प्रासंगिक: प्राचीन संस्कृतीचे प्रतीक – महाकुंभमेळा

>> सुनील कुवरे

भारताच्या प्राचीन संस्कृतीचे प्रतीक असलेला आणि जगातील सर्वात मोठा धार्मिक असा महाकुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत साजरा होणार आहे. या वर्षीचा कुंभमेळा हा महापुंभमेळा आहे. दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथे कुंभमेळे होतात. बारा कुंभमेळ्यांचं एक चक्र पूर्ण झाल्यानंतर महाकुंभ आयोजित केला जातो. म्हणून 144 वर्षांनी येणारा हा दुर्मिळ क्षण मानला जातो. हिंदू धर्मात स्नानाला फार महत्त्व आहे. शाही स्नानाचा आणि आध्यात्मिक जगाचा परिचय करून घेत अभ्यास करणे हा जगासाठी औत्सुक्याचा विषय ठरतो. गंगा, यमुना आणि सरस्वती अशा तीन पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील हा उत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम म्हटला पाहिजे. भारताच्या प्राणशक्तीचा हुंकार या कुंभमेळ्यातून निनादतो.

हिंदू धर्मामध्ये कुंभमेळ्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. अनेक शतकांची परंपरा असलेल्या या महाकुंभमेळ्याचा मूळ उद्देश खूप उदात्त स्वरूपाचा आहे.

आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातही कुंभमेळ्याचे आकर्षण कायम आहे. तसेच युनेस्कोने 2017 मध्ये कुंभमेळ्याला मानवजातीचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिल्यापासून हा सोहळा जगभरातील लोकांसाठी आकर्षण बिंदू ठरला आहे. महाकुंभमेळ्याचे आयोजन केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही, तर ते सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. आता बदलत्या काळानुसार कुंभमेळ्यातही मोठे बदल घडत आहेत, परंतु या महाकुंभमेळ्यात गर्दीचे नियोजन महत्त्वाचे आहे. यासाठी राज्य सरकारने केलेली व्यवस्था वादग्रस्त ठरली आहे. स्वच्छता, सुरक्षितता, स्वास्थ्य, आस्था या चारही गोष्टींवर लक्ष केंद्रित करून सुविधा निर्माण केल्या. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, या महाकुंभमेळ्यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यामुळे राज्याच्या जीडीपीमध्ये वाढ होणार आहे. पूर्वी उत्तर प्रदेशाची अर्थव्यवस्थेची ओळख शेती होती. आज धार्मिक पर्यटन ही ओळख उदयास येत आहे, परंतु कुंभमेळ्याचे बाजारीकरण होऊ नये. या महाकुंभमेळ्यानंतर 2027 मध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱया सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेध लागलार आहेत. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतार्ंलगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हे नाशिकच्या आध्यात्मिक परंपरेचे सर्वात मोठे निदर्शकही आहे. नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ब्रँडिंग होणे आवश्यक आहे. तेव्हा आताचा कुंभमेळा हा महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱयांसह सरकार आणि अभ्यासक यांच्यासाठी वस्तुपाठ ठरावा.

या महाकुंभमेळ्यामुळे अर्थकारणालाही मोठी गती प्राप्त होणार आहे. काही तज्ञ आणि संस्थांच्या मते यंदाच्या या मेळाव्यात सुमारे दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. ही मोठी उलाढाल अर्थकारणाला गती प्राप्त करून देणारी आहे. रोजगाराला चालना मिळेल. यात पर्यटनाचा मोठा वाटा असेल. आताच्या या महाकुंभमेळ्यामुळे भारताची प्राचीन संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखित केले.