नाट्यरंग – सुवर्ण महोत्सवी ‘महानिर्वाण’

>> हिमांशू भूषण स्मार्त

काही नाटके आदिबंधांसारखी अर्थसमुच्चय होतात. त्यांच्या संवादांची उधृते होतात. त्यांच्या मंचन पद्धतीच्या शैली होतात. त्यांनी दिलेली जीवनदृष्टी पिढ्या प्रभावित करते. सतीश आळेकरांचेमहानिर्वाणहे असेच नाटक आहे. 1974 सालीमहानिर्वाणचा पहिला प्रयोग झाला आणि आजही त्याचे प्रयोग होत आहेत

कुठलेही नाटक एकदा लिहिले-केले गेले की ते पन्नास वर्षांचे होणारच असते. त्यासाठी केवळ कॅलेंडरची पाने उलटावी लागतात, परंतु काही नाटके अशी असतात की, त्यांचे पन्नाशीत येणे एकूण रंगभूमीचेच वय वाढण्यासारखे असते. अशी नाटकेही नाटके म्हणून तर रंगभूमीला समृद्ध करतातच, परंतु ती करून पाहणे, त्यांच्या निर्मिती प्रािढयेत सहभागी होणे हा रंगकर्मींसाठी एक कायापालटाचा अनुभव असतो. ही नाटके आदिबंधांसारखी अर्थसमुच्चय होतात. त्यांच्या संवादांची उधृते होतात. त्यांच्या मंचन पद्धतीच्या शैली होतात. त्यांनी दिलेली जीवनदृष्टी पिढ्या प्रभावित करते. आळेकरांचे ‘महानिर्वाण’ हे असेच नाटक आहे. 1974 साली ‘महानिर्वाण’चा पहिला प्रयोग झाला आणि आजही त्याचे प्रयोग होत आहेत.

‘महानिर्वाण’च्या योगदानावर स्वतंत्र ग्रंथनिर्मितीही झालेली आहे. ‘महानिर्वाण’ने मराठी रंगभूमीला काय दिले? याची गणती छोट्या टिपणात करता येणार नाही, परंतु उपलब्ध अवकाशात ‘महानिर्वाण’च्या काही शक्तिस्थळांचा विचार आपल्याला जरूर करता येईल. खरे पाहता ‘महानिर्वाण’ची सगळी शक्तिस्थळे परस्परांत विरघळून जो अनुभव निर्माण झालेला आहे तोच ‘महानिर्वाण’ला ‘महानिर्वाण’ बनवतो. ज्या काळात नटकेंद्री रंगभूमीची संकल्पना मराठीत फारशी चर्चिली जात नव्हती, त्या काळात ‘महानिर्वाण’ने नटांचे आवाज आणि शरीर हे नाट्यानुभवाची प्रमुख माध्यमे मानून नाट्यानुभव उभा केला. नटांच्या शरीरांमधून साकारणारे आकृतिबंध आणि वृंदरचना ‘महानिर्वाण’च्या रचनेत अनन्यसाधारण महत्त्वाच्या आहेत. नटांच्या आवाजाचे पोत, तीव्रता, प्रकृती यांच्या विणीतून ‘महानिर्वाण’चे श्राव्य विणले जाते. शरीरांमधून साकारणाऱ्या दृकरचना आणि आवाजांच्या विणीतून साकारणारे श्राव्य ‘महानिर्वाण’च्या नाटकीयतेला स्वतंत्र, आगळे रूप देते. दृश्य अनुभवामधील दृतता, संथता, स्थिती, गती यांच्या असंख्य अवस्था ‘महानिर्वाण’मध्ये निर्माण होतात. उदाहरणार्थ; भाऊंच्या मृत्यूवेळी नाना अनुपस्थित असल्याने पुढच्या विधींसाठी चाळकरी नानाची वाट पाहत आहेत. एक चाळकरी उंचावरून दुर्बिणीतून ‘नाना आला का?’ हे पाहत आहे. या वाट पाहण्याच्या अवस्थेत एक घट्ट स्थितीशीलता-जडता भरलेली आहे. अचानक नाना येताना दिसतो आणि चाळकऱ्यांमध्ये हळूहळू गती भरायला सुरुवात होते. नाना येताच या गतीचा जणू काही स्फोट होतो आणि एक अत्यंत तीव्र क्रीडासदृश्यता नाटकात निर्माण होते.

