>> चंद्रसेन टिळेकर
गेली 25-30 वर्षे गर्भसंस्काराचे क्लासेस महाराष्ट्रातील मुख्य शहरात चालवले जातात. खरंच असल्या विधीने गर्भ संस्कारित होतो का? संतती नीतिमान निपजते का? गर्भसंस्काराचा फोलपणा समाजाला दाखवून देणे आता गरजेचे ठरत आहे.
आपल्या समाजातील वाढते अनाचार विशेषतः स्त्रियांवरील अत्याचार पाहून, ऐकून मनावर मोठे मळभ येते. हे कमी म्हणून की काय दर दिवशी कुठे ना कुठे अंधश्रद्धेच्या नादापायी भोळीभाबडी माणसे आपले सर्वस्व गमावून बसल्याचे वृत्त कानावर येतच असते. आपल्या समाजाला काही भवितव्य नाही असे मनात ठसत असता अचानक वाऱ्याची सुखद झुळूक यावी तशी बातमी कानावर पडते आणि मग सगळी मरगळ झटकून कविवर्य सुरेश भट म्हणतात तसे ‘अरे पुन्हा पेटवा आयुष्याच्या मशाली’ असे म्हणत आपण विवेकाची मशाल हातात धरून अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा अंधार दूर करायला सज्ज होतो. माझेही तसेच झाले. काहीसा विमनस्क अवस्थेत बसलो असता नारायणगावातील माझे प्रकाशक शिंदे यांचा फोन आला. मला म्हणाले, ‘‘सर, गेल्या तीन-चार महिन्यांच्या अवधीत ‘अंधश्रद्धेची वावटळ’ या पुस्तकाच्या शंभर प्रती सांगलीच्या परिसरात प्रसूतिगृह चालवणाऱ्या डॉ. पवार दांपत्याने मागवल्यात. मला वाटतं लेखक म्हणून तुम्ही त्यांचे आभार मानावेत. मी तुम्हाला त्यांचा फोन नंबर देतो.’’
वैद्यकीय व्यवसायात कार्यमग्न असलेल्या व्यक्तींना इतक्या आणि या पुस्तकांची गरज का पडावी हे काही समजेना. शेवटी एका रविवारी मी प्रसूतितज्ञ असलेल्या डॉ. पवारांना फोन लावला तो डॉ. पवार मॅडम यांनी उचलला. मी त्यांचे आभार मानले आणि विचारले, “एवढ्या प्रतींची गरज आपल्याला का पडली? कुठल्या शाळेतील विद्यार्थ्यांना भेट द्यायच्यात का?’’ त्यावर त्यांनी जे उत्तर दिले त्याने तर मी चक्रावूनच गेलो. त्या मला म्हणाल्या, ‘‘अहो आम्ही पती-पत्नी इथे गायनाकॉलिजिस्ट म्हणून काम करतो. आमचे इथे मोठे प्रसूतिगृह आहे. तीन-चार महिने उलटून गेल्यावर गर्भार स्त्रिया दररोज तपासणीसाठी येत असतात. हा भाग थोडा आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच आहे. त्यामुळे फीसाठी थांबणे क्रमप्राप्तच असते, पण अलीकडे मला त्या स्त्रियांकडून समजले की, त्या शेजारच्या गावात कुणी गर्भसंस्काराचे वर्ग उघडलेत तर त्या तिकडे जात असतात. तिथे रोख तीन-चार हजार मोजतात, पण डॉक्टरांची फी मात्र सवडीने देतात. त्या बायांचे गर्भसंस्कारसंदर्भात प्रबोधन करणे आवश्यकच होऊन बसले होते. कुणीतरी मला तुमचे पुस्तक भेट दिले. तुम्ही त्या पुस्तकात अगदी सोप्या भाषेत गर्भसंस्काराचा फोलपणा दाखवून दिला आहे. म्हणून मी तुमच्या प्रकाशकाकडून अधूनमधून तुमची पुस्तके मागवते आणि कोणी गर्भार स्त्री तपासणीसाठी आली की, पहिल्यांदा तिच्या हातात ते पुस्तक देते आणि सांगते आधी हे पुस्तक वाच व मगच ठरव गर्भसंस्कार करून घ्यायचा का नाही ते.’’
