मोनेगिरी; कांचन परदेशी

>> संजय मोने

एखाद्याचं आयुष्य सिगारेटच्या झुरक्यासारखं असतं. अशी ‘फिक्र को धुएं में उडाता चला गया’ म्हणत जगणारी माणसं एकीकडे तर सावध हाका मारूनही कोणत्या ना कोणत्या अडचणीत गुरफटणारी मंडळी एकीकडे. कांचन परदेशी दुसऱ्या प्रकारातला पण तावून, सुलाखून बाहेर पडणारा. त्याला कमनशिबी म्हणावं की नशीबवान?

बेताल धुंद असतं. त्या धुंदीतही फिक्र… त्याच्या इतकं नशीब घेऊन, नशीब कसलं, इतकं कमनशीब घेऊन या जगात कोणी जन्माला आलं असेल असं मला वाटत नाही. तसं त्याला कमनशिबी माणूस म्हणता येणार नाही. कारण तो उत्तम आयुष्य जगतोय. अतिशय सुखी आहे. दोन घरं आहेत. एक मुंबईत, दुसरं मूळ गावी इंदोरला (किंवा इंदूरला. ज्याला जो उच्चार योग्य वाटेल तो ग्राह्य धरावा). मुलं दोन आहेत. सुदैवाने दोन्ही मुली आहेत. त्यामुळे तरुण मुलगा रात्री कधी घरी येईल? मुळात दुसऱ्या दिवशी सकाळीच येईल का? आला तर काय अवस्थेत असेल वगैरे चिंता त्याला कधीही वाटली नाही. दोघींचे उत्तम घरांत विवाह झाले आहेत. दोन्ही जावई अत्यंत आज्ञेत आहेत. घरी आले की, लगेच सासऱ्यांची लुंगी आपलीच आहे असं समजून हातपाय पसरून घरात लोळत नाहीत. तसा कांचन मस्त सुखी आहे. घरात कायम जेवणावळी म्हणता येईल असे प्रसंग वारंवार घडतात. संगीत, रंगीत पाणी, सामिष आणि फक्त सामिष भोजन असतं. कांचनची बायको अन्नपूर्णा आहे. गाडय़ा, उत्तम उत्पन्न, उत्कृष्ट शरीरसंपदा सगळ्यांना लाभलेल्या आहेत. तरीही कांचन परदेशी कमनशिबी म्हणून ओळखला जायचा. असं का? कारण त्याने आखलेल्या सगळ्या कल्पनांना सुरुंग लागतो. अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीत त्याचं नशीब आडवं यायचं.

कॉलेजमध्ये नवीन आल्यावर एखादी सिगारेट बरेच जण सुरू करतात, पुढे जाऊन बरेचसे सोडतात. काही लग्नानंतर सोडतात, काहीजण विशिष्ट वयात सोडतात. काहीजण आजारामुळे थांबवतात… पण कांचनच्या बाबतीत पहिलीच सिगारेट शेवटली ठरली. चोरून ओढलेला पहिलाच झुरका काकांच्या तोंडावर सोडला गेला. धूम्रपानामुळे ओठ काळे व्हायच्या आधीच लालेलाल गाल घेऊन तो घरी आला. आल्यावर त्याच्या पालकांनी त्याची उत्तरपूजा बांधली ती निराळीच. इतर सगळे मित्र सुखात दोन-पाच वर्षं धूम्रपान करून थांबले. त्यातल्या कोणाच्याही गालावर कोणी ठेवून दिली नाही. शेवटच्या वर्षाच्या परीक्षेच्या शेवटच्या पेपरला जाताना त्याची रिक्षा उलटली. पेन, पेन्सिली चिरडून गेली. कसातरी पेपर लिहिला त्याने. तो उत्तम गेला म्हणून आनंदात घरी जाताना त्याला एका सायकलवाल्याने उडवलं. बारीक हाड मोडलं आणि अख्खी सुट्टी प्लास्टरमध्ये पाय ठेवून तो झोपला होता. पुढच्या शिक्षणाला तो परदेशात जायला निघाला. विमानतळावर गेला आणि त्याची फ्लाईट जवळपास चुकलीच होती. कारण कुठल्या तरी अशिक्षित मंत्र्याचा परदेश दौरा होता म्हणून सगळी वाहतूक थांबवली गेली होती. नेमका तो मंत्री त्याच्याच फ्लाईटला होता म्हणून कांचन बचावला गेला.

शिक्षण घेऊन तो हिंदुस्थानात परत आला. कधी चित्रपट बघायला गेला तर त्याच्या आधीच्या माणसाचं तिकीट काढून झालं की, कांचनच्या तोंडावर खिडकी बंद होऊन ‘हाऊसफुल’चा बोर्ड यायचा. मुलगी बघायला तो घरच्यांबरोबर गेला. शेलार आडनाव होतं मुलीचं. हा गेला, मुलगी पाहिली. पुढची बोलणी करायला शेलार कुटुंबीय आले. बरोबर मुलगीही होती. कांचनने तिला पाहिलं.
‘‘आई! ही ‘ती’ मुलगी नाही.’’
‘‘अरे कांचन हीच ‘ती’’
मायलेकांची कुजबुज वाढत गेली आणि सगळा उलगडा झाला. कांचन जेव्हा मुलगी बघायला गेला होता तेव्हा घरात तिची मैत्रीण होती. तिला कांचनने पसंत केलं होतं. वेळेवर कळलं म्हणून बरं झालं.

