मुद्दा – चंदन सुगंधीत अभिनय

>> प्रिया भोसले

गोऱ्या रंगाचं अप्रूप असणाऱ्या भारतीयांना इथल्या मातीने दिलेला सावळा रंग कधी पचनी पडला नाही. सावळ्या रंगाची स्त्री म्हणजे सौंदर्याच्या मापदंडात न बसणारी. हे समीकरण असंच चालत राहिलं असतं, जर तो रंग लाभलेल्या अनेक कर्तबगार स्त्रियांनी विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला नसता आणि रंगापलीकडचं सौंदर्य व कलेच्या आविष्काराची ओळख करून देण्यात यशस्वी ठरल्या. यात अतिशय देखणं नाव येतं ते म्हणजे…नूतन !

आई शोभना समर्थच्या झळाळणाऱ्या सौंदर्यासोबत तुलना करून  कित्येकांनी या सावळ्या, कृश मुलीकडे पाहून नाके मुरडली, पण पुढे जाऊन बदकातल्या पिलांमधली ती राजहंस निघाली! नव्हे, तिने ते सिद्ध केलं. ख्यातनाम अभिनेत्री शोभना समर्थ आणि दिग्दर्शक कुमारसेन समर्थ यांची नूतन लेक. अभिनयाचा वारसा मिळालाच होता. त्यात ‘बंदिनी’, ‘सुजाता’सारख्या चित्रपटांनी तिच्यातल्या उत्तम अभिनेत्रीवर शिक्कामोर्तब केलं. जवळजवळ चार दशपं या गुणी अभिनेत्रीने आपल्या सशक्त अभिनयाने पुरुषप्रधान असलेल्या चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला.

मिठाईला लाजवेल इतका आवाजातील गोडवा, पह्टोजेनिक चेहरा आणि चेहऱ्यावरचे मधाळ भाव असं जबरदस्त मिश्रण लाभलेल्या नूतनचा नैसर्गिक अभिनय खुलला तो  बलराज सहानीसोबतच्या ‘सीमा’ या तिच्या पहिल्याच चित्रपटात.या चित्रपटाने नूतनला फक्त पुरस्कार दिला नाही, तर उत्तम अभिनेत्री म्हणून चित्रपट जगतात एक अढळ स्थान दिलं. बिमल रॉय यांना ‘बंदिनी’साठी फक्त नूतनच हवी होती. जर तिने ती भूमिका करायला नकार दिला असता तर ते ‘बंदिनी’ चित्रपटाचा विचार सोडून देणार होते. नूतनचा  ‘बंदिनी’ चित्रपटातील अभिनय बघताना रॉय यांचा निर्णय किती योग्य होता ते अक्षरशः पटतं. नूतन इतकी त्यातल्या  भूमिकेशी एकरूप झाली होती. एका मुलाखतीत नूतननेच म्हटलं होतं, ‘‘कोणतीही भूमिका साकारताना त्यात स्वतःला कल्पून अभिनय केल्यामुळे लोकांना त्या भूमिका नैसर्गिक वाटल्या.’’

नूतनला जितके चित्रपट मिळाले त्यात तिच्यासाठी खास भूमिका लिहिल्या गेल्या होत्या. नायिकेची सशक्त भूमिका असो अथवा नंतर मिळालेली चरित्र अभिनेत्रीची भूमिका असो, नूतनचं स्थान नेहमीच महत्त्वाचं राहिलं.

त्या भूमिकेतलं वैविध्यही किती लक्षणीय! अगदी पहिल्या ‘सीमा’ चित्रपटापासून हा सिलसिला सुरू होता. तिने साकारलेल्या भूमिकेतलं ते वैविध्य तसं कुणाच्याच वाटय़ाला आलं नाही. मग ते ‘बंदिनी’, ‘सीमा’, ‘सुजाता’, ‘सरस्वतीचंद्र’ असे सामाजिक आशय असलेले स्त्राrप्रधान चित्रपट असोत अथवा देव आनंद, राज कपूर यांच्या सोबतचे चित्रपट असोत, तिच्या भूमिका नायकाइतक्याच महत्त्वाच्या असायच्या.

एका विशिष्ट वयानंतर चरित्र भूमिका करताना इतरांच्या वाटय़ाला फारसा वाव नसलेले चित्रपट येण्याचा प्रघात असताना नूतन मात्र मध्यवर्ती भूमिकेत दिसत होती. ‘सौदागर’, ‘मै तुलसी तेरे आंगन की’, ‘कर्मा’, ‘मेरी जंग’, ‘नाम’सारखे चित्रपट नूतनचं महत्त्व अधोरेखित करतात.

तिच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडित काही विवादास्पद घटनांचीही तेव्हा फार चर्चा झाली होती, पण तरीही तिची प्रतिमा कधी डागाळली नाही. अशा घटनांना तिची ही दुसरी बाजू असणार असं तेव्हा प्रत्येकाला वाटण्यात पडद्यावर दिसणाऱ्या नूतनच्या मृदू, ऋजु व्यक्तिमत्त्वाचा मोठा वाटा होता. नूतनने तिची दुःखे कधीच जगासमोर येऊ दिली नाहीत. मात्र ललिता ताम्हाणे यांच्या ‘असेन मी नसेन मी’ पुस्तकात दुःखाची सल बाळगणारी, मृत्यूची चाहूल लागल्यानंतर ‘‘आता सुटेन मी’’ म्हणणारी नूतन तिच्या चाहत्यांच्या तिच्याविषयी ममत्व वाटणाऱ्या विचारांना तिच्या भावनाप्रधान व्यक्तिमत्त्वाची बाजू दर्शविणारी ठरली. व्यक्ती चांगली अथवा वाईट नसते, काही वेळा एखादी कृती परिस्थितीसापेक्ष ठरते म्हणतात ते उगाच नाही.

असं म्हणतात, तिच्या तळहाताला चंदनाचा मंद सुगंध यायचा. ‘सरस्वतीचंद्र’मधलं ‘चंदन सा बदन चंचल चितवन’ गाणं जणू काय याचाच संदर्भ घेऊन लिहिलं असावं अशी शंका मनात येते. फक्त तळहात कशाला, ती स्वतःच चंदनाचा सुगंध दरवळणारा अभिनय क्षेत्रातील महाकाय वृक्ष होती. 21 फेब्रुवारी नूतनचा स्मृतिदिन. तिला जाऊन 34 वर्षे झाली, पण तिने साकारलेल्या अनेकोत्तम भूमिकांतून तो चंदनाचा परिमळ आजही दरवळतो.

[email protected]