>> प्रसाद ताम्हनकर
2024 या सरत्या वर्षात जगात अनेक घडामोडी घडल्या. राजकीय, सामाजिक आणि विविध संदर्भातल्या या घटनांनी अनेकदा जगाला हादरे दिले, तर काही घटनांनी मानवाच्या प्रगतीच्या वेगाला अजून वेगवान बनवले. विविध देशांतल्या हुकूमशाही विरुद्ध जनतेचा उठाव झाला. मातब्बर देश एकमेकांविरुद्ध रणांगणात उतरले, तर कुठे काही सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या अचानक डळमळीत झाल्या. जेव्हा जेव्हा जगाच्या कोपऱयात काही संशयास्पद घडले, उठाव झाले, एखादी राजकीय हत्या घडली, तेव्हा तेव्हा एक नाव जोमाने चर्चेत आले आणि ते म्हणजे इल्युमिनाटी. शेकडो वर्षांची परंपरा असलेली, जगातील सर्वात घातक आणि अतिशय गुप्त अशी संघटना म्हणजे इल्युमिनाटी होय. जगभरात घडणाऱया अनेक घटनांच्या मागे या संघटनेचा हात असतो असा एक प्रवाद आहे. या संघटनेभोवती अनेक खऱया-खोटय़ा कथा आणि कल्पना जगभरात रचल्या गेल्या आहेत व आजही रचल्या जात असतात.
एखाद्या बंद तळघरात रात्रीच्या अंधारात बुरखे घालून जमलेली पाच-सहा माणसे ही आपली गुप्त संघटनेची व्याख्या असते. मात्र इल्युमिनाटी या सर्वांपेक्षा पूर्ण वेगळी आणि जगाच्या कानाकोपऱयात आपली मुळे पसरलेली गुप्त संघटना आहे असे मानले जाते. इल्युमिनाटी हा शब्द लॅटिन शब्द ‘इलमिनातूस’ याचे अनेक वचन आहे. याचा अर्थ ‘प्रबुद्ध’ असा आहे. 18 व्या शतकात जन्माला आलेल्या या गुप्त संघटनेचा फ्रेंच राज्यक्रांतीपासून ते अमेरिकेचे राष्ट्रपती जे. एफ. केनेडी यांच्या हत्येपर्यंत विविध घटनांमध्ये हात असल्याच्या अनेक रंजक कहाण्या शेकडो वर्षे चवीने चघळल्या जात आहेत. इल्युमिनाटी ही संघटना आजही अस्तित्वात आहे आणि जगभरात कार्यरत आहे असे मानणारा एक मोठा वर्ग आहे.
जे. एफ. केनेडी यांच्या हत्येच्या वेळी त्यांच्या आसपास एक महिलेला पाहण्यात आले होते. या महिलेच्या हातात कॅमेऱ्यासारखी दिसणारी बंदूक होती आणि तिनेच गोळी मारून केनेडी यांची हत्या केली असा एक समज मोठय़ा प्रमाणावर आहे. या रहस्यमयी महिलेला ‘द बबुष्का लेडी’ म्हणून संबोधले जाते आणि ती इल्युमिनाटीची सदस्य असल्याचा दावा आजही अनेक लोक करतात. बिल गेट्स, ओपरा विन्फ्रे यांसारख्या अनेक मातब्बर लोकांवर ते इल्युमिनाटीचे सदस्य असल्याचा संशय वारंवार घेतला जात असतो. जगभरातील प्रमुख देशांमध्ये असलेले राज्यकर्ते, मोठे व्यापारी, संशोधक हे इल्युमिनाटीचे सदस्य असल्याचा संशय वारंवार घेतला जात असतो.
काहीशी अंधारात गेलेली ही संघटना खऱया अर्थाने चर्चेत आली आणि गाजायला लागली ती सोशल मीडियामुळे. सोशल मीडियाचा वापर करणाऱया जगभरातील अनेक लोकांना इल्युमिनाटीच्या रहस्याने, तिच्याविषयीच्या कल्पित कथांमुळे आकर्षित केले. आज आपण जर सोशल मीडियावर इल्युमिनाटीबद्दल शोध घेतला तर लाखो व्हिडीओ आणि आर्टिकल्सनी भरलेली माहिती तुमच्या समोर हजर होतील व इल्युमिनाटीबद्दल लोकांना किती प्रचंड कुतूहल आहे हे लक्षात येईल. कोणत्याही दोन देशांत युद्ध भडकवण्यास सक्षम अशी वदंता असलेल्या या संघटनेचे काय कार्य चालू आहे आणि कसे चालू आहे याबद्दल अनेक कल्पना जगभरातील विद्वान मांडत असतात. मात्र संघटनेचे अस्तित्व सिद्ध करू शकणारा एकही सबळ पुरावा आजवर समोर आलेला नाही.
1748 साली मध्य युरोपातल्या बवारिया राज्यात एडम वाइसहाफ्ट या प्राध्यापकाने या संघटनेचा पाया रचला. धर्म आणि विज्ञान यांनी हातात हात घालून प्रवास करायला हवा अशी त्याची धारणा होती. समाजात खोलवर रुजलेल्या धार्मिक चालीरीती आणि जोखडातून समाजाला मुक्त करण्याचे या संघटनेचे उद्दिष्ट होते. एडमच्या विचारसरणीला पूरक अशी विचारसरणी असणाऱया काही लोकांच्या सोबतीने ही संघटना सुरू झाली आणि बघता बघता हजारो विद्यार्थी त्यात सामील झाले. पुढे अनेक विचारवंत आणि विद्वान संशोधक या गुप्त संघटनेत सामील झाले असे मानले जाते. या संघटनेच्या सर्व बैठका या गुप्त असत. मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांना एक दिवस याची माहिती मिळाली आणि या संघटनेवर बंदी घालण्यात आली व वाइसहाफ्टला देशातून हद्दपार करण्यात आले. इथेच इल्युमिनाटीचा शेवट झाला असे काही लोकांचे मत आहे. मात्र आजदेखील ही संघटना गुप्तपणे कार्यरत आहे असे मानणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.