अभिप्राय- ध्येयवादी तरुणाची प्रेरणादायी गोष्ट

>> अस्मिता येंडे

ज्या क्षेत्रात आपल्याला कार्य करायचे आहे, त्या अनुषंगाने आपले शिक्षण असायला हवे. त्या उद्दिष्टांसाठी धडपडायला हवे. अशाच जिद्दी, ध्येयवेडय़ा आणि संकल्पसिद्धीसाठी जिवाचे रान करणाऱया एका हुशार तरुणाची प्रेरक कहाणी कादंबरीच्या माध्यमातून लेखक सुनील पांडे यांनी वाचकांसमोर आणली आहे.

लेखक सुनील पांडे लिखित आणि स्नेहवर्धन प्रकाशन प्रकाशित  ‘गोष्ट एका राजीनाम्याची’ ही आत्मकथनात्मक लघुकादंबरी आहे. ही कादंबरी आकृतिबंधाच्या दृष्टीने लहान असली तरी या कादंबरीमार्फत जो विचार परावर्तित केला आहे, तो  तरुणाईला प्रेरणा देणारा आहे. कादंबरीचे निवेदन प्रथमपुरुषी आहे. कादंबरीचा निवेदक वाचकांना ही राजीनाम्याची गोष्ट अत्यंत साध्या शब्दात कथन करतो. निवेदनशैली हा भाग महत्त्वाचा. कारण त्या सहजसुंदर शैलीने वाचकांना त्या गोष्टीत सामावून घेण्याची किमया असते. ही कादंबरी ज्या पात्राभोवती फिरते, कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेले पात्र, आपला नायक ‘तुषार पाटील.’ पुणे महानगरपालिकेत पगार बिल लेखनिक म्हणून कामकाज पाहणाऱया तुषारची नुकतीच अन्न पुरवठा अधिकारी म्हणून नेमणूक झाली. लेखकही पुणे महानगर पालिकेत कार्यरत आहेत, त्या वेळी तुषार महानगर पालिकेत कामास लागला, तो पगार बिल लेखनिक म्हणून. पण अन्न पुरवठा अधिकारी या पदापर्यंतचा त्याचा संघर्षदायी प्रवास कसा होता, तो प्रेरणादायी प्रवास लेखकाने या कादंबरीच्या माध्यमातून शब्दबद्ध केला आहे.

कादंबरीची सुरुवात होते तुषारच्या नोकरीतील शेवटच्या दिवसापासून. आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन तो महाराष्ट्र शासनाच्या अन्न पुरवठा अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार होता. मूळचा कोल्हापूरचा असणारा तुषार नोकरीसाठी पुण्यात राहात होता. लेखनिक म्हणून नोकरी करत असला तरी एका बाजूला तो स्पर्धापरीक्षाही देत होता. प्रत्येक जण प्रगतीच्या दिशेने जात असतो, पण तुषारची बदली त्याच्याच गावी होऊनही तो खुश नव्हता, कारण पुणे महानगरपालिकेत जेवढे दिवस त्याने नोकरी केली त्या कालावधीत तुषारने आपल्या मनमोकळय़ा स्वभावाने सगळ्यांना आपलेसे केले होते, आपल्या सहकाऱयांना त्याने जीव लावला होता. त्यामुळे सहकाऱयांनाही तुषारच्या राजीनाम्याने दुःख झाले होते, पण एका गोष्टीचा आनंदही होता, की आपला मित्र, सोबती, सहकारी याची बढ़ती झाली आहे, त्याची प्रगती झाली आहे.

 तुषार पाटील या सहकारी मित्राची स्वभाववैशिष्टय़े लेखकाने उत्तमरीत्या मांडली आहेत. आपल्या कामाप्रति प्रामाणिकता, कौशल्यपूर्ण काम करण्याची स्फूर्ती, आपले काम लक्षपूर्वक करणे आणि कामाप्रति निष्ठा राखणे, आपले वरिष्ठ अधिकारी तसेच आपल्या हाताखालील काम करणाऱया कर्मचाऱयांशी आदरपूर्वक वागणे, सर्वाना सामावून घेणे. एकंदरीत तुषारने आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेक माणसे जोडली होती. आपले काम प्रामाणिकपणे करणारी माणसे हल्ली बघायलाही मिळत नाहीत. त्यात अशी ध्येयवादी, प्रामाणिक, मेहनती माणसे पाहिली की, इतरांनाही जीवनात काहीतरी करण्याची जिद्द मनात निर्माण होते. संकटे, हेवेदावे, भले-बुरे प्रसंग येतच राहणार. पण त्यावर जो मात करतो तो पुढे जातो. हीच गोष्ट या कादंबरीतून अधोरेखित केली आहे. तुषारच्याही आयुष्यातही असे निराशेचे प्रसंग येतात. पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो. तो डगमगून न जाता आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करतो आणि पुढे जात राहतो. ‘गोष्ट एका राजीनाम्याची’ ही लघुकादंबरी नव्या पिढीसाठी उत्तम आदर्श वस्तुपाठ आहे. आताच्या पिढीला प्रेरणा देणारी ही कादंबरी असून ध्येयनिश्चितीपासून प्रारंभ करणाऱया प्रत्येकाने ही कादंबरी नक्की वाचावी!

 

गोष्ट एका राजीनाम्याची

लेखक ः सुनील पांडे

प्रकाशक ः स्नेहवर्धन प्रकाशन

मूल्य ः 140 रुपये