लेख – गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने…

>> साहेबराव निगळ

गुरूचे नेमके कार्य कोणते, असा प्रश्न विचारला जातो. गुरू हा शिष्याच्या मनातील न्यूनगंड दूर करून त्याच्या शंकांचे निरसन करून त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतो. साधना ही शिष्याला स्वतःच करावयाची असते. कोणत्याही जातीत व कुळात सत्पुरुष निर्माण होऊ शकतात. तसा इतिहासही आहे. अनेक प्रकारची बंदी समाजावर लादणाऱया सनातन्यांनी या बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जातीचे श्रेष्ठत्व, वर्चस्व अभिमान बाळगणारे परंपरावादी या व अशा ऐतिहासिक बाबी मान्य करतील काय? उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या गोष्टींचा विचार व्हावा.

प्रत्येक समाजात फार पूर्वीपासून गुरु संस्थेचा आदर करण्याची परंपरा आहे. आजच्या काळातही गुरूंचा वा शिक्षकांचा आदर केला जातो. गुरु या शब्दात गु व रु अशी दोन अक्षरे आहेत. गु म्हणजे अंधकार व रु म्हणजे निवर्तक. शिष्याच्या मनातील अज्ञान व विपरीत ज्ञानरूपी अंधकार दूर करण्याचे पवित्र कार्य करणाऱया व्यक्तीस गुरु म्हणतात. भारतीय परंपरेनुसार ईश्वर हाच सर्व प्रकारच्या ज्ञानपरंपरांचा मूळ स्रोत आहे.

भारतीय सांस्कृतिक परंपरेत गुरूंचे अनेक प्रकार सांगण्यात आलेले आहेत. परंतु त्यांच्यापैकी दोन प्रकार महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे विद्या गुरू आणि दीक्षा गुरू होत. विद्या गुरू हे जिज्ञासू विद्यार्थ्यांना ज्ञान देतात. दीक्षा गुरू हे योग्य त्या शिष्यास दीक्षा देतात. दीक्षा गुरू दीक्षित शिष्याची जबाबदारी स्वीकारतात. म्हणून असे गुरू हे सद्गुरु होत. असे सद्गुरु विरळच असतात. अर्थात सत्शिष्यही विरळच असतात. विशेषतः आध्यात्मिक क्षेत्रात असे गुरू साधकास (सत्शिष्यास) साधना मार्ग देतात. साधकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतात व त्याच्याकडून साधना करून घेतात. शेवटी साधना ही शिष्याला वा साधकाला स्वतःच करावयाची असते.

विचारदाता, ज्ञानदाता या अर्थाने ज्ञानी लोक समाजाला सन्मार्ग दाखवितात. समाजाचे प्रबोधन करीत असतात. अशा विचारदात्यांचा वा प्रबोधनकारांचाही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आदर केला पाहिजे. यादृष्टीने लोकशिक्षक, कर्ते समाजसुधारक, कर्ते धर्मसुधारक हे समाजाला गुरुस्थानी असतात.

गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते. व्यास हे वेदवाङ्मयाचे पहिले संपादक होत. ‘एक एव पुरा वेदः’ असे वचन आहे. वेदविद्या टिकवून ठेवण्यासाठी व्यासांनी वेदविद्येचे संकलन केले व वेदांचे चार भाग करून चार शिष्यांना वाटून दिले. हे चार भाग म्हणजेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद होत. म्हणून व्यासांना वेदव्यास म्हणतात. वेदव्यासांचे चार शिष्य होते- सुमंत, जैमिनी, पैल व वैशंपायन. चार वेदांचे चार उपवेद होते. ते म्हणजे आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद व स्थापत्य वेद. प्रत्येक वेदाच्या शेवटी येणाऱ्या भागास उपनिषद म्हणतात. म्हणूनच उपनिषदांना वेदांत असेही म्हटले जाते. उपनिषदे ही वेदांचे ज्ञानकांडं म्हणूनही प्रसिद्ध आहेत. वेद व्यासांनी उपनिषदांचे सार म्हणून 555 सूत्रे लिहिली. त्यांना ब्रह्मसूत्रे म्हणतात. त्याचबरोबर व्यासांनी महाभारत व अनेक पुराणेही लिहिली असे मानले जाते. याच महाभारतात भगवद्गीता हा कोहिनूररूपी श्रीकृष्ण-अर्जुन संवाद ग्रथित केलेला आहे. या दृष्टीने विचार केल्यास गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा का म्हणतात हे लक्षात येईल. वेद व्यासांचे वैचारिक व वाङ्मयीन कार्य हे फार प्रचंड आहे.

