>> संजीव साबडे
आपण हिंदुस्थानी कोणत्याही परदेशी खाद्य प्रकाराचं हिंदुस्थानीकरण करून टाकतो. मग ते मंच्युरियन असो, पास्ता असो, बरिटो असो की पिझ्झा. त्यामुळेच हिंदुस्थानात व मुंबईतही खास भारतीय पिझ्झा जन्माला आले आहेत. डोसा पिझ्झा, पराठा पिझ्झा, चपाती पिझ्झा, ज्वारी व तांदळाच्या भाकरीचा पिझ्झा, सँडविच पिझ्झा, मटका किंवा कुल्हड पिझ्झा. अगदी वाटेल ते प्रकार सध्या दिसून येत आहेत.
आता पिझ्झा आपल्या खाद्यसंस्कृतीचा भाग होऊन गेला आहे. कधी ना कधी, कोणता ना कोणता बहुतेकांनी पिझ्झा खाल्लेला असेल. कधी पिझ्झा शॉपमध्ये, रस्त्यावर वा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा ऑनलाइन ऑर्डरद्वारे मागवून. हल्ली उडप्याच्या किंवा पंजाबी, सिंधी व मराठी रेस्टॉरंटमध्येही पिझ्झा मिळतो. इडली, डोसा, समोसा, कचोरी, साबुदाणा वडा आणि मिसळ यांच्या बरोबरीने पिझ्झाही मेन्यूकार्डवर झळकताना दिसतो. पण पिझ्झा हट, डॉमिनोज, पिझ्झारिओमध्ये मिळणारा अस्सल आणि इतर रेस्टॉरंटमध्ये मिळणारा कम अस्सल असा शिक्का काही जण मारत असतात. अस्सल किंवा कम अस्सल असं काही नसतं.
अर्थात पिझ्झाचं माहेरघर असलेल्या इटलीचा आणि हिंदुस्थानात मिळणारा पिझ्झा वेगळाच आहे आणि असायला हवा. बीफ आणि पोर्कवाला पिझ्झा इथे कोण खाणार? त्यामुळे आपल्या नेहमीच्या भाज्या वा चिकन व पनीर, चीज घालून इथे पिझ्झा केला जातो. आपल्याला विविध पिझ्झाची चव माहीत झाली आहे आणि त्यांची नावंही. टॉपिंग वेगवेगळी असतात आणि बेस मात्र सेम. तेच चीज, त्याच भाज्या, पनीर व वेगवेगळ्या प्रकारचं चिकन व ऑलिव्ह. नावं मोठी, पण ऑर्डर केल्यावर टेबलावर किंवा घरी येतो तोच तो सहा व आठ त्रिकोणी तुकडे केलेला गोल पिझ्झा.
पण आपण हिंदुस्थानी कोणत्याही परदेशी खाद्य प्रकाराचं हिंदुस्थानीकरण करून टाकतो. मग ते मंच्युरियन असो, पास्ता असो, बरिटो असो की पिझ्झा. त्यामुळेच हिंदुस्थानात व मुंबईतही खास भारतीय पिझ्झा जन्माला आले आहेत. डोसा पिझ्झा, पराठा पिझ्झा, चपाती पिझ्झा, ज्वारी व तांदळाच्या भाकरीचा पिझ्झा, सँडविच पिझ्झा, मटका किंवा कुल्हड पिझ्झा. पाककृतीमध्ये तर पास्ता पिझ्झा, पिझ्झा नूडल्स आणि पिझ्झा राईस हे प्रकारही दिसू लागले आहेत. याशिवाय बटर चिकन पिझ्झा, सीग कबाब पिझ्झा, सावजी, मालवणी मसाला पिझ्झा, मिसळ पिझ्झा. अगदी वाटेल ते! मिसळ पिझ्झामध्ये मटकी वा वाटाणा आणि मिसळ मसाला.
गंमत म्हणजे इटालियन पदार्थांत बरंचसं हिंदुस्थानीकरण केलं आहे ते छोटी रेस्टॉरंट वा फूटपाथवर खाद्य पदार्थ विकणाऱयांनी. गिनी डोसा, चायनीज डोसा खाऊगल्लीत जन्मला आणि मग रेस्टॉरंटच्या मेन्यूत जाऊन बसला. तसंच पिझ्झाचं आहे. मात्र मटका पिझ्झा तयार होईल, असं वाटलं नव्हतं. ब्रेडचे तुकडे आणि भाज्या, पनीर, चीज हे छोटय़ा मडक्यात घालून ते मडकं ओव्हन वा तंदूरमध्ये भाजलं की झालं हा पिझ्झा. असा पिझ्झा पवईच्या गॅलरिया
मॉलमधील `99 पिझ्झा’मध्ये मिळतो. दादरच्या `आशिक चाय के’मध्येही मिळत असे. आता ते ठिकाण मुलुंडच्या कालिदास नाटय़गृहापाशी गेलं आहे. उपनगरात घाटकोपरच्या पूर्वेकडील जलाराम नगर, म्हाडा कॉलनीत, `केतकीज मटका पिझ्झा’ हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय आहे. तुम्ही तिथल्या खाऊ गल्लीत गेलात तर ते लगेच सापडेल. कांदिवली पश्चिमेला तर दोन ठिकाणी मटका पिझ्झा मिळतो. `एसएस फ्यूझन’ व `फ्रँकोज पिझ्झारिओ’ ही ठिकाणं महावीर नगरमध्ये आहेत. खाऊ गल्ली परिसरात याखेरीजही काही ठिकाणं असू शकतील. मुंबईत योगेश गुप्ता यांनी पहिल्यांदा हा प्रकार आणला. साऱया भाज्या ज्याप्रमाणे भांडय़ात शिजवतो, तसा प्रयोग त्यांनी पिझ्झासाठी केला.
पराठा पिझ्झाचा प्रयोग मस्तच! पराठा हा पंजाबी व उत्तर हिंदुस्थानी प्रकार. मूळ पराठा आतून भरलेला असतो. त्यामुळे आतून व वरून भाज्या, पनीर, चीज घालून पिझ्झा पराठा बनवणं अधिक सोपं. डॉमिनोज, जोयज पिझ्झा यांच्या सर्वच दुकानांत सात-आठ प्रकारचे पराठा पिझ्झा मिळू लागले आहेत. परळच्या पराठा मंत्र व जुहूच्या इस्कॉन मंदिरापाशी थ्री स्टार चायनीज अँड तंदुरी, पवईचं वर्ल्ड ऑफ पराठा, अंधेरीच्या वर्सोव्याचं सिरिको, बोरिवलीचं पराठा झोन या ठिकाणी मस्त पराठा पिझ्झा मिळतो. घाटकोपरच्या खाऊ गल्लीतही टेस्टी पिझ्झा पराठा मिळतो.
पराठा पिझ्झा होऊ शकतो तर रोटी पिझ्झा व भाकरी पिझ्झाही हवा. ज्या ठिकाणी पराठा पिझ्झा मिळतो तिथेच रोटी पिझ्झाही मिळतो. मोठय़ा तंदूर वा नानचा उपयोग पिझ्झा बेस म्हणून होतो. तो ब्रेड जाड असावा एवढीच अपेक्षा असते. खाऊ गल्लीवाले फ्रँकीसाठीची चपाती वापरून पिझ्झा बनवतात. कारण त्यांच्याकडे तंदूर नसतो. शिवाय त्याच रोटीने ते फ्रँकी वा कोलकाता रोलही बनवतात. अर्थात असे प्रयोग पाहण्या व खाण्यासाठी रात्री खाऊ गल्लीत चक्कर मारायला हवी. सध्या पावसाळ्यात तिथले अनेक स्टॉल बंद राहतात.
सँडविच पिझ्झा आणि डोसा पिझ्झा हे सध्या अतिशय लोकप्रिय आणि तुलनेने बरंच स्वस्त आहेत. कोणत्याही खाऊ गल्लीत डोसेवाला किंवा सँडविचवाल्यासमोर उभं राहिलं तर तिथे किमान एक-दोन जण डोसा विथ पिझ्झा आणि छोटय़ा ब्रेडमधला पिझ्झा खाताना किंवा ऑर्डर करताना दिसतात. हे दोन्ही प्रकार पटापट तयार होतात. डोसा तयार होत असतानाच पिझ्झाचं
टॉपिंग व चीज यांची तयारी स्रू होते. अवघ्या पाच मिनिटांत तो मिळतो. डोशामध्ये पूर्वी ते बटाट्याची भाजी घालायचे. आता अर्धवट शिजवून ठेवलेल्या भाज्या, सॉस व चीज वगैरे घातला की झाला पिझ्झा तयार. सँडविच पिझ्झाही तसाच. ब्रेडला बटर लावल्यानंतर काकडी, बीट, कांदा, बटाट्याऐवजी पिझ्झाच्या भाज्या व चीज घालून तो भाजला की तयार. त्यामुळे हल्ली घरोघरी असे दोन्ही प्रकारचे पिझ्झा बनवले जात आहेत.
आता आपल्याकडे भाकरी पिझ्झाही मिळू लागला आहे. तो अद्याप खाल्ला नाही. घाटकोपरच्या खाऊ गल्लीत अल्पा नावाच्या बाई भाकरी पिझ्झा बनवून देतात. नवी मुंबईत वाशी, सानपाडा व खारघर येथेही भाकरी पिझ्झा मिळतो. नवी मुंबईतला भाकरी पिझ्झा अर्थातच मराठमोळा आहे. खाऊ गल्लीत पिझ्झा फ्राईड राईस व पिझ्झा नूडल्सही आले आहेत.
आपण पूर्वी भाकरीवर झुणका वा चटणी ठेवून खायचो. तामीळनाडू व केरळमध्ये मलबार पराठावर कोरडी अंडा करी देतात. उत्तर हिंदुस्थानातही रोटीवर सब्जी ठेवून खात. पिझ्झा हा प्रकार तसाच, पण मैदा नसलेला आणि हिंदुस्थानी स्वादाचा आगळा पिझ्झा खाणं श्रेयस्कर.