
>> श्रीनिवास बेलसरे
ख्रिस्ती धर्माचा आध्यात्मिक प्रवास हा काटेकोर न्यायाच्या आग्रहापासून ते थेट विनाशर्त क्षमाशीलतेपर्यंतचा आहे. कारण माणसात सकारात्मक बदल हा शिक्षेने नाही तर प्रेमाने आणि क्षमेनेच होतो असा येशूचा दृढविश्वास होता आणि तोच आजच्या गुड फ्रायडेचा संदेश आहे!
ज्या यहुदी समाजात येशूचा जन्म झाला त्या समाजातील मोशे हा पहिला प्रेषित तर येशू शेवटचा! मोशेने, परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे, समाजासाठी काही धर्माज्ञा दिल्या. त्या वेळच्या अप्रबुद्ध समाजासाठी कठोर कायद्याची गरज होती. त्याप्रमाणे मोशेने स्पष्टपणे सांगितले की, गंभीर गुह्याबद्दलच्या शिक्षेत कोणतीही सूट देण्यात येऊ नये. अशा गुन्हेगारांना देण्यात येणारी शिक्षा कठोरच असावी. कुणी कुणाचा डोळा फोडला तर त्याचा डोळा फोडण्यात यावा. कुणी मनुष्य हत्या केली तर खुन्याला देहदंडच देण्यात यावा. आजची वाढती गुन्हेगारी आणि प्रत्येक नव्या गुह्यात वाढत चाललेली क्रूरता पाहता मोशेचे म्हणणे बरोबरच होते असे अनेकदा वाटते.
मात्र शिक्षा देताना विवेक पाळावा असाही त्याचा दृष्टिकोन दिसतो. एखाद्या व्यक्तीने केवळ चाबकाचे फटकारे देण्याइतका अपराध केला असेल तर ‘त्याला 40 फटके मारावेत, 41 मारू नयेत’ असेही मोशेने सांगितले होते! इतकेच काय तर ‘न्यायाधीशाने आपल्या समक्ष त्या व्यक्तीस पालथे पडावयास लावून त्याच्या पाठीवर हे फटके मोजून मारवून घ्यावेत.’ इतका तपशील मोशेच्या आदेशात दिसून येतो. ‘न्यायाधीशांसमोरच शिक्षेची कारवाई व्हावी’ असे सांगून त्याने जणू हल्लीसारखी क्रूरातल्या क्रूर गुन्हेगारांना गुपचूप दिली जाणारी ‘व्ही.आय.पी. वागणूक’ दिली जाऊ नये याची दक्षताच घेतलेली दिसते!
मोशेने माणसाची स्खलनशीलता लक्षात घेऊन त्याला द्यावयाच्या शिक्षा सांगितल्या आहेत. त्यांचे लक्षणीय बारकावे पाहून आपण चकित होतो. जर ‘एखाद्या लाकूडतोडय़ाकडून चुकून त्याच्या कुऱहाडीचा फाळ निसटला आणि तो कुणाला लागून त्याचा मृत्यू ओढवला तर त्याला देहदंड देऊ नये’ असाही आदेश मोशे देतो. एवढेच नव्हे तर ‘अशा निर्दोष लोकांसाठी तीन गावे स्थापन करावीत, त्यांना शरणपूर म्हणावे.’ तिथे ज्यांच्याकडून अजाणतेपणी गुन्हा घडला आहे त्यांना अभयदान देऊन राहू देण्यात यावे’ असाही आदेश मोशे देतो. त्याने शेतकऱ्यांना दिलेल्या आज्ञात त्याच्यातल्या संवेदनशील माणसाचे दर्शन घडते. तो म्हणतो, ‘मळणी करताना बैलाच्या तोंडाला मुस्के बांधू नकोस. एकदा कापणी केल्यानंतर पुन्हा शेतात जाऊन उरलेली कणसे उचलू नकोस. ती गावातील उपऱ्यांसाठी, विधवा आणि निराधार लोकांसाठी सोडून दे. असे केल्याने परमेश्वर तुला आशीर्वादच देईल.’
मोशेच्या काही शतकांनंतर येशूचा जन्म झाला. येशूची शिकवण मोशेपेक्षा अगदी वेगळी होती. त्याने अपराध्यास शिक्षेऐवजी चक्क संपूर्ण क्षमा सांगितलेली आहे, मात्र तो नेहमी म्हणत असे ‘मी जुने धर्मशास्त्र रद्द करण्यास आलेलो नाही, ते पूर्ण करण्यासाठी आलो आहे.’
येशू सांगत असे ‘तुझ्या शत्रूने तुझ्या गालावर थप्पड मारली तर तू त्याच्यापुढे दुसरा गाल कर.’ आपल्याला लगेच वाटते की ही आज्ञा किती अव्यवहारी आहे! अशाने तर सज्जन माणूस सतत मारच खात राहील आणि दुर्जनाचे धाडस अजूनच वाढेल. शिक्षा दिल्याशिवाय तो कसा सुधारेल? परंतु याचे कारण आपण नेहमी अशी कल्पना करत असतो की कुणीतरी आपल्या तोंडात मारली आहे आणि आपण गाल पुढे करायचा आहे. तसे करणे आपल्याला आपला पराभव वाटतो, भित्रेपणा वाटतो. याउलट जर आपण कल्पना केली की आपण कुणाच्या तोंडात मारली आणि त्याने दुसरा गाल पुढे केला तर काय होईल? मग लक्षात येते की, शंभरपैकी 90 लोकांचे उत्तर असेल ‘मी त्याला दुसऱयांदा थप्पड मारणार नाही. उलट ‘हा रागावत कसा नाही? प्रतिकार का करत नाही?’ असा विचार माझ्या मनात सुरू होईल.
येशूंनी जे सांगितले ते हेच की, माणूस आपल्या कृतीवर विचार करू लागतो तेव्हाच त्याच्यात बदल घडू शकतो. प्रतिकाराने किंवा शिक्षेने त्याची विचारशक्ती बंद होऊन तो अधिक गुन्हे करण्यास धजावतो. सकारात्मक बदल हा विचारानेच होऊ शकतो, प्रतिकाराने नाही ही येशूची शिकवण होती! त्याने स्वतःइतकेच प्रेम शत्रूवरही करण्याचा, अपराध्याला क्षमा करण्याचा, इतकेच नाही तर अपराध्यासाठी प्रार्थना करण्याचा सल्ला दिला आणि तो स्वतःही तंतोतंत पाळला. लोकांनी त्याच्यावर ईशनिंदेचा खोटा गुन्हा लावून त्याला चाबकाने रक्तबंबाळ केले. हातापायाला खिळे ठोकून क्रुसावर लटकावून, छातीत भाला भोसकून, ठार केले. त्यांच्यासाठीही मरणापूर्वी प्रभूने प्रार्थना केल्याचा उल्लेख आपण बायबलमध्ये वाचतो. प्रभू त्याच्या अतर्क्य प्रार्थनेचे कारणही देतो. तो म्हणतो, “देवा, यांना क्षमा कर. कारण ‘आपण काय करत आहोत’ ते त्यांना कळत नाही!’’
ख्रिस्ती धर्माचा अध्यात्मिक प्रवास हा असा काटेकोर न्यायाच्या आग्रहापासून ते थेट विनाशर्त क्षमाशीलतेपर्यंतचा आहे. कारण माणसात सकारात्मक बदल हा शिक्षेने नाही तर प्रेमाने आणि क्षमेनेच होतो असा येशूचा दृढविश्वास होता आणि तोच आजच्या गुड फ्रायडेचा संदेश आहे!