वेदव्यासांचे साहित्य हे सर्वांसाठी उपयुक्त आहे. महाभारतात वेदव्यासांनी मानवी जीवनाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकलेला. श्रेष्ठ व्यक्तीच्या त्रुटीही त्यांनी महाभारतात दाखवून दिलेल्या आहेत. तसेच सामान्य माणसांमधील सद्गुणही त्यांनी प्रकर्षाने मांडलेले आहेत. म्हणूनच वेद व्यास हे मानवी जीवनाचे खरे भाष्यकार होत.

‘गुरु’ पदाच्या विरुद्ध अर्थ दर्शविणारा शब्द आहे ‘लघु.’ लघु म्हणजे कोत्या मनाचा माणूस होय. गुरू म्हणजे कणखर व व्यापक मन असलेली व्यक्ती होय. गुरूची योग्यता असलेल्या माणसाच्या मनात सर्वांविषयी कळवळा, करुणा असते. गुरू सर्वांच्या भल्याची चिंता करतो. संतश्रेष्ठ तुकोबांनी खऱया साधूची व्याख्या केलेली आहे. ती अशी-

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा।
या संदर्भात संतश्रेष्ठ तुकोबांचे विचार फार मूलगामी व क्रांतिकारी विचारप्रवर्तक आहेत. ते म्हणतातः
शिष्याची न घे सेवा। मानी देवासारिखे।
त्याचा फळे उपदेश। आणिका दोष उफराटे।
मेघवृष्टीने करावा उपदेश। परि गुरुने न करावा शिष्य।
शिष्याला जो देवासारखा मानतो तो खरा गुरू होय. तुकोबांनी कोणालाही गुरू केलेले नव्हते. ते लिहितात ः
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव। आपणची देव होय गुरु।
प्रामाणिक व खऱया साधकाला ईश्वरच मार्गदर्शन करतो.

या दृष्टीने मध्ययुगीन संत व आधुनिक काळातील गाडगेबाबा व केरळातील श्री नारायण गुरू यांसारखे संत हे समाजाचे गुरूच होत. ते लोकहितार्थ निःस्वार्थपणे कार्य करणारे खरे लोकशिक्षक होते. आजच्या वित्तप्रधान काळात अनेक भोंदू साधू व वाचाळवीर आढळून येतात. या संदर्भात संस्कृतात एक सुभाषित आहे

बहवो गुरवो लोके शिष्यवित्तापहारकाः।
क्वचित् तु तत्रदृश्यन्ते शिष्य चित्तापहारकाः।

सुभाषितकार म्हणतो- समाजात अनेक तथाकथित गुरू असतात, ज्यांचं लक्ष अनुयायांच्या वा शिष्यांच्या खिशाकडे व तिजोरीकडे असते. शिष्याच्या मनाचा, त्याच्या विकासाचा विचार करणारे गुरू फारच विरळ असतात. आश्चर्य म्हणजे असे गुरू आजही आपल्या समाजात आहेत. हेच गुरू अनादी काळापासून चालत आलेल्या प्राचीन ऋषी परंपरेचे व त्यानंतरच्या संत परंपरेचे समर्थक व वाहक असतात.

गुरूचे नेमके कार्य कोणते, असा प्रश्न विचारला जातो. गुरू हा शिष्याच्या मनातील न्यूनगंड दूर करून त्याच्या शंकांचे निरसन करून त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतो. साधना ही शिष्याला स्वतःच करावयाची असते. कोणत्याही जातीत व कुळात सत्पुरुष निर्माण होऊ शकतात. तसा इतिहासही आहे. अनेक प्रकारची बंदी समाजावर लादणाऱया सनातन्यांनी या बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जातीचे श्रेष्ठत्व, वर्चस्व अभिमान बाळगणारे परंपरावादी या व अशा ऐतिहासिक बाबी मान्य करतील काय? गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वरील गोष्टींचा विचार व्हावा, ही नम्र अपेक्षा.