>> दत्तप्रसाद शिरोडकर
अग्निपथ योजनला आक्षेप घेणाऱ्या नेपाळने आपल्या युवकांना भारतीय सैन्यात सेवेसाठी पाठवण्यास नकार दिल्यामुळे 200 वर्षांचा ऐतिहासिक वारसा अडचणीत आला आहे. गोरखा रेजिमेंटमध्ये मागील सहा वर्षांत एकाही नेपाळी गोरख्याचा नव्याने समावेश होऊ शकलेला नाही. चीन या स्थितीचा लाभ उठवण्याच्या प्रयत्नात आहे.
महाराजा रणजित सिंग यांनी 1809-1814 मध्ये पहिल्यांदा शूर व आक्रमक गोरखा जमातीची बटालियन तयार केली होती. ब्रिटिशांनी पुढे त्याचाच अवलंब केला. 1947 मध्ये नेपाळ आणि ब्रिटनशी झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार भारतीय सैन्याने नेपाळी गोरख्यांची भरती सुरू केली. गोरखा रेजिमेंटमध्ये नेपाळी आणि भारतीय गोरख्यांचा समावेश आहे. आजवरच्या अनेक युद्धांत रेजिमेंटने शौर्याचे दर्शन घडवले आहे. सद्यस्थितीत 30 हजार नेपाळी गोरखा भारतीय सैन्यात सक्रिय सेवेत असृन 90 हजार माजी सैनिक निवृत्ती वेतन घेत आहेत. भारतीय सैन्यात 7 गोरखा रेजिमेंट आणि चाळीसहून अधिक बटालियन्स आहेत.
नेपाळमधील भरती थांबल्याने गोरखा रेजिमेंटची रचना बदलत आहे. नेपाळी गोरख्यांची पोकळी भरून काढण्यासाठी भारतीय लष्कराने उत्तराखंडमधील कुमाऊँ व गढवाल भागातून जवानांची भरती सुरू केली आहे. रेजिमेंटची एकसंध रचना युनिट्समधील सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक बंध घट्ट करते. त्यांना युद्धभूमीवर प्रेरित करते. गोरखा रायफल्समध्ये बिगर गोरख्यांच्या प्रवेशाने त्यांचे वांशिक स्वरूप मोडल्यामुळे गोरखा रायफल्स तुकड्याच्या सौहार्दाला हानी पोहोचेल, अशी भीती या रेजिमेंटमधील काही निवृत्त अधिकाऱ्यांना वाटते.
भारतीय सैन्यात नेपाळी गोरख्यांची अनुपस्थिती हा महत्त्वपूर्ण बदल ठरतो. कारण चीन या स्थितीचा लाभ उठवण्याच्या प्रयत्नात आहे. एकूणच काय, अग्निपथ योजनेला आक्षेप घेणाऱ्या नेपाळने आपल्या युवकांना भारतीय सैन्यात सेवेसाठी पाठवण्यास नकार दिल्यामुळे 200 वर्षांचा गोरखा रेजिमेंटचा साहस आणि आक्रमक ऐतिहासिक वारसा अडचणीत आला आहे.