‘महानिर्वाण’मध्ये कोणतेही स्थिर नेपथ्य नाही. त्यामुळे मंचावर कोणत्याही स्थळाचा विशिष्ट स्वभाव स्थिरावत नाही. स्थळे निर्माण होतात, पण त्यांचे कंगोरे काटेकोर नसतात. ती एकाच वेळी असतातही आणि नसतातही. मंचावकाशदेखील रिक्तता आणि घनता यांमध्ये सतत आंदोळत राहते. ना रिक्तता स्थायी असते, ना घनता. हेच ध्वनींच्या अनुभवाबाबतीतही घडते. ‘महानिर्वाण’मध्ये बोल भाषेच्या ध्वनी अनुभवासोबत गायकीचे ध्वनी अनुभवही आहेत. या गायकीच्याही प्रमाणबद्ध आणि अनघड अशा दोन तऱ्हा आहेत. या दोन तऱ्हा प्रेक्षकांच्या दोन भिन्न सहजाणिवा छेडतात. परंतु त्यांची नाटकांमधली योजना अशी आहे की, प्रेक्षक कुठल्याच सहजाणिवेत रमत नाहीत. सहजाणीवा छेडल्यामुळे परिचयात्मकता तर साधते, पण प्रेक्षक त्यात रमण्याआधीच गायकीच्या दुसऱ्या तऱहेने त्याला रमण्यातून बाहेर खेचले जाते. त्यामुळे गायक गायकी नॉस्टॅल्जियाकडे नेत नाही. आळेकरांनी लेखक-दिग्दर्शक म्हणून जे नाट्यरूप कल्पिले असेल, त्यामध्ये मानवी जीवनामधल्या नाना तऱहेची वर्तने सरमिसळून एक रूप आकारले असणार. कीर्तनासारख्या पारंपरिक धर्मसंबद्ध सादरीकरण प्रकारापासून ते क्रीडासदृश्यतेपर्यंत आळेकरांनी जीवनामधल्या अनेक तऱ्हाची दृकश्राव्यता नाटकात आणली, परंतु असे करत असताना स्वतच्या नाटकीयतेचे संस्कार करून या दृकश्राव्यतेमुळे येऊ शकणारी, अतिपरिचयात अवज्ञाही टाळली. याचमुळे जीवनाकडून घेतलेली सामग्री जीवनाची तर राहिलीच, पण अनन्यपणे नाटकाचीही झाली.

‘महानिर्वाण’च्या आशयाविषयी आजवर खूप बोलले गेले आहे. परंपरेचे अतिघट्ट पीळ आणि असे पीळ बसण्यामागची मठ्ठ स्थितीशीलता एकीकडे आणि हा पीळ सैलावण्यासाठी धक्के देणारी-प्रसंगी वाट बघणारी नवता एकीकडे हे ‘महानिर्वाण’चे दोन ध्रुव आहेत. भाऊंच्या मृत्यूने रिकाम्या झालेल्या जागेत नाना मुसंडी मारून येतो, पण भाऊंच्या पार्थिवाने ती जागा अडवलेली आहे. एका चिवट रूढीग्रस्ततेमधले चैतन्य संपलेले असले तरी त्याच्या मृत शरीराने जागा अडवलेली आहे. दुसरीकडे, भाऊंना मृत्यूनंतर जळण्यासाठी एक पारंपरिक दिलासा हवा असतो तोही नष्ट झालेला आहे. त्यामुळे त्यांना तथाकथित मुक्ती मिळणार नाही. भाऊंचा मृत्यू अत्यंत उपरा-अप्रस्तुत ठरलेला आहे. रमेला-नानाला मुक्तता दिसते आहे, परंतु ती मिळवणे सोपे नाही. आळेकरांनी ज्या काळात ‘महानिर्वाण’ लिहिले-दिग्दर्शित केले, तो कालखंड एकूणच मराठी कला व्यवहारामधला-साहित्यामधला-नाटकामधला क्रांतिकारी स्थित्यंतराचा काळ होता. ‘कोसला’ने साहित्य जगत ढवळून-हादरून गेलेले होते. ‘कोसला’चा नायक अनागराकडून नागराकडे येतो आणि ‘महानिर्वाण’चा नाना नगराकडून महानगराकडे जाणार असतो. या प्रवासात नाना पडझडी, मूल्य संघर्ष होणार असतात. नैतिकता कूस पालटणार असते. जीवनामधले पसंपाम ठरवणाऱ्या व्यवस्था बदलणार असतात. एक छोटी, सुबक जीवन व्यवस्था जाऊन जीवनशैलीच्या दबावांचा स्फोट होणार असतो. ‘महानिर्वाण’ एक जीवनशैली, मूल्य व्यवस्था, नैतिकता अप्रस्तुत होताना आणि नव्याने त्याची जागा घेतानाची तीव्र झटापट मांडते. त्यासाठी नाटकाची एक अनवट शैलीही निर्माण करते. याचमुळे ते विशिष्ट काळाचेही होते आणि कालातीतही.

[email protected]

(लेखक नाट्यक्षेत्राचे अभ्यासक आहेत)