आभाळमाया – मॅजेलॅनिक ‘मेघ’

>> वैश्विक, [email protected]

हिंदुस्थानच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारी आहे. तिथे तीन सागरांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र आपल्या देशाच्या दक्षिण टोकाला मिळतात. तिथल्या विवेकानंद शिलास्मारक किंवा थिरुवल्लुवर यांच्या पुतळय़ाजवळून आपण देशाच्या ‘मेन लॅण्ड’च्या बाहेरून देशाचे संपूर्ण दक्षिण टोक पाहू शकतो. तिथे आणखी एक छान गोष्ट दिसते ती म्हणजे, पौर्णिमेचा चंद्र पूर्व समुद्रातून वर येत असताना तिकडे पश्चिम समुद्रात बुडणारा सूर्य दिसतो. हे दृश्य खूप मनोहारी असते. पण अमावास्येजवळच्या एखाद्या दिवशी दक्षिण टोकावर, सागरतटी उभे राहून आकाशाकडे नजर टाकली की, पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अनेक ठळक तारे दिसतात. सोबत दुर्बिण असेल तर उत्तमच त्यातून आपल्या आकाशगंगा दीर्घिकेच्या उपदीर्घिका किंवा ‘सॅटेलाइट’ गॅलॅक्सी असलेले लार्ज मॅजेलॅनिक क्लाऊड आणि स्मॉल मॅजेलॅनिक क्लाऊडसुद्धा दिसतात. त्यांना खागोल अभ्यासक संक्षेपाने ‘एलएमसी’ आणि ‘एसएमसी’ म्हणून ओळखतात. ते नुसत्या डोळय़ांनीही दिसतात.

या दोन छोटय़ा दीर्घिकांविषयी आज थोडंसं. कारण कन्याकुमारी येथून दक्षिण गोलार्धातील आकाश पाहण्याचा आणि दुर्बिणीतून या दोन उपदीर्घिका न्याहाळण्याचा योग अनेकदा आला आणि प्रत्येक वेळी तेवढाच आनंद मिळाला. या दोन अनियमित ड्वार्फ किंवा खुज्या दीर्घिका असून त्या आपल्या आकाशगंगेभोवती परिक्रमा करतात म्हणून त्यांना आपल्या सॅटेलाइट म्हणजे उपग्रहासारखं भ्रमण करणाऱया दीर्घिका असे म्हटले जाते. त्यासुद्धा स्थानिक दीर्घिका गटाच्या ‘सभासद’ आहेत. त्यांना मॅजेलॅनिक स्पायरल अथवा सर्पिलाकृती दीर्घिकाही म्हटले जाते.

लार्ज मॅजेलॅनिक क्लाऊड दीर्घिका आपल्यापासून 163 तर स्मॉल मॅजेलॅनिक क्लाऊड 206 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. आपल्याकडून या दीर्घिका देशाच्या दक्षिण टोकावरून दिसण्याचे कारण म्हणजे कन्याकुमारी हे ठिकाण उत्तर गोलार्धातल्या केवळ आठ अक्षांशावर आहे. (मुंबई 19 अक्षांशावर आहे.)

या दीर्घिकांचा प्राचीन उल्लेख चिलीमध्ये सापडतो. अरेबिक खगोल अभ्यासकांनीही त्याची नोंद केली आहे. या नोंदी इ.स. 889 ते 964 पर्यंतच्या आहेत असे म्हटले जाते. युरोपीय लोकांना या खुल्या दीर्घिकांविषयी समजले ते सोळाव्या शतकात. दोन इटालियन संशोधकांनी, पोर्तुगीजांच्या प्रवासवर्णनावरून ही माहिती घेतली. त्याच काळात 1519 ते 22 या तीन वर्षांत फर्निनाण्ड मॅजेलॅन यांनी बोटीतून पृथ्वी परिक्रमा करताना पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून दिसणाऱया या दीर्घिका पाहिल्या. मात्र त्याविषयी त्यांनी फारसं कुठे सांगितले नाही. कालांतराने फ्रेंच खगोल अभ्यासक लॅसेली यांनी 1756 मध्ये अवकाश नकाशा तयार केला. त्यात त्या दीर्घिकांचा उल्लेख मोठा-छोटा मेघ (क्लाऊड) असा केला.