मला थोडासा आश्चर्याचा धक्काच बसला. कारण गर्भसंस्काराचे हे फॅड शहरी मंडळीत चांगलेच लोकप्रिय आहे मला माहीत होते पण ग्रामीण भागामध्ये हा वेडाचार पोहोचला असेल याची मला कल्पना नव्हती. विलेपार्ल्यासारख्या उच्चभ्रू वस्तीत तर एक प्रसिद्ध प्रसूतितज्ञ विदुषी काही वर्षांपूर्वी असे क्लासेस चालवित होत्या आणि सुशिक्षित गर्भार स्त्रिया तिथे प्रवेश मिळावा म्हणून धडपडत असायच्या. अंधश्रद्धेवर आधारित एक नवीनच व्यवसाय सुरू झाल्याचे दिसत होते. या आधुनिक काळात मात्र या संस्काराने भलतेच बाळसे धरले आहे हे दिसत होते.
हा संस्कार गरोदर स्त्रिया साधारणतः पाचव्या-सहाव्या महिन्यांत करून घेताना दिसतात. काय आहे हा संस्कार? तर गरोदर स्त्रीला समोर बसवून भटजी, गुरुजी, पुरोहित अशी तत्सम मंडळी निरनिराळे मंत्र म्हणतात. उदाः गायत्री मंत्र, हनुमान चालीसा, स्तोत्र वगैरे त्या स्त्रीला ऐकवले जाते. समज असा आहे की, ती गरोदर माता जेव्हा हे असले काही अध्यात्मात, धर्मशास्त्रात प्रासादिक म्हणतात ते ऐकते, तेव्हा त्या मातेच्या पोटातील गर्भही ते ऐकत असतो. पुढे जेव्हा तो अवनीतलावर प्रत्यक्षात आयुष्य जगू लागतो, तेव्हा तो या संस्कारामुळे सुसंस्कारित म्हणजेच सुसंस्कृत जीवन जगतो. नीतिमान तर होतोच, पण बुद्धिमानही होतो. गंमत म्हणजे जे मंत्र, स्तोत्र वगैरे म्हटले जातात ते बहुतांशी संस्कृतमध्ये असतात. मुळात गर्भार मातेलाच ते समजत नाहीत तर तिच्या गर्भातल्या जिवाला ते कसे कळावे? पण एवढा विचार करतो कोण? गेली 25-30 वर्षे असे संस्काराचे क्लासेस महाराष्ट्रातील मुख्य शहरात चालवले जातात. पण त्यातून नेमकी कोणती निष्पत्ती झाली समाजाला? नीतिमान अन् बुद्धिमान माणसे मिळाली का? हे ते क्लासवालेही सांगू शकत नाहीत. कारण असा कोणताच डेटा किंवा निष्कर्ष त्यांच्याकडे नसतो.
या ठिकाणी एक मूलभूत प्रश्न उभा राहतो तो म्हणजे खरंच असल्या विधीने गर्भ संस्कारित होतो का? संतती नीतिमान निपजते का? या प्रश्नाचे नकारात्मक स्पष्टीकरण नुकतेच दिवंगत झालेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी आपल्या पुस्तकात दिले आहे आणि यासंदर्भातले प्रबोधन त्यांनी सातत्याने लेख लिहूनही केले आहे. प्रश्न असा आहे की, गर्भाच्या ज्या वयात हा संस्काराचा आटापिटा केला जातो त्या काळात किंवा दिवसांत ज्याला वैद्यकीय संज्ञेत न्यूरोलाजिकल सिस्टिम (मेंदू, व मज्जा संस्थेशी संबंधित असलेली शाखा) कितपत कार्यरत झालेली असते? उत्तर आहे, जवळ जवळ नाहीच. मोठा आवाज झाला तर गर्भ दचकतो हे सत्य आहे. परंतु संस्कार विधीत म्हटल्या गेलेल्या मंत्राचा, स्तोत्राचा, चालीसाचा त्याला काहीच बोध होत नाही.
गर्भसंस्काराची सत्यता पटावी म्हणून महाभारतातल्या अभिमन्यूची कथा सांगितली जाते की, माता सुभद्राच्या पोटात असताना अभिमन्यू चक्रव्यूहात कसे शिरायचे ते शिकला, पण बाहेर कसे पडायचे ते माता सुभद्राला झोप लागल्यामुळे ते अभिमन्यूला सांगता आले नाही. त्यामुळे तो चक्रव्यूह भेदून बाहेर पडू शकला नाही व त्याचा मृत्यू झाला. आता आपलेच नाही तर जगातल्या एकूणच धर्मग्रंथांत सत्यकथा किती आणि भाकडकथा किती हे अभ्यासू मंडळींना सांगण्याची गरज नाही. पण सर्वसामान्य जनांनी मात्र असल्या वांझोट्या गर्भसंस्काराला भुलून आपली फसगत करून घेऊ नये हे मात्र इथे सांगितलेच पाहिजे असे मनापासून वाटते!
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)