लेख – स्टारलिंकचा भारताला फायदा काय?

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या इंटरनेटसेवा पुरविणाऱ्या पारंपरिक कंपन्या भारताच्या शहरी भागात चांगली सेवा देतात. परंतु ग्रामीण आणि दुर्गम भागात या कंपन्यांची फायबर कनेक्टिव्हिटी नाही. तसेच त्यांचे इंटरनेट खूपच संथ गतीने चालते. स्टारलिंक इंटरनेटच्या बाबतीत दोन्ही कंपन्यांना सहज मागे टाकते. स्टारलिंकच्या आगमनानंतर, भारतातील ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी बरीच मजबूत होऊ शकते, म्हणूनच या दोन्ही कंपन्यांनी स्टारलिंकबरोबर करार केला आहे.

आज प्रत्येक कामासाठी इंटरनेटचा वापर केला जात आहे. जसजशी इंटरनेटची मागणी वाढत गेली, मात्र अजूनही देशातील बऱयाच भागांत हायस्पीड इंटरनेट मिळत नाही. त्यामुळे मोबाईल कंपन्यांनी भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा आणण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी भारतीय एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन कंपन्यांनी ‘स्टारलिंक’ या कंपनीबरोबर करार केला आहे. यामुळे भारताचा काय फायदा होइल?

‘स्टारलिंक’ हा अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने 2019 साली हाती घेतलेला जागतिक प्रकल्प आहे. याद्वारे ‘स्टारलिंक’ एकूण 42 हजार लहान लहान दळणवळण उपग्रह अवकाशात सोडणार असून पृथ्वीभोवती 547 किमीवर ते असतील. गेल्या सहा वर्षांत यातील सात हजार उपग्रह कार्यरत झालेले आहेत. अवकाशात असल्यामुळे एका साध्या अवकाशपेंद्री अँटेनाद्वारे हे उपग्रह पृथ्वीवर कोठेही इंटरनेट सेवा देऊ शकतील. सध्याच्या स्थितीत शंभरभर देशांतील 46 लाख ग्राहक ही ‘स्टारलिंक’ इंटरनेट सेवा वापरतात. सॅटेलाइट टेलिपह्नी ही विद्यमान मोबाईलपेक्षा अधिक कार्यक्षम असते आणि तीत टॉवर उभारण्याची गरज लागत नाही. कारण फोन थेट अवकाशातील उपग्रहाच्या संपर्कात असतो. त्यामुळे त्या सेवेत जमिनीवर कोणतेही अडथळे येत नाहीत.

स्टारलिंकला अद्याप भारतात नियामक मान्यता मिळालेली नाही. स्टारलिंकचे मुख्य उद्दिष्ट दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट प्रदान करणे आहे. एलॉन मस्क हे स्पेसएक्सशिवाय टेस्ला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वी ट्विटर)चे मालक आहेत. सध्या ते अमेरिकन प्रशासनात महत्त्वाचे पदाधिकारी आहेत.

सध्या भारतातील अनेक गावे आणि लहान शहरे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करतात. त्यामुळे लोकांना ऑनलाइन शिक्षण किंवा अगदी मूलभूत संप्रेषण यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. स्टारलिंकचे सॅटेलाइट इंटरनेट पारंपरिक ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जलद, विश्वासार्ह इंटरनेट सेवा पुरवू शकेल. स्टारलिंकच्या इंटरनेटचा स्पीड 25 एमबीपीएस ते 110 एमबीपीएसपर्यंत असेल.

भारतात जवळपास 90 कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. भारतातील ग्राहक कोणतीही खरेदी करताना दराचा विचार करतात, त्यामुळे ‘स्टारलिंक’च्या सेवांना जर ते स्वस्त आणि चांगली सेवा असेल तरच ग्राहक मिळतील. भारतातील स्टारलिंक सेवेची किंमत प्रतिमाह 3500 ते 4500 रुपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसोबतच्या करारामुळे ते स्वस्त होऊ शकते.

स्टारलिंकच्या भारत प्रवेशासाठी भारत सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने कठोर अटी घातल्या आहेत, ज्या बरोबर आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील आणि अशांत भागात गरज पडल्यास, संपर्क सेवा निलंबित किंवा बंद करण्यासाठी सरकारने एलॉन मस्कच्या स्टारलिंकला भारतात एक नियंत्रण केंद्र (control centre) स्थापन करण्यास सांगितले आहे. तसेच, सुरक्षा आस्थापनांना गरज पडल्यास अधिकृत चॅनेलद्वारे कायदा अंमलबजावणी संस्था कॉल इंटरसेप्ट करण्याची परवानगी मागू शकतील.

नियंत्रण केंद्र महत्त्वाचे आहे, कारण देशाच्या कोणत्याही भागात हिंसाचार झाल्यास/धोका निर्माण झाल्यास उपग्रहांद्वारे दिल्या जाणाऱया सेवांना तत्काळ निलंबित आणि बंद करण्याची आवश्यकता भासू शकते. अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास भारताने स्टारलिंक दरवाजे ठोठावण्याची किंवा अमेरिकेतील त्यांच्या मुख्यालयाशी संपर्क साधण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. म्हणून नियंत्रण केंद्र भारतात असावे. दूरसंचार कायद्यात अशा तरतुदी आहेत, ज्या केंद्र किंवा राज्य सरकारला आपत्ती व्यवस्थापनासह सार्वजनिक आपत्कालीन परिस्थितीत किंवा सार्वजनिक सुरक्षेच्या हितासाठी अधिकृत संस्थेकडून कोणत्याही दूरसंचार सेवेचा किंवा नेटवर्कचा ‘तात्पुरता ताबा’ घेण्याची परवानगी देतात. याशिवाय इंटरनेट बंद करण्याच्या तरतुदी पण आहेत.

याशिवाय सॅटकॉम कंपन्यांना सॅटेलाइट नेटवर्कद्वारे थेट कॉल ट्रान्सफर न करण्याचे आणि त्याऐवजी ते त्यांच्या इंडिया गेटवेवर परत पाठवण्याचे आणि नंतर दुसऱया कम्युनिकेशन सेवेद्वारे घेतलेल्या चॅनेलचा वापर करण्याचे सांगण्यात आले आहे. जर कोणी अमेरिकेमध्ये कॉल केला तर तो कॉल वापरकर्त्याकडून सॅटेलाइटकडे जाईल. परंतु तो सॅटेलाइट मार्गाने थेट अमेरिकेला जाणार नाही. तो कंपनीच्या इंडिया गेटवे ‘पॉइंट ऑफ प्रेझेन्स’ (पीओपी) वर परत येईल आणि नंतर समुद्राखालील केबलसारखे पारंपरिक टेलिकॉम चॅनेल वापरतील. यामुळे कॉल ट्रेस करणे आणि ट्रक करणे सोपे होते. थोडक्यात स्टारलिंकच्या आगमनानंतर, भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी बरीच मजबूत होऊ शकते.

मात्र अनेक वेळा एलॉन मस्क यांना वाटते की, ते भारतापेक्षाही मोठे आहेत आणि भारताला अटी घालू शकतील. सध्या ते भारत सरकारविरोधात भारताच्या सुप्रीम कोर्टमध्ये ‘ट्विटर’ म्हणजे ‘एक्स’वरती किती स्वातंत्र्य असावे या विषयाकरता लढत आहेत. मागे पण अशीच घटना एकदा घडली होती, मात्र त्या वेळेला त्यांनी सपशेल माघार घेतली होती. त्यांना ‘ट्विटर’ म्हणजे ‘एक्स’ प्रकरणात पण माघार घ्यावी लागेल. जर एलॉन मस्क यांना भारतात स्टारलिंकला आणायचे असेल तर त्यांना भारताचे कायदे पाळावेच लागतील. सध्या अमेरिकेतली जनता युरोप, कॅनडा आणि मेक्सिको हे सगळे देश अनेक कारणांमुळे एलॉन मस्कच्या विरोधात गेले आहेत आणि त्याच्या टेस्ला इलेक्ट्रिक गाडीवर हल्ले करत आहेत, ज्यामुळे कंपनीचे भाव 50 टक्क्यांनी गडगडलेले आहेत. अशा वेळी एलॉन मस्कना भारताची गरज आहे. त्यामुळे ते स्टारलिंक सेवा भारतामध्ये उपलब्ध करताना भारताचे कायदे नक्कीच पाळतील. नाहीतर त्यांची सेवा आपण भारतात कधीही बंद करू शकतो.