त्यानंतर जॉन हर्षल यांनी दक्षिण आफ्रिकेतून या दोन ‘ढगांचे’ निरीक्षण केले आणि 1847 मध्ये ‘एलएमसी’मध्ये 919 तर ‘एसएमसी’मध्ये 244 खगोलीय ‘वस्तू’ (तारे) असल्याचे म्हटले. 1867 मध्ये क्लिवलॅण्ड ऍबे यांनी हे दोन ‘मेघ’ म्हणजे आपल्या आकाशगंगेभोवती फिरणाऱया सॅटेलाइट गॅलॅक्सी असल्याचे म्हटले. हर्टप्रन्ग यांनी 1913 मध्ये या दीर्घिकांची अंतरे ठरवली ती 1912 मध्ये ‘सेफिड’ रुपविकारी ताऱयांसाठी लिविट यांनी मांडलेल्या गणितावरून.

आकाशगंगा आणि या सॅटेलाइट दीर्घिकांमधले अंतरही सुमारे 75,000 प्रकाशवर्षे इतके प्रचंड आहे. 1994 मध्ये धनु राशीसमूहातली खुजी दीर्घिका सापडेपर्यंत हे दोन ‘क्लाऊड’च आकाशगंगेच्या सर्वात जवळच्या दीर्घिका असल्याचे मानले जात होते. प्रत्यक्षात ‘एलएमसी’ आपल्यापासून 160,000 प्रकाशवर्षे आणि ‘एसएमसी’ 200,000 प्रकाशवर्षे अंतरावर असून मोठा मॅजेलॅनिक क्लाऊड छोटय़ापेक्षा 70 टक्के अधिक विस्तारलेला दिसतो. एलएमसीचा व्यास 32,200 तर ‘एसएमसी’चा 18,900 प्रकाशवर्षे आहे. अद्यापही या दोन्ही खुज्या दीर्घिकांचं निश्चित वस्तुमान किती ते समजलेले नाही.

या दोन दीर्घिका ‘लहान’ म्हटल्या तरी आपल्या आकाशगंगेसह असलेल्या 50 दीर्घिकांच्या यादीत ‘एलएमसी’चा क्रमांक चौथा लागतो. त्यावरून या दीर्घिका कधीच आकाशगंगेचा भाग नाही असे सांगितले जाते. यापैकी छोटा ‘मेघ’ मोठय़ा ‘मेघां’भोवती फार पूर्वीपासूनच परिक्रमा करत असल्याचे दिसते.

याशिवाय आपल्या आकाशगंगेच्या आणि या दीर्घिकांच्या रचनेतही फरक आहे. त्यांच्यात वायूंचा साठा प्रचंड आहे आणि त्यात हायड्रोजन, हिलियमचे प्रमाण बरेच आहे. त्यांच्यामध्ये धातूंचा अभाव असून त्यातील तारे आपल्या आकाशगंगेतील सूर्याच्या तुलनेत फक्त 0.5 ते 0.25 टक्केच धातूसंपन्न आहेत. आता असेही म्हटले जातेय की, ‘स्मॉल मॅजेलॅनिक क्लाऊड’चे तुकडे होऊन त्यातील एक तुकडा म्हणजे ‘मिनी मॅजेलॅनिक क्लाऊड’ (एमएमसी) आहे. यातील तांत्रिक माहिती लक्षात नाही राहिली तरी केव्हा तरी देशाच्या दक्षिण टोकावर जाऊन या सॅटेलाइट दीर्घिकांचे दर्शन निश्चित घ्या!