आभाळमाया – विश्वरचनेतील कोडी

>> वैश्विक, [email protected]

सध्या जेम्स वेब नावाची अवकाश दुर्बिण पृथ्वी आणि सूर्याच्या ‘वॉ’ ‘लॅगरॅन्ज’ बिंदूंपैकी ‘एल-2’ वर स्थिरावलेली आहे. 25 डिसेंबर 2021 या दिवशी पाठवलेल्या या दुर्बिणीचे कार्य ‘इफ्रारेड (अवरक्त) किरणांचा वापर करून अवकाशातील ‘डस्ट क्लाऊड’च्या पलीकडचंही विश्व शोधण्याचे आहे. हबल टेलिस्कोपला ज्या अवकाशस्थ वस्तू अगदी फिकट दिसतात त्या जेम्स वेब ‘इफ्रारेड’ कॅमेऱ्याने स्पष्टपणे पाहू शकते. शिवाय एल-2 हा बिंदू पृथ्वीच्या पलीकडे असल्याने ही दुर्बिण सूर्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावरून मध्ये कोणताही दृश्य अडथळा न येता व्यवस्थितपणे आपले विश्व निरीक्षणाचे आणि छायाचित्रणाचे काम करू शकते. या दुर्बिणीने आतापर्यंत ‘अपूर्व’ म्हणता येईल अशी कामगिरी पार पाडली आहे.

यामध्ये अतिदूरवरच्या दीर्घिकांचा वेध घेणे, अशा दीर्घिकांमधील ताऱयांभोवतीच्या ग्रहमाला शोधणे आणि त्याचबरोबर विश्वनिर्मितीच्या काळातील अवकाशस्थ घडामोडींचा आढावा घेणे अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर आणल्या आहेत. या अद्वितीय ‘तिसऱया’ आणि ‘लालसर’ डोळय़ाने विश्वरचनेचे किंवा निर्मितीचे ‘वय’ नेमके किती याविषयी प्रश्न पडावेत इतक्या आदिम अवकाशस्थ वस्तूंचा धांडोळा घेण्याचा सपाटा लावला आहे.

या दुर्बिणीविषयी एकदा लिहून थांबता येत नाही, कारण ‘जेम्स वेब’ नित्यनवे संशोधन करत असते आणि ते सोप्या शब्दांत वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न आपण करत असतो. त्यामुळे जेम्स वेबचा उल्लेख वारंवार करणे अनिवार्य ठरते. एकूण 18 आरसे परस्परांना जोडून तयार केलेली ही दुर्बिण विश्वनिर्मितीनंतरच्या काळात अवघ्या 20 कोटी वर्षांनी आपले विश्व कसे होते याचा शोध घेईल. सध्या विश्वाचे वय 13.7 अब्ज प्रकाशवर्षे आहे. जेम्स वेबच्या संरचनेचा तपशील पुन्हा केव्हा तरी घेऊ.

यावेळी याच दुर्बिणीने शोधलेल्या एका क्वेसार म्हणजे ‘क्वासी स्टेलर ऑब्जेक्ट’ किंवा किंताऱयाचा वेध घेण्याविषयी असे क्वेसार (किंतारे) आपल्या विश्वाच्या केंद्रातील अतिविशाल कृष्णविवराच्या जवळ आढळतात. साहजिकच त्यांचा मागोवा घेतला तर विश्वरचनेच्या आरंभीच्या काळातील प्रक्रिया जाणण्यास मदत होते.

तर असाच एक ‘क्वेसार’ जेम्स वेब’ने शोधला असून त्याचे वैज्ञानिक नाव एपीएम-08279±5255 असे नेहमीप्रमाणेच लांबलचक आहे. गलय किंवा ‘लिंक्स’ तारकासमूहात असलेल्या या क्वेसार अथवा किंताऱयाची काही विस्मयकारी वैशिष्टय़े आहेत. हो क्वेसार ‘ऍबसॉरप्शन’ म्हणजे ‘शोषण’ करणारा आहे. तो अति प्रचंड अशा विवृत्ताकार (एलिप्टिकल) म्हणजेच लंबवर्तुळाकार दीर्घिकेसारखा दिसतो. ‘ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग’मुळे त्याच्या अनेक प्रतिमा दिसतात. आता हे ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग म्हणजे काय ते पुढच्या लेखात सविस्तर जाणून घेऊ. मात्र यामुळे एकाच अवकाशस्थ वस्तूच्या दोन किंवा अनेक प्रतिमा दिसतात एवढे लक्षात ठेवायचे.

‘एपीएम’ आणि निरीक्षणाच्या दरम्यान प्रचंड वस्तुमानाचे कृष्णविवरही आढळले आहे. याच कृष्णविवरामुळे त्याच्या मागच्या क्वेसारच्या प्रकाशाचं वक्रीकरण होऊन त्याच्या दोन प्रतिमा दिसतात. त्याला कारण त्यापुढे असलेल्या ‘मॅसिव्हा’ कृष्णविवराचे शक्तीशाली गुरुत्वाकर्षण. ते मागच्या किंताऱयाच्या प्रकाशाला वाकवून दोन्ही बाजूंनी यायला भाग पाडते आणि आपल्याला त्यामागच्या ‘एपीएम’ या एकाच क्वेसारच्या दोन किंवा अधिक प्रतिमा दिसतात. अशा प्र्रकारच्या ‘ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग’ किंवा ‘गुरुत्वीय भिंगा’मुळे अनेक कृष्णविवरांचा शोध लागला आहे.

या ‘एपीएम’बाबतची महत्त्वाची आणि गोष्ट म्हणजे त्याच्या वर्णपटातून असे लक्षात आलेय की, त्या दीर्घिकेच्या 50 पट पाण्याची वाफ आहे. याचा अर्थ आपल्या पृथ्वीवर जेवढे पाणी आहे त्याच्या 100 ट्रिलियन पट पाणी या ‘एपीएम’मध्ये सामावलेले आहे. (एक ट्रिलियन म्हणजे एकावर 12 शून्य) हा संपूर्ण विश्वात सर्वत्र पाणी असू शकण्याचा पुरावा आहे. विश्वनिर्मितीनंतर अवघ्या दीड अब्ज वर्षात तयार झालेल्या या क्वेसारमध्ये जर वाफेच्या स्वरूपातील का होईना पाणी सापडत असेल तर पाण्याची निर्मितीसुद्धा विश्वरचनेच्या सुरुवातीच्या काळापासूनच होत आली आहे हे सिद्ध होतं.विश्वरचनेतील या घटनांचा शोध आणि बोध आपल्याला घेता येतो तो जेम्स वेब किंवा ‘हबल’सारख्या अवकाश दुर्बिणींनी केलेल्या सखोल निरीक्षणातून. विