साहित्य जगत- वाचनाकडे वळण्यासाठी

>> रविप्रकाश कुलकर्णी

‘वाचाल तर वाचाल’ असे नेमके कोणी आणि केव्हा म्हटले आहे? वाचन प्रेरणा दिन, जागतिक पुस्तक दिन किंवा वाचनासंदर्भात कुठली गोष्ट आली की, ‘वाचाल तर वाचाल’ याची पुनरावृत्ती होतेच होते. पण प्रश्न असा आहे की, एखाद्याला वाचनाकडे कसे आकर्षित करावे? त्याला उत्तर नक्कीच नाही, पण असे प्रयत्न करणारे नक्की आहेत. अशा काहींची ओळख जॉन गोन्सालविस यांनी ‘ग्रंथदूत’ या पुस्तकात करून दिलेली आहे. सदर पुस्तक वाचक चळवळीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रंथालीतर्फे प्रकाशित झालेले आहे.

सायकलवरून गावोगावी पुस्तक पोहोचवणारे, फिरते वाचनालय चालवणारे जीवन इंगळे, नाशिक-आग्रा रोडवरील भिमाबाई जोंधळे या खाद्यपदार्थाबरोबरच वाचायला, चाळायला पुस्तकेदेखील देतात म्हणून या हॉटेलचे नाव आजीचे पुस्तकांचे हॉटेल झाले आहे. दुर्गम प्रदेशात पुस्तके आणि गरजूंना सायकल देणारे पुण्यातील सचिन म्हसे, ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातदेखील यशस्वीपणे राबवणारे विनायक रानडे, कोथरूड येथील झाडाच्या पारावरील मोफत वाचनालय चालवणारे सुरेंद्र दामले, ‘ग्रंथसखा’ म्हणून ख्यात असलेले बदलापूरचे श्याम जोशी, पुण्यात रिक्षामध्ये फिरते वाचनालय ठेवणारे प्रशांत कांबळे, पुण्यात बिल्डर असलेले व ग्रंथ प्रसारासाठी झटणारे अविनाश निमसे, नांदेड येथील शाळेत सुरुवातीपासूनच मुलांना लेखन व वाचन याची गोडी लागावी म्हणून विविध यशस्वी उपक्रम राबवणारे डॉ. सुरेश सावंत, पारडी (जिल्हा परभणी) येथील युवराज माने, मुंबईचे सतीश काळसेकर, वाचनाची गोडी लागावी म्हणून झटणारे लक्ष्मण आणि विद्या जगताप दांपत्य, मंगळवेढय़ाचे राकेश औदुंबर गायकवाड, मुंबई पोलिसातील महेश गुरव, अहिल्यानगरचे हेरंब कुलकर्णी, पेनुर येथील दिनकर शिवाजी चवरे, ताड बोरगाव येथील विनोद शेडगे, गुजरातमधील नानामवा गावातील हरदेव सिंह जाडेजा (यांनी आपल्या मुलीला तिच्या वजनाइतकी पुस्तके सासरी जाताना भेट दिली) अशा ग्रंथ प्रसारकांची ओळख या पुस्तकात करून दिलेली आहे.

या लेखात पुस्तकाने आपल्या आयुष्यात कसा बदल केला हे सांगितले आहे. ते वाचण्यासारखेच आहे. जीवन इंगळे सांगतात, “1995 साली शेतकरी मासिक वाचत असताना दलाई लामा यांची ‘आपल्या काळात’ ही शोभा भागवत यांनी अनुवाद केलेली कविता त्यांच्या वाचनात आली. या कवितेने माझ्या जीवनात परिवर्तन केले.’’

विद्युत अभियंता असलेले सचिन म्हसे सांगतात, “डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’ हे पुस्तक त्यांनी वाचले आणि आपल्या जीवनात काही ध्येय समोर ठेवून कोणतेही काम केले तर यशप्राप्ती होते. जीवनात ध्येय ठेवण्याचे काम या पुस्तकाने केले.’’

ग्रंथसखा श्याम जोशी सांगतात, “मला वाचन गुरू करण्याची गरज आहे का? प्रत्येक कलेस गुरू लागतो. वाचनसुद्धा गुरूशिवाय होऊ शकते का?’’ असे काही प्रश्न त्यांना पडू लागले. त्यातूनच त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक नरहर कुरुंदकरांशी संपर्क साधला. कुरुंदकरांनी त्यांना सांगितले, “तू शाळेत शिक्षक आहेस. विज्ञानामधील चौरस आहार ही संकल्पना तुला माहीत आहे का? शरीर वाढीसाठी चौरस आहार महत्त्वाचा असतो तसेच मनाच्या मशागतीसाठी चौफेर वाचन व्हायला पाहिजे. कुठलाही विषय वाचण्यासाठी वर्ज्य नाही…’’ आणि पुस्तकांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलला. जग जाणण्यासाठी, जग कळण्यासाठी, जग समजून घेण्यासाठी पुस्तक हे एक महत्त्वाचे साधन आहे. म्हणूनच जग समजायचे असेल तर तुम्हाला पुस्तकांच्या गाडीत बसावेच लागेल.

डॉ. आ. ह. साळुंखे त्यांच्या ‘चांदण्यात भिजायचे राहून जाऊ नये’ या पुस्तकात म्हणतात, “आपण वयाच्या 57 व्या वर्षी कन्याकुमारीला येऊन तेथले सौंदर्य पाहिले. आपल्या जीवनात चार कपडे, चार भांडी कमी घेऊन संसारात काटकसर करून जर आपण 19 व्या वर्षी कन्याकुमारीला आलो असतो, हे सौंदर्य पाहिले असते तर माझ्या जीवनाला एक वेगळे वळण, एक वेगळा विचार मिळाला असता.’’ हे वाचून युवराज माने यांनी आपल्या सहवासात येणाऱयाला वाचनाच्या चांदण्यात भिजवल्याशिवाय राहायचे नाही असा निश्चय करून ते काम करू लागले.

सतीश काळसेकर यांनी म्हटले आहे, “वाचन हे माझे व्यसन आहे. त्या व्यसनाची पहिली पायरी ग्रंथालयाच्या कपाटातून ग्रंथ वाचून चढता आली, पण दुसरी पायरी त्या व्यसनाचा सर्वार्थाने कडेलोट व्हावा अशी असते आणि ती असते ग्रंथसंग्रहाची. माथ्यावर छत नसलेल्या हलाखीच्या दिवसात कधी शाळा व
कॉलेजच्या ग्रंथालयातून, कधी सार्वजनिक ग्रंथालयातून, कधी मित्रांकडून उधार, उसनवारी करत या व्यसनाला सांभाळले आणि नंतर मात्र थांबलोच नाही. पगार होणार म्हणून आधी ग्रंथ घ्या, पगार झाला म्हणून घ्या, असे ग्रंथ घेतच राहिलो. माझ्या ग्रंथसंग्रहासोबत मी निवांत असतो. ग्रंथ हाताशी, सभोवती नसतील तर माझी घुसमट होते.’’ आयुष्य उजळून जावे असे निरनिराळे ग्रंथानुभव ‘ग्रंथ दूत’ पुस्तकात आहेत.