प्रासंगिक – गीतरामायण आणि गदिमा!

>> नागेश शेवाळकर

गीतरामायण हा सर्वकालीन रसिकांचा आवडता, अजरामर असा गीतसंग्रह! सुधीर फडके अर्थात बाबूजी यांच्या स्वरांचे जसे आगळेवेगळे गारूड रसिकांच्या मनात घर करून आहे. त्याचप्रमाणे या गीतांची रचना, शब्द यांचीही मोहिनी वर्षानुवर्षे रसिकांच्या हृदयात घर करून आहे. कोण आहेत या अजरामर गीतांचे गीतकार?  ‘गदिमा’ या नावाने सर्वदूर ख्यातनाम असलेल्या, मराठमोळ्या रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे, गदिमांनी भरपूर साहित्यनिर्मिती केली आहे. त्यांनी जवळपास 150 चित्रपटांसाठी गीतरचना केल्या आहेत. पंच्याहत्तरपेक्षा जास्त पटकथा त्यांनी लिहिल्या असून जवळजवळ पन्नास मराठी चित्रपट कथांचे ते लेखक आहेत. यासोबतच गदिमांनी हिन्दी चित्रपटांसाठीही बहुमोल कार्य केलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या पंचवीस कथांवर हिंदी सिनेमांची निर्मिती झाली आहे. गदिमांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई, कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही…’ हे अजरामर गीत लिहिले. गदिमांच्या नावावर एकूण दोन हजार गीते आहेत. यावरून एकापेक्षा एक सरस गीतांची निर्मिती करण्यात गदिमांचा हातखंडा होता हे लक्षात येईल.

रामायण हा आपल्या भारतीयांचा जणू श्वास! जिथे कुठे रामायण ऐकायला मिळते, प्रसंगानुरूप जिवंत देखावे उभे केले जातात तिथे रामभक्त भक्तीभावाने हजेरी लावून कान तृप्त होईपर्यंत ऐकतात. ऋषी वाल्मीकी यांनी रामायणाची रचना केली. गदिमांनी गीतरामायणात अवीट, श्रवणीय, सुमधुर अशा छप्पन्न गीतांची रचना केली आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून एक वर्षापेक्षा अधिक काळ या अमृततुल्य गीतांची मेजवानी रसिकांना ऐकायला मिळाली. गदिमांची गीतरचना आणि सुधीर फडके यांचा स्वर असा एक दुग्धशर्करा योग जुळून आला तो श्रीधर आणि आनंद माडगूळकर यांच्या व्रतबंधनाच्या वेळी. कार्यक्रमाला जमलेल्या मंडळीला न भूतो न भविष्यती अशी भेट याप्रसंगी मिळाली. खुद्द गदिमांनी यावेळी गीतांचे निवेदन केले आणि बाबूजींनी त्यास स्वरांचा साज चढविला. उपस्थित सारे अत्यंत तृप्तपणे, समाधानी अंतःकरणाने तिथून निघाले.

गीतरामायणाच्या रचनेला आज सत्तर वर्षे होऊन गेली असली तरीही त्या रचनांमधला गोडवा, टवटवीत भाव, ताजेपणा, श्रवणता, भक्तिभाव इत्यादी अनेक भाव, तन्मयतेने ओतलेले सारे रस तेवढय़ाच जोमदारपणे टिकून आहेत. हे आहे गदिमांच्या अक्षरांचे सामर्थ्य आणि बाबूजींच्या आवाजाची जादू. गीतरामायणाची ही जादू इथेच थांबत नाही, तर गीतरामायणाचे हिंदी, गुजराती, संस्कृत, तेलगू, कन्नड, बंगाली, आसामी, मल्याळी, कोकणी अशा भाषांमध्ये रूपांतर झाले आहे. खरे तर मराठी भाषा आणि मराठी रसिकांसाठी हा एक मानाचा तुरा! गीतरामायणाची ही प्रचंड लोकप्रियता पाहून गदिमांना ‘महाकवी आणि आधुनिक वाल्मीकी’ अशा दोन पदव्या रसिकांनी दिल्या.

शिर्डीचे साईबाबा हे महाराष्ट्रातील भक्तांचे दैवत. शिर्डीच्या मंदिरात दररोज सकाळी काकड आरती होत असते. ‘काकड आरती करितो साईनाथ देवा, चिन्मयरूप दाखवी घेऊनी बालक – लघुसेवा!’ गदिमांनी लिहिलेली रचना दररोज शिर्डीच्या साई मंदिरात काकड आरतीच्या वेळी ऐकायला मिळते. गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमा म्हणजे चित्रपटसृष्टीत, वाङ्मयीन क्षेत्रात, तमाम भारतीयांच्या मनात स्वतःचे वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण करणारा एक ध्रुवतारा!     मराठी माणसाचा गौरव असणाऱ्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने 14 डिसेंबर 1977 रोजी पुणे येथे अखेरचा श्वास घेतला.