
>> तुषार प्रीती देशमुख
न खचता, न डगमगता, कंबरेला पदर खोचून पडेल ती मेहनत करत कुटुंबाला सावरणाऱया शोभा सातार्डेकर म्हणजे आमची शोभामामी.
मी पाचवीत शिकत असताना आई-वडिलांनी परिस्थितीनुसार आजी-आजोबांकडे कायमचं राहायला जायचं ठरवलं. दादरमधील हेटकरी महाजनवाडीमध्ये आम्ही त्यांच्याकडे राहायला आलो. वाडीत एकूण 24 बिऱहाडं होती. आमचे सख्खे शेजारी सातार्डेकर कुटुंबीय, त्यांची परिस्थिती बेताचीच. दिलीप सातार्डेकर प्रायव्हेट कंपनीत नोकरीला. नवऱयाच्या निधनानंतर दोन मुलांबरोबर माहेरी आलेली बहीण, इतर सदस्य अन् तो एकटाच कमावता. तरीदेखील सगळेच सदैव हसतमुख.
दिलीप मामाचं लग्न झालं. आमच्या चाळीच्या कुटुंबात शोभा मामीचं आगमन झालं. या सगळ्या परिस्थितीला स्वीकारून लक्ष्मीच्या पावलांनी तिने गृहप्रवेश केला होता. नव्या संसारात रुळते ना रुळते तोच सहा महिन्यांतच तिच्या नवऱयाची नोकरी गेली. दिलीप मामा व शोभा मामीला कन्यारत्न प्राप्त झालं. कालांतराने त्यांना आर्थिक चणचण जाणवू लागली. आमच्या वाडीमध्ये बँकेतील रिकरिंग अकाऊंटमध्ये भरण्यासाठी डेली कलेक्शन करायला उषा मोरे ताई यायच्या. अनेक महिलांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू केला होता. महिलांकडून त्या खाद्यपदार्थ बनवून घेत व त्यांना त्यांचा योग्य मोबदला देत. शोभा मामीने तिच्या लहान मुलीला पाळणाघरात ठेऊन उषाताईंकडे सहा महिने नोकरी केली. पण शेवटी नोकरी सोडून मुलीला सांभाळून घरूनच तिने छोटेखानी खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. सुरुवातीला खमंग खुसखुशीत अशी तिला अपेक्षित असलेली चकली होईपर्यंत प्रयोग केला तेव्हा कुठे तिला अपेक्षित असलेल्या चकलीच्या भाजणीचे प्रमाण निश्चित झाले. तिने वाडीमधील कुटुंबीयांच्या तसंच मित्र-परिवारांच्या ऑर्डर्स घेतल्या आणि शोभा मामीला चकलीच्या ऑर्डर्स मिळत गेल्या.
दिवसाला पाव किलो विकली जाणारी चकली पाहता पाहता दहा किलोपर्यंत गेली. मागणी वाढली. चकलीच्या भाजणीसाठी लागणारी धान्यं भाजणं, ती दळून आणणं, मग चकलीचं योग्य मिश्रण मळणं, सोऱयातून चकल्या पाडणं, त्या योग्य आचेवर तळून थंड करून पिशवीत भरून लोकांपर्यंत पोहोचवणं हा मोठा टास्क होता. म्हणूनच दिलीप मामा या व्यवसायाला संपूर्ण वेळ मदत करू लागला. शोभा मामीची नणंद शुभदा नारिंगणेकर (आम्ही सगळेच प्रेमाने तिला विजू आत्या म्हणतो) हीदेखील मुलांना शाळेत सोडण्याचं काम करून घरी जमेल तशी मदत करायची. शोभा मामीला हा व्यवसाय सुरू करण्यामध्ये अनेक अडचणी आल्या, पण म्हणतात ना जेव्हा एखादी स्त्राr आपला संसार उभा करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांचं पोट भरण्यासाठी संसाराची सगळी सूत्रं आपल्या हातात घेते तेव्हा जगातलं कितीही मोठं संकट आलं तरी त्यावर मात करत आपल्या कुटुंबाला सावरते.
मला आजही एक किस्सा आठवतो. शोभा मामी संक्रांतीला तिळाचे लाडू विकण्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा विजू आत्याने माझ्या आईला बोलावून लाडू शिकून घेतले. सहज एकदा शोभा मामीने माझ्या डॅडींना, विक्रीसाठी चकली दुकानात ठेवता येईल का याबद्दल विचारले. डॅडींनी दादरमधील सुप्रसिद्ध ‘मनोहर बिस्किट मार्ट’मध्ये विचारणा केल्यावर पाव किलो चकलीची चार पाकिटांची ऑर्डर मिळाली आणि बघता बघता चार पाकिटांपासून सुरू झालेला प्रवास अनेक किलोंच्या चकलीपर्यंत पोहोचला. तसंच दादरमधील ‘श्रीनाथजी’ यांचीसुद्धा आार्डर मिळाली. या दोन्ही दुकानांमुळे शोभा मामीच्या व्यवसायाची व्याप्ती वाढत गेली. कधी मौज मजा नाही, सणवार नाही, चित्रपट पाहणं नाही की हॉटेलमध्ये जाणं नाही. पण वर्षानुवर्षे गणपती स्थापनेची परंपरा मात्र तिने कायम राखली.
शोभा मामीने तिच्या हाताखाली काम करण्यासाठी 3-4 जणींची नियुक्ती करून त्या गृहिणींनाही आर्थिक हातभार दिला. दिवाळीला 700 – 800 किलो चकलीची ऑर्डर तिला मिळू लागली. काही दुकानदार चकलीची ऑर्डर घेण्यासाठी घरी आले होते तेव्हा ती पुरणपोळीदेखील करते हे पाहून त्या दुकानदारांनी तिला पुरणपोळीच्या ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली. चकलीबरोबर तिचा पुरणपोळीचा व्यवसायही झपाटय़ाने वाढू लागला. दिलीप मामाच्या निधनाने शोभा मामीच्या व्यवसायातला खंबीर बुरूज कोसळला. तरीदेखील हार न मानता तिने व्यवसाय सुरू ठेवला. आजही एकटी खंबीरपणे व्यवसायाचा डोलारा पेलत आहे. शोभा मामीने स्वकष्टाने चालू केलेल्या व्यवसायामुळेच तिच्या संसाराची शोभा वाढू शकली. शोभा मामीसारख्या असंख्य महिला ज्या घरगुती व्यवसाय करून आपल्या संसाराचा डोलारा पेलत आहेत अशा सर्व स्त्राrशक्तीला मानाचा मुजरा.
(लेखक युटय़ूब शेफ आहेत.)