पुढे लग्न ठरलं. लग्नाच्या आदल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू झाली. साधारण 1200 माणसं बोलावली होती. त्यातले घरचे धरून फक्त जेमतेम दीडशे माणसं पोहोचू शकली. नवराबायको चिंब भिजले होते. स्टेजवर रंगीबेरंगी आरास केली होती. त्याचा रंग दोघांच्या अंगावर उडाला होता. साधारण रंगपंचमीचं वातावरण निर्माण झालं होतं. ढीगभर जेवण उरलं. सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळाबाहेर बसलेल्या लोकांना रात्रभर नवविवाहित जोडपं अन्न वाटत फिरत होतं. त्यात कोणीतरी नव्या बायकोच्या हातातली बांगडी चोरली. मग रडारड, वाद, पोलीस चौकी… सगळे प्रकार झाले. शेवटी बांगडी कांचनच्या कोटाच्या खिशात सापडली.

मग दोघे मधुचंद्र साजरा करायला गेले. तिथे एका स्थानिक पुढाऱ्याला एक वर्षभराने जामीन मिळाला होता. आपल्याकडे एकदा जामीन झाला की, माणूस निर्दोष असल्यासारखा फिरायला मोकळा असतो. इथे तर पुढारीच होता. त्याने तिथली सर्व हॉटेल्स बुक करून टाकली. कांचन निराधार अवस्थेत उलट पावली घरी परत आला. अशा अनेक गोष्टी घडत होत्या. एक किलोमीटरसुद्धा न चाललेली नवीकोरी गाडी शोरूमबाहेर काढताना दारात समोरून एका दुसऱ्या गाडीने धडक दिली. त्या काळात अपघात झाला की, चालक स्वत कबूल करायचा. आतासारखं दुसराच माणूस होता म्हणून त्याच्या अंगावर सगळं ढकलून टाकायची प्रथा सुरू झाली नव्हती. ताबडतोब चूक कबूल करून समोरच्याने सगळी भरपाई केली. पण बुक केलेली तीच गाडी त्याला मिळाली नाही. घरच्या चाव्या, लायसन्स, पासपोर्ट हरवणं वगैरे कांचनच्या खात्यात किरकोळ गोष्टी होत्या, पण तो सगळ्यातून बचावून बाहेर पडला.

एकदा कामासाठी एका हॉटेलात उतरला होता. खोली नंबर 6! तो ‘6’ नंबर त्याचा स्क्रू सैल झाल्याने उलटा लटकत होता. त्यामुळे दिसताना ती खोली 9 नंबर दिसत होती. कांचन कपडे बदलत असताना दारावर टकटक झाली आणि पोलीस आत घुसले. कांचनच्या अंगावर फक्त टॉवेल होता. त्या हॉटेलात गैरप्रकार होतात म्हणून धाड टाकली होती. कांचनच्या अंगावर फक्त टॉवेल होता. अनेक प्रकारांनी विनवणी केल्यानंतर पोलिसांना कांचन खरं बोलतोय हे पटलं होतं. हे सगळं सुरू असताना त्याने बायकोला फोन लावला होता. मोबाइलच्या दुसऱया बाजूने बायकोने सगळं संभाषण ऐकलं. नशीब तिचा कांचनवर विश्वास होता. नाहीतर… विचारसुद्धा करायला नको.

मध्यंतरी त्याने घर बदललं. बायको-मुली नंतर येणार होत्या. रात्री जाऊन त्याने मस्तपैकी आंघोळ केली. खुशीत येऊन त्याने सगळीकडे नजर फिरवली. तेवढ्यात दरवाजा वाजला असं त्याला वाटलं. त्याने जाऊन तो उघडला आणि त्याच्या पाठीवर दार बंद झालं. किल्ली, फोन, पैशांचं पाकीट…सगळं आतमध्ये. बिल्डिंग नवी, माणसं अनोळखी. रात्रभर तो तसाच बाहेर उभा राहिला. पहाटे पेपरवाला आला. त्याच्या मोबाइलवरून आम्हाला फोन केले आणि सकाळी जाऊन स्पेअर किल्लीने त्याचं घर उघडलं. पण सगळ्यात कडेलोट म्हणजे एकदा पुण्याहून मुंबईला येणारी रेल्वे घाट उतरताना चालक नसताना धावली होती. ती कर्जतला थांबली. अपघात, मनुष्यहानी होता होता वाचली आणि कांचन त्याच गाडीने प्रवास करत होता. आता कधी कधी वाटतं की, त्याला कमनशिबी म्हणावं की नशीबवान?
– sanjaydmone21@gmail