परीक्षण- कोकणातील मातीच्या कथा

>> श्रीकांत आंब्रे

ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर यांचा ‘निराधार’ हा तिसरा कथासंग्रह त्यांच्या ‘चैत्र वैशाख’ आणि ‘मंतरलेली माती’ या दोन कथासंग्रहाइतकाच प्रभावी आहे. शहरी असो वा कोकणचं निसर्गरम्य वातावरण, त्यात पूर्णपणे झोकून देऊन त्यांच्या कथा साकारतात. मुळात मानवतावादी दृष्टिकोन, सानेगुरुजींच्या संस्कारांतून आलेली सेवाभावी वृत्ती, अथपासून इतिपर्यंत वाचकाला खिळवून टाकणारी सुपरफास्ट लेखनशैली यामुळे या कथा वाचकाला आकृष्ट करून घेणाऱया तसेच वेगवेगळय़ा विषयांवरील वेगवेगळे आशय व्यक्त करणाऱया आहेत.

कोकणातील शेतकरी आत्महत्या करीत नाहीत. ते कोणत्याही आर्थिक आणि नैसर्गिक समस्येमुळे न खचता त्या परिस्थितीतून पुन्हा उभे राहतात हे कोकणवासीयांचे वैशिष्टय़ अनेक कथांमधून प्रत्ययास येते. तरीदेखील त्यांच्या व्यथा, समस्या, दुःख, दारिद्रय़ इत्यादींचे प्रत्ययकारी प्रतिनिधित्व करणारी ‘फास’ ही कथा वेधक आहे. कोकणात भुताखेतांच्या रंजक हकीकती मोठय़ा उत्साहाने रंगवून सांगितल्या जातात. कोकणात श्रद्धा-अंधश्रद्धा आणि दुर्गम भागातील रूढी, परंपरा, समजुती याबाबत विचार करायला भाग पाडणारी ‘कोल्हेकुई’ ही कथा आवर्जून वाचण्यासारखी आहे. काही शुभ-अशुभ गोष्टींचे संकेत पक्षी-प्राण्यांकडून मिळत असतात ते नाकारायची हिंमतही होत नाही, याचा प्रत्यय अशा कथांमधून येतो. ‘निराधार’ या कथेत दिसणारे वृद्धाश्रमातील सज्जन शेळकेबाबांच्या अगतिकतेचे दर्शन बऱयाच अंशी प्रातिनिधिक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या संग्र्रहामध्ये दोन विनोदी कथांचाही समावेश आहे. ‘हसे रोए आन्ड कंपनी’ ही शहरी जीवनातील संवेदनशील घटनांशी संबंधित कार्यरत असणाऱया मित्रांची खुमासदार कथा हास्यविनोदी अंगाने साकार होते, तर ‘धांदल्या पाटलाची गोष्ट’ ही एका तऱहेवाईक विक्षिप्त स्वभावाच्या माणसाची कथा उपहासात्मक विनोदी अंगाने निखळ मनोरंजन करते.

कोकणच्या शांत निसर्गरम्य वातावरणात संथ लयीत जगणाऱया माणसांचे वास्तव तसाच लोभस निसर्गही या कथांमधून दिसतो. शेतांचे हिरवे-पिवळे रंग, पळस पांगारे, लालगुलाबी फुलांची उधळण, झऱयांची कारंजी, तसेच थरारक पावसाची नाना रूपे दिसतात. कोकणातल्या या माणसांचे झपाटलेपण तिथल्या माणसात दिसते. कोकणी माणसांच्या या कथांमधील माणसांना तसा आधुनिकतेचा, विज्ञानाचा बडेजाव वाटत नाही, याचा प्रत्यय या कथा वाचताना येतो. लेखकाची कोकणच्या मातीशी जुळलेली नाळ यामुळे त्यांच्या रोमारोमात भिनलेल्या तिथल्या निसर्गाचे विभ्रम शब्दांकित होताना त्या शब्दांना विलोभनीय सौंदर्यसाज प्राप्त होतो. निसर्गाशी तादात्म्य पावलेले आणि त्याला मनोहारी शब्दरूप देणारे असे साहित्यिक व्यक्तिमत्व सद्यकाळात विरळच आहे. पात्रांचे स्वभावविशेष अचूक टिपण्याचे कसब त्यांच्या शैलीत आहे.

कथेत कुठेही पाल्हाळिकपणा नसतो. उत्सुकता वाढवत कथा पुढे सरकतात. कथेचा शेवटही ते ओढून ताणून करीत नाहीत. काही शेवट ते वाचकांवरच सोपवतात. त्यांच्या अनेक कथांमधून प्रेम या भावनेतील कातरताही किती हळूवार, नाजुकपणे व्यक्त होते ते पाहण्यासारखे आहे. उजाडण्यापूर्वी पहाटे येणाऱया वेगवेगळय़ा पक्ष्यांच्या आवाजांच्या संगीताने ते सुखावतात, निसर्गाच्या किमयेने भारावतात. कोकणी माणसाच्या घरातील बारीकसारीक तपशिलांसह ते घर साक्षात डोळय़ासमोर उभे करतात. कोणत्याही प्रसंगाचे हुबेहूब चित्रण करणारी त्यांची शब्दकळा चित्रमय आहे.

कथा या वाङ्मयप्रकारात आपल्या वेगळय़ा शैलीने स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे लेखक म्हणून त्यांनी कधीच रसिकमान्यता मिळवली आहे, हे त्यांच्या विविध वाङ्मयप्रकारातील एकवीस पुस्तकांवरून आणि विविध प्रतिष्ठित साहित्य-संस्थांनी त्यांना दिलेल्या अनेक सन्मान आणि पुरस्कारांवरून लक्षात येईल.

निराधार

लेखक ः अशोक लोटणकर.

प्रकाशक ः अमित प्रकाशन, पुणे

पृष्ठे ः 240, मूल्य ः रु. 470.