उद्योगविश्व- मालवणच्या लज्जतीची वाटचाल

>> अश्विन बापट

मूळचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय सांभाळत खाण्याच्या पदार्थांमध्ये आपल्या हातच्या चवीचे रंग भरले आणि चवीबरोबर पदार्थांचंही सौंदर्य खुलवलं. एक व्यावसायिक बनण्याकडे केलेली ही त्यांची वाटचाल. आज त्या चार हॉटेलच्या मालकीणबाई आहेत. हा प्रवास आहे सुरेखा वाळके यांचा.

मालवणमध्ये छोटय़ाशा खानावळ टाइप हॉटेलमधून सुरू झालेली ही वाटचाल आज मालवणशिवाय मुंबईत तीन रेस्टॉरंटपर्यंत पोहोचली आहे. या वाटचालीबद्दल सुरेखा वाळके यांच्याशी संवाद साधून अधिक जाणून घेतलं. त्या म्हणाल्या, मला जेवण करायची फारशी आवड नव्हती, पण माझे मिस्टर पक्के खवय्ये आहेत. लग्नानंतर माझ्यातली पाककला खऱया अर्थाने मिस्टरांसाठी जेवण बनवण्यापासून सुरू झाली आणि खुलत गेली. त्याचं रूपांतर पुढे हॉटेल व्यवसायात झालं. आमची सुरुवात झाली ती मालवणमध्ये. एका ठिकाणी माझं ब्युटी पार्लर सुरू होतं, तर आमच्या एका रिकाम्या जागेत आम्ही छोटीशी खानावळ सुरू केली. जिथे शाकाहारी थाळी, चिकन थाळी आणि फिश थाळी असा सुरुवातीचा मेन्यू होता. माझ्यासह एकच कुक सोबत होता. 1990 च्या सुमारास ही सुरुवात झाल्यावर 1995 मध्ये याचा विस्तार झाला. कोकणात एका शिक्षक अधिवेशनानिमित्ताने आलेल्या शिक्षक मंडळींसह अन्य उपस्थितांची जेवणाची व्यवस्था आम्ही केली आणि त्याच वर्षी हॉटेल व्यवसायाला टेक-ऑफ मिळाला. आज तिथे आमचा 20 ते 25 जणांचा कर्मचारी वर्ग आहे आणि आमचं 100 आसन व्यवस्था असलेलं रेस्टॉरंट तिथे सुरू आहे.

या हॉटेलची गाडी सुरळीत सुरू झाली तरीही मला याच्या कक्षा रुंदावायची फार इच्छा होती. स्वबळावर आणखी काही करण्याची इच्छा होती. त्यात माझी मुलंही त्या काळात मुंबईत शिकायला होती. त्यामुळे मुलांसोबत राहायला मिळावं आणि आपलं असं काहीतरी निर्माण करावं या हेतूने मी मुंबई गाठली. माझ्याकडे असलेले अवघे 30 हजार रुपये घेऊन मी 2010 च्या सुमारास इथे आले. दादर भागात एका पार्टनरसह छोटं हॉटेल सुरू केलं. सहा महिन्यातच त्या पार्टनरने पैसे काढून घेतले. माझ्यासाठी म्हटलं तर परिस्थिती कठीण होती, म्हटलं तर आव्हान होतं. मी ते आव्हान म्हणून स्वीकारलं. पुढे 2012 ला दादरच्या आगर बाजार परिसरात जागा घेऊन रेस्टॉरंट सुरू केलं. ज्यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पदार्थ खवय्यांसाठी सज्ज असतात. व्हेजबद्दल सांगायचं झालं तर काजू उसळ, कुळीथ पीठ, काळा वाटाणा उसळ यांच्या सोबतीला मोदक, पातोळ्या, काकडीचं धोंडस असे जेवणाची लज्जत वाढवणारे गोड पदार्थही असतात. दादरनंतर अंधेरीत आम्ही नवं रेस्टॉरंट सुरू केलं, तर अगदी अलीकडे मॉल संस्कृतीत जोपासलेल्या पिढीसाठी दादरच्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये ‘कोस्ट अँड ब्लूम’ नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. जिथे तंदुरी डिशेस आहेत, थाई फूड आहे, केरळीय पद्धतीचंही जेवण आहे. किंबहुना देशातील विविध ठिकाणचं सी-फूडही इथे उपलब्ध आहे. मुंबईतील तिन्ही हॉटेल्समध्ये मिळून साधारण 250 ते 300 कर्मचारी वर्ग कार्यरत आहे.

येणाऱया काळात मालवणी खाद्य संस्कृती आणि हा व्यवसायाचा आणखी विस्तार करायचा असल्याचं सुरेखाताईंनी गप्पांच्या ओघात आवर्जून नमूद केलं.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर सीनियर न्यूज अँकर आहेत.)