पृथ्वी गोल आहे, त्यामुळे तिला शेवटचे टोक नाही असे म्हणतात. मात्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारे अनेक रस्ते, महामार्ग आणि आंतरराष्ट्रीय मार्गदेखील आहेत. जगभरात लाखो करोडोंच्या संख्येने असलेल्या या रस्त्यांपैकी शेवटचा रस्ता कोणता असेल असा विचार कधी केला आहे? जगात असादेखील एक रस्ता आहे, ज्याला पृथ्वीवरील शेवटचा रस्ता असे म्हणले जाते आणि तो संपतो तिथे शेवटचे टोक आहे असे मानले जाते. नॉर्वेमध्ये असलेल्या या शेवटच्या रस्त्याचे नाव इ-69 असे आहे. याला नॉर्वेमधील शेवटचा रस्ता असेदेखील म्हणले जाते. इथे पोहोचणे चंद्रावर पोहोचण्याइतके अवघड आहे असे सांगतात.
युरोप खंड उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ आहे आणि या खंडाचे शेवटचे टोक नॉर्वेमध्ये आहे. या शेकडो वर्षे काहीशा अलिप्त असलेल्या भागाला जगाशी जोडणारा इ-69 हा एकमेव रस्ता आहे. हा रस्ता अभियांत्रिकीचा एक मोठा चमत्कार आहे. एक शतकापूर्वी म्हणजे 1908 साली या महामार्गाच्या कल्पनेचा जन्म झाला. मात्र तो बनता बनता 1999 साल उजाडले. उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ असल्याने थंडीच्या काळात हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो. तसेच एकट्याने या मार्गावर प्रवास करायला बंदी घालण्यात आली आहे.
जगाच्या एका टोकाला राहणाऱ्या आणि समुद्रातील मासे, खेकडे यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना आधुनिक जगाशी जोडणारा रस्ता असे या रस्त्याचे वर्णन केले जाते. उत्तर ध्रुवाच्या प्रदेशात असल्याने निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या या भागात उन्हाळय़ात सूर्य कधी मावळत नाही आणि हिवाळ्याच्या काळात रात्र संपत नाही. अनेक कलाकारांना हा प्रदेश खुणावत असतो, इथे कलेला एक वेगळा बहर येतो असे अनेक कलाकारांना वाटते. या अनोख्या प्रदेशात अनेक चित्रपटांचे चित्रीकरणदेखील पार पडलेले आहे. इथे एक संग्रहालय आणि भूमिगत चर्चदेखील आहे.
स्पायडरमॅन