संस्कृती-सोहळा – अविस्मरणीय गणेशोत्सव!

>> जे. डी. पराडकर

आपलेपणा आणि भक्तिभाव जपणाऱ्या उत्सवांमध्ये सर्वांना एकत्र आणण्याची मोठी ताकद असते. कोकणवासीयांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचे बालपणीचे रूप, तो साजरा सोहळा असाच डोळ्यांसमोर उभा राहतो.

दिवाळी सणापेक्षाही कोकणात ज्याचा अधिक बोलबाला असतो तो सण म्हणजे गणेशोत्सव! गावात येऊन गणेशोत्सव साजरा करण्याची कोकणवासीयांची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. आपलेपणा आणि भक्तिभाव वाढविणाऱया या उत्सवामध्ये सर्वांना एकत्र आणण्याची मोठी ताकद आहे. साधारण दोन महिने शिल्लक असतानाच गणेशोत्सवाची वाट पाहायला सुरुवात होते. कोकणातील अन्य वेळी बंद असणारी घरे गणेशोत्सवात आवर्जून उघडली जातात. भक्ती-शक्ती अशा भावनांचा संगम करणारा हा उत्सव कायम हृदयात घर करून राहतो.

मुंबईतून गावाकडे येणाऱयांना ‘चाकरमानी’ असे म्हटले जाते. मग ही व्यक्ती सामान्य असो अथवा श्रीमंत! चाकरमानी शब्दात सर्वांचा समावेश आहे. गणेशोत्सव जसा सर्वांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला, तद्वत चाकरमानी या शब्दात शहरातून गावाकडे येणाऱया प्रत्येकाचा समावेश असल्याने या शब्दालाही मोठे महत्त्व प्राप्त झालेय. चाकरीसाठी गावातून शहराकडे गेलेली व्यक्ती वर्षातून एक-दोन वेळा गावी येते. गावी आल्यानंतर शहरात काम करणाऱया या ‘चाकर’ माणसाला गावात मोठा ‘मान’ मिळतो. कदाचित म्हणूनच चाकरमानी असा शब्द प्रचलित झाला असावा. चाकरमानी माणसावर मोठी जबाबदारी असते. या व्यक्तीने शक्यतो गावी येताना खिसा भरून आणायचा आणि जाताना रिकामा करून जायचे असा प्रघात आहे. गावी आलेला चाकरमानी हा भक्तिरसात अक्षरश न्हायलेला असतो. गावी आल्यानंतर अशा व्यक्तींना नावाने हाक न मारता ‘काय, चाकरमान्यांनू कवा आलेव?’ असेच विचारले जाते. एकंदरीत गणेशोत्सव आणि चाकरमानी हे नातं दृढ आहे आणि ते चिरंतर कायम राहील.

बालपणी आम्ही साजरा केलेला गणेशोत्सव कायम स्मरणात राहणारा असल्याने या उत्सवाची चाहूल लागली की, बालपणाच्या आठवणी दाटून येतात. पूर्वी कोकणात यायचे म्हटले तर मुंबई-गोवा हा एकमेव मार्ग होता. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसची वाहन म्हणून एकमेव उपलब्धता होती. आमचं मूळ घर संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द गावात. आधी शिक्षण आणि नंतर नोकरी-व्यवसायासाठी गावापासून अन्य गावांत रहावे लागत असले तरी वर्षभरातील सर्व सणांना आमची पावले आंबेडची वाट चालायची.

गणेशोत्सवाच्या आधी दोन दिवस गावाकडील घरी राहणारा आमचा भाऊ दिगंबर हा कागद-पेन घेऊन घरातून दोन घाटय़ा उतरत मुख्य रस्त्यावर येऊन चाकरमान्यांना घेऊन येणाऱया बस मोजायचा. आमच्या भावाला लहानपणापासून वाहन या विषयाची कमालीची आवड. मुंबईतून राज्य परिवहन मंडळाच्या येणाऱया बस पाहण्यासाठी चक्क दोन दिवस रस्त्यावर अथवा घाटीत जाऊन बसायचे आणि त्यातून आनंद मिळवायचा असे ते रम्य दिवस होते.

मौजे असुर्डे येथून गंगाधरनाना ढोल्ये यांच्या गणेश मूर्ती शाळेतील मूर्ती घेऊन रामा सावरटकर नावाचा माणूस आमच्या आंबेडच्या घरी यायचा. घराजवळ असणाऱया ओढय़ाजवळ रामा सावरटकर आल्यानंतर गणेश मूर्तीला बांधलेले प्लॅस्टिक आधी दृष्टीस पडायचे. किरकोळ शरीरयष्टी मात्र काटक आणि उंच असणारा रामा मौजे असुर्डे येथून दहा किमीचे अंतर तुडवीत आमची गणेश मूर्ती घेऊन यायचा. त्याला लांबून पाहिल्यानंतर आम्हा मुलांची लगबग सुरू व्हायची. गणरायाबरोबरच रामाचेही ‘आबा’ यथोचित स्वागत करायचे. चहापान आणि पानसुपारी झाल्यानंतर निघण्यापूर्वी रामाच्या हातावर आबा न चुकता पोस्त ठेवायचे. हातात पडलेलं पोस्त पाहून रामाच्या चेहऱयावरचा थकवा क्षणात दूर व्हायचा. गणरायाचे आगमन झाले की, उत्सवाला जणू सुरुवात! गणपतीत आमच्याकडे दरवर्षी न चुकता येणारा एकमेव चाकरमानी म्हणजे अरविंदकाका. गणेश चतुर्थीला सकाळी सात वाजता शर्टला पाठीमागे दांडय़ाची छत्री अडकवून हसत हसत त्यांचे आगमन व्हायचे. अरविंदकाका आले म्हणजे कोरम पूर्ण होई. त्यांचे आगमन झाल्यानंतर सुरुवातीचा काही वेळ मी बस कशी मिळवली आणि तीन वाजता धामणीच्या पंपात उतरून सकाळ होण्याची वाट कशी पाहिली, हे ऐकण्यात जायचा.

जंगलात एकटय़ाच असलेल्या आमच्या घरात सायंकाळी आरत्यांना लवकर सुरुवात केली जायची. एका घरात दोन भाग असल्याने किमान दोन तास गळ्याच्या शिरा फुगवत आरत्या चालायच्या. अनेक वर्षे आमच्याकडे कोचावर बसलेली गणेश मूर्ती होती. या प्रसन्नवदनी मूर्तीच्या गळ्यात आमच्या बहिणींनी केलेला संधावळीच्या (गुलबक्षी) फुलांचा हार भलताच शोभून दिसायचा. देवांपुढे स्टीलच्या ताटलीत निरशा दुधाने काडीच्या सहाय्याने रांगोळी काढून शोभा वाढवली जाई. आरती संपली की, मनसोक्त भोवत्या आणि अखेरीस पहाडी आवाजातील देवे म्हटले जात. गूळ पोह्यांच्या प्रसादाच्या चवीची आठवण आली की, आजही मन क्षणात बालपणात पोहोचते.

आनंदाचे दिवस लगेच सरतात. गणेशोत्सवाचे तसेच होते. विसर्जनाची दुपार जिवावर येते. मनात नसतानाही दुपारची आरती करून एकदा मूर्ती बाहेर काढली की, विसर्जनासाठी पडणारी पावले मनाने जड होतात. विसर्जन आटोपून आल्यानंतरची रात्र सरता सरत नाही. दुसऱया दिवशी मुंबईला जाण्यासाठी निघालेला चाकरमानी अरविंदकाका अनेकदा एक घाटी उतरून, कधीकधी संगमेश्वरमधून, तर कधी मुंबईत पोहोचल्यानंतर लगेचच गावाकडे परतलेला आहे. गावाकडे प्रेम आणि आपलेपणा आहे म्हणून ओढ आहे हे सांगायला आणखी कोणता पुरावा हवा? अरविंदकाका नात्याने आमचा काका होता खरा, पण तो कोणताही आडपडदा न ठेवता आम्हा मुलांशी मित्रासारखा वागायचा. तो अत्यंत कमी बोलायचा. कमी बोलणारी माणसे निरीक्षण खूप उत्तम करतात. अरविंदकाकाचे तसेच होते. तो खूप चांगल्या नकला करायचा. त्याला थोडा आग्रह केल्यानंतर त्याची कळी खुलायची आणि मग गणेशोत्सवात रात्री नकलांचा खूप उत्तम कार्यक्रम पार पडायचा.

गणेशोत्सवात आगमन मूर्तीचे होते, पण सोबत ती प्रेम, आपलेपणा, माया, ममता सारं काही भरभरून घेऊन येते आणि भक्तिरसाबरोबरच आनंदाची मुक्त हस्ते उधळण करत असते. अखेर आमचीही गावाकडून परतायची वेळ यायची आणि त्याबरोबर वास्तवाचे भानही आणायची. त्यानंतरचा विरह पुढे अनेक दिवस असह्य व्हायचा.

[email protected]