प्रासंगिक – नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस, घोषणा कधी?

>> अॅड. मनमोहन चोणकर

भारतीय रेल्वेचे जनक, मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार (जगन्नाथ) नाना शंकरशेट यांच्या अथक प्रयत्नांमुळे 16 एप्रिल 1853 रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे सुरू झाली. त्या गाडीत बसण्याचा त्यांना बहुमान मिळाला, तोच दिवस रेल्वे मंत्रालय ‘रेल्वे दिन’ म्हणून साजरा करते. नानांच्या या सर्व कार्याचा यथोचित सन्मान म्हणून मध्य रेल्वेच्या इमारतीच्या दर्शनी भागावर नाना शंकरशेट यांचा कोरीव पुतळा त्यांच्या कार्याची साक्ष देत आहे.

1996 च्या सुमारास व्हिक्टोरिया टर्मिनसचे जगन्नाथ नाना शंकरशेट नामकरण करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. त्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी तसा नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला, परंतु तो प्रस्ताव मंजुरीसाठी लोकसभेत मांडण्यात आला तेव्हा त्या नावाऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला. त्या वेळेपासून सर्व नानाप्रेमी मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या नाना शंकरशेट टर्मिनस नामकरणाची मागणी सातत्याने करत आहेत. दरवर्षी 16 एप्रिल या रेल्वे दिनाचे औचित्य साधून नाना चौक, मुंबई सेंट्रल टर्मिनस येथे पथनाटय़, सह्यांची मोहीम, मूक निदर्शने, मोर्चा काढून केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न नानाप्रेमी मंडळी करीत असते. आतापर्यंत या नामकरणासाठी तत्कालीन पंतप्रधान, रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना पत्राद्वारे मागणी करणारे निवेदने दिली आहेत. तो सर्व पत्रव्यवहार आमच्याकडे आहे. त्यानंतर 12 मार्च 2020 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबई सेंट्रलच्या नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस अशा नामकरणाचा प्रस्ताव बिनविरोध मंजूर झाला आणि तो प्रस्ताव 27 जुलै 2020 रोजी केंद्र सरकारकडे पुढील अंतिम मंजुरीसाठी पाठवला. त्यालासुद्धा पाच वर्षे झाली. त्या नामकरणाला महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी शिफारसपत्रे दिली आहेत. रेल्वे बोर्डानेही ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र दिले आहे. असे असताना पाच वर्षे हे नामकरण प्रलंबित आहे, नामकरण का होत नाही, याबाबत आमच्या मनात शंका येते. सध्याच्या सरकारच्या काळात देशभरात अनेक रेल्वे टर्मिनस, स्टेशनची नामकरणे झाली. मात्र ज्या व्यक्तिमत्त्वाने भारतीय रेल्वेची जडणघडण केली त्या नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्यासाठी दिरंगाई का केली जाते, याचे दुःख वाटते. या वेळी 16 एप्रिलला, रेल्वे दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये नामकरण घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती. तसेच 31 जुलैला नाना शंकरशेट यांच्या पुण्यतिथी दिवशी नामकरण अनावरण सोहळा होईल याची नानाप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.