूक भागवत आहेत.

महाराष्ट्राला लोककलांचा हा मोठा वारसा लाभलेला आहे. या भूमीतली प्रत्येक लोककला ही समृद्ध करणारी आहे. इथे वेगवेगळ्या भागात राहणाऱया लोकांचे राहणीमान, नृत्य, गाणी, बोलीभाषा, पेहराव आणि एकूणच जीवनमानातून येथील संस्कृतीचे दर्शन घडत जाते. लोककला संस्कृतीचा हा वारसा एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे अभिमानाने पोहोचवला जात आहे. फक्त पोहोचवलाच जात नाही तर तो तितक्याच ताकदीने चालवला जात आहे. यातूनच संपन्न करणाऱया कलांचे प्रतिबिंब आपल्याला महाराष्ट्राच्या मातीत उमटलेले  बघायला मिळते. यातीलच एक लोककला म्हणजे हा ‘गोंधळ.’ गोंधळ हा देवीच्या कुलाचारामधला एक धार्मिक विधी असून आजही तो प्रथा परंपरेप्रमाणे कित्येकांच्या घराण्यात चालत आलेला आहे.

गोंधळी हे प्रामुख्याने तुळजापूरच्या भवानीदेवीचे उपासक असून महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा समाजाचा कुलाचार कुळधर्म म्हणून गोंधळ्यांना बोलावून शुभकार्यप्रसंगी गोंधळ घालण्याची प्रथा आहे. गणेशस्तुतीने गोंधळाला सुरुवात होते. यात एक मुख्य गोंधळी असतो, तर बाकीचे गोंधळी त्याला साथ करतात. या वेळी संबळ, तुणतुणे, खंजिरी व मंजुळ टाळ ही वाद्ये वाजवली जातात. गोंधळात मुख्यत्वेकरून काकडय़ा गोंधळ आणि संबळ्या गोंधळ असे दोन प्रकार पडतात. काकडय़ा गोंधळ करण्यास सर्वांना मुभा आहे, तर  संबळ्या गोंधळ हा फक्त गोंधळी जातीचे लोकच सादर करतात. रेणुराई गोंधळी समोर दिवटी ठेवून, तर कदमराई हातात जळता पोट घेऊन संबळ वाजवत देवीची गाणी म्हणतात. गोंधळी गोंधळ सादर करताना आपल्या सांकेतिक करपल्लवी भाषेने लोकांना चकित करतात. अलीकडे देवीची स्तुती करणारी पदे व शिवकालीन पोवाडे सादर केली जातात. ग्रामीण भागाचा आविष्कार दाखवणारे गीते ही होतात. यात जांभूळ आख्यान, अंबरीश राजा, विक्रम राजा, विनोदी कलाविष्कार, बतावणी, संवाद सादर करून गोंधळी उपस्थितांची करमणूक करतात.

गोंधळींचा पोषाख हा अंगात झब्बा किंवा बाराबंदी अंगरखा, शिंदेशाही फेटा, कानात बाळी, कपाळावर हळद-कुंकवाचा मळवट, गळ्यात कवडय़ांची माळ असा असतो.

आई उदं गं अंबाबाई

जोगवा मागिन आईचा जोगवा

अंबे जोगवा दे जोगवा दे

माय माझ्या भवानी जोगवा दे

अशा पद्धतीची देवीची गीते सादर करून देवीचा उद्धार करतात. त्याच्याच जोडीला अनेक विनोदी गीतेदेखील सादर केली जातात. संबळाच्या तालावर दिवटी पेटवून एकामागून एक गीत सादर करत पहाटेपर्यंत गोंधळ घातला जातो. अशी ही गोंधळाची लोककला महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे. तिचे स्वरूप जरी आता बदलले असले तरीदेखील ती सादर करण्यामागची भावना ही मूळ टिकून आहे. यातून महाराष्ट्राच्या परंपरेचं आणि संस्कृतीचं दर्शन घडत जातं.

गोंधळ या लोककला प्रकाराला लोकाश्रय लाभलेला असून शासनाने ही महाराष्ट्राची लोकसंस्कृती जतन व्हावी यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. नाट्याभिव्यक्तीची अनेक वैशिष्ट्ये असणारा गोंधळ हा कलाप्रकार आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. तो सांभाळायला हवा, जोपासायला हवा.

[email protected]

(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)