
>> नवीनचंद्र बांदिवडेकर
ज्येष्ठ मराठी बांधकाम व्यावसायिक, दानशूर समाजसेवक भागोजी कीर यांच्या जयंती सोहळय़ानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी भागोजीशेठ कीर स्मृती समितीतर्फे 26 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता बेंगॉल केमिकल नाका (सेंच्युरी बाजार) वरळी ते भागोजी कीर स्मृतीस्थळ दादर चौपाटीपर्यंत भव्य शोभायात्रा, अभिषेक व अभिवादन सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला वेध.
रत्नागिरीतील एका छोटय़ाशा खेडय़ातून दारिद्रय़ाचे चटके सोसून पोटापाण्यासाठी मुंबईत धाव घेणारा दहा-बारा वर्षांचा मुलगा मोठेपणी नामांकित बांधकाम उद्योजक, दानशूर, दीनदुबळय़ांचा त्राता, शैक्षणिक क्षेत्राचा आधारस्तंभ, स्त्रियांचा पैवारी, अनाथांचा नाथ, अन्यायकारक सामाजिक रूढी आणि अस्पृश्यतेचा कट्टर विरोधक, थोर संतांच्या सान्निध्यामुळे सेवाभावी जीवनाचे संस्कार अंगिकारलेला समाजसेवक, स्वातंत्र्य आणि हिंदू धर्माच्या उद्धारासाठी झटणारा देशभक्त म्हणून देशात नाव कमावेल अशी कल्पना कोणीच केली नसेल, पण अविरत कष्ट, बुलंद आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि आपल्या कामावरील असलेली निष्ठा या स्वभावामुळे देशात नाव कमावलेली व्यक्ती म्हणजे भागोजीशेठ कीर. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे खडतर बालपणातून भव्य-दिव्य स्वप्न साकार करण्याचा आदर्श आहे. आज त्यांच्या त्या वाटचालीकडे मागे वळून पाहिले तर आजच्या तरुण पिढीला त्यापासून खूप काही शिकता येईल.
4 मार्च 1869 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या पेट किल्ला या छोटय़ाशा खेडय़ात, अठराविश्व दारिद्रय़ असलेल्या कुटुंबातील सामान्य शेतकऱयाच्या घरात त्यांचा जन्म झाला. बारा वर्षांचा होईपर्यंत या मुलाने गरिबी, उपहास, निंदा, अन्याय, अवहेलना यांचा सामना करताना उदरनिर्वाहासाठी केलेल्या संघर्षाला सीमा नव्हती. आई लक्ष्मीबाई, वडील बाळाजी, तीन बहिणी, दोन भाऊ असलेल्या त्यांच्या कुटुंबाची होणारी परवड त्यांना पाहवत नव्हती. त्यातच कर्जवसुलीसाठी एका सावकाराने घरातले सामान बाहेर काढले. या घटनेचा त्यांच्या मनावर तीव्र परिणाम झाला आणि त्यांनी कमाईसाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. हातात पैसे नसल्यामुळे घराजवळच्या समुद्रातून रत्नागिरी-मुंबई अशी वाहतूक करणाऱया गलबताच्या तांडेलाला त्यांनी आपली परिस्थिती सांगितली. त्या तांडेलाने दया दाखवल्यामुळे त्यांनी मुंबई बंदरात पाऊल ठेवले आणि जगण्यासाठी त्यांच्या खऱया संघर्षाला सुरुवात झाली. एका सुताराकडे ते कामाला राहिले. तसेच रेल्वे स्टेशनवर हमाली करून थोडेफार पैशांवर त्यांची गुजराण सुरू झाली. योगायोगाने मुंबईतील पालनजी मिस्त्राr या प्रतिष्ठत बांधकाम व्यावसायिकाच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या कर्तृत्वाचा आणि उत्कर्षाचा मार्ग खुला झाला. त्यांच्याकडे बरीच वर्षे काम केल्यावर भागोजी यांची चिकाटी, प्रामाणिकपणा, कामावरील निष्ठा, व्यवहार, शिकण्याची वृत्ती आणि कामातील सफाईदारपणा आणि काwशल्य पाहून पालनजींनी त्यांना आपल्या बांधकाम व्यवसायात भागीदार केले. याच पालनजी यांनी भागोजी कीर यांची व्यवसायातील मेहनत, चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे त्यांना भविष्यात ‘मॅनेजमेंट गुरू’ ही पदवी प्रदान केली. पालनजींनी विश्वासाने दिलेली पंत्राटे त्यांनी उत्कृष्टरीत्या पूर्ण केली. बांधकाम क्षेत्रात त्यांचं नाव झालं. त्यांच्याकडील कामाचा लोंढा आणि पैशाचा ओघ वाढत गेला. त्यानंतर मुंबईत त्यांनी कितीतरी आकर्षक इमारतींचं बांधकाम केलं. लायन्स गार्डन, सेंट्रल बँक, स्टेट बँक इमारत, ब्रेबॉर्न स्टेडियम, इंडियन मर्चंट चेंबर इमारत या त्यापैकी काही आहेत. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, पण त्यातून मिळणाऱया पैशांचा विनियोग त्यांनी समाजकार्यासाठी केला. आपल्या हयातीत त्यांनी भारतभर पाणपोया, विहिरी बांधल्या. मंदिरे, शालेय इमारती, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा, महिला विद्यालये, अनाथाश्रम उभे केले. त्यांच्या जीवनावर संत गाडगे महाराज, संत पाचलेगावकर महाराज या राष्ट्रीय संतांचा तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रभाव होता. या साऱ्यांचा सहवास त्यांना लाभला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घनिष्ठ परिचयातून त्यांनी रत्नागिरी येथे स्वखर्चाने प्रसिद्ध पतितपावन मंदिर बांधलं. प्रतिकूल जातिव्यवस्था, स्पृश्य-अस्पृश्य हे भेद नष्ट करण्यासाठी हे मंदिर सर्वांसाठी खुले केले. तिथे सहभोजनाची प्रथा सुरू झाली.
मुंबईतील हिंदू धर्मातील व्यक्तींची मृत्यूनंतर अंत्यसंस्कारांच्या वेळी गैरसोय होत असे. अशा वेळी हिंदू धर्मातील अनेक साधू-संत, धर्मरक्षक, पुरोहित, किरवंत, समाजसेवक यांनी भागोजीशेठना भेटून आपली व्यथा मांडली. भागोजींनी संत पाचलेगावकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी दादर चौपाटी येथे सोन्याच्या मोलाची नऊ एकर जागा विकत घेऊन त्यापैकीच्या काही जागेत स्मशनभूमी व अंत्यविधीची व्यवस्था हिंदू बांधवांना करून दिली. तीच आताची शिवाजी पार्क येथील भागोजीशेठ कीर हिंदू स्मशानभूमी होय. नऊ एकर जागेपैकी उर्वरित जागेवर आता महापौर बंगला, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, महात्मा गांधी जलतरण तलाव, संयुक्त महाराष्ट्र दालन, नाना-नानी चौक, चैत्यभूमी ही सरकारने वसविलेली सामाजिक व्यवस्था आहे. एका बाजूला भागोजीशेठ कीर यांचा पुतळा 90 चौ.फूट जागेत उभारला आहे. म्हणूनच राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांनी त्यांना हिंदू धर्मरक्षक ही उपाधी दिली आहे. ते स्वतः भंडारी जातीत जन्माला आले असले तरी त्यांनी भंडारी समाजाच्या विकासापुरते आपले कार्य मर्यादित न ठेवता समाजातील सर्व बांधवांसाठी जात-पातविरहित समाजकार्याला वाहून घेतले. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. मात्र स्वातंत्र्याचा सूर्य पाहण्याआधीच 1944 साली त्यांची निधन झालं.
देशाला सर्व प्रकारे आर्थिक, वैचारिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्वावलंबी आणि समृद्ध करण्यासाठी आपले जीवन पणाला लावून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱया या थोर प्रेरणादायी समाजपुरुषाला भागोजीशेठ कीर स्मृती समितीच्या वतीने कोटी कोटी प्रणाम!