>> प्रतीक राजूरकर
देशाच्या राज्यघटनेने 75व्या वर्षात पदार्पण केले आहे. राज्यघटनेचे राखणदार असलेल्या सर्वोच्च न्याय संस्थेत 11 नोव्हेंबर रोजी देशाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून न्या. संजीव खन्ना हे पदभार स्वीकारणार आहेत. मावळते सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रथेप्रमाणे ज्येष्ठताक्रमानुसार न्या. संजीव खन्ना यांचे नाव सुचवले आहे. न्यायाधीश संजीव खन्ना यांचे वडील दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. 1985 साली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले. विशेष म्हणजे आणीबाणी काळातील एडीएम जबलपूर विरुद्ध शिवकांत शुक्ला या प्रकरणात अल्पमतातला एकमेव निकाल देणाऱ्या हंसराज खन्ना यांचे ते पुतणे आहेत. अनेक दशकांची विधी आणि न्यायिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातले सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत संजीव खन्ना हे दुसरे सदस्य आहेत. हंसराज खन्ना यांना सरन्यायाधीश पदावरून डावलल्याने त्यांनी 1977 साली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला. त्याच कुटुंबातील न्या. संजीव खन्ना राज्यघटनेच्या अमृत वर्षात सरन्यायाधीश पदावर विराजमान होतील हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल.
न्या. संजीव खन्ना यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीतच झाले. 1983 साली त्यांची वकील म्हणून दिल्ली बार कौन्सिलमध्ये नोंदणी झाली आणि त्यांचे विधी क्षेत्रात पदार्पण झाले. दिल्लीच्या तीस हजारी जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसायाला सुरुवात केल्यावर सोबतच त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात कंपनी कायदा, पर्यावरण कायदा, घटनातज्ञ म्हणून विविध प्रकरणे हाताळली. अनेक वर्ष संजीव खन्ना हे आयकर विभागाचे ज्येष्ठ विधिज्ञ होते. न्यायालयाचे मित्र, दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे वकील, दिल्ली उच्च न्यायालयात सरकारी वकील असा वकिली व्यवसायाचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. 22 वर्षे यशस्वीपणे वकिली व्यवसाय केल्यावर 2005 साली न्या. संजीव खन्ना यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. विधी क्षेत्रातून न्याय क्षेत्रात त्यांचे पदार्पण झाले. 2006 साली त्यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना न्या. संजीव खन्ना यांनी दिल्ली न्यायिक संस्था, दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद या संस्थांचे चेअरमन पदाची जबाबदारी हाताळली. 14 वर्षांच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाच्या अनुभवानंतर 18 जानेवारी 2019 साली न्या. संजीव खन्ना यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. देशाच्या सर्वोच्च न्याय संस्थेत पदार्पण झाल्यावर त्यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात झाली. पाच वर्षे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळल्यावर न्या. संजीव खन्ना हे देशाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांना सरन्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. 13 मे 2025 रोजी संजीव खन्ना सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होतील. वयाच्या 45व्या वर्षी न्यायिक क्षेत्रात सुरुवात केल्यावर न्या. संजीव खन्ना हे दोन दशकांनंतर देशाच्या सरन्यायाधीश पदावर विराजमान होणार आहेत.
न्या. संजीव खन्ना हे अनेक महत्त्वपूर्ण निकालांचे लेखक आहेत. अरविंद केजरीवालांना लोकसभा निवडणुकीवेळी अंतरिम जामीन देणाऱ्या न्यायपीठाचे न्या. खन्ना सदस्य होते. तपासात दिरंगाई होत असल्यास पीएमएलए कायद्यात अर्जदार जामिनासाठी पात्र ठरतो या आशयाचा निकाल न्या. खन्ना यांनी मनीष सिसोदिया प्रकरणात दिला. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून झालेल्या मतदानाचे 100 टक्के व्हीव्हीपॅट (मतदान पडताळणी कागद) पडताळणीची याचिकेतील मागणी फेटाळणाऱ्या न्यायपीठाचे ते सदस्य होते. इलेक्टोरल बॉण्ड असंविधानिक असल्याचा निकाल देणाऱ्या न्यायपीठाचे न्या. खन्ना सदस्य होते. सरन्यायाधीश म्हणून अनेक महत्त्वाच्या संविधानिक प्रकरणांची सुनावणी त्यांच्या पीठासमक्ष अपेक्षित आहे. पुढील सहा महिन्यांत सरन्यायाधीश म्हणून न्यायिक प्रशासकीय जबाबदारीसुद्धा त्यांच्या समक्ष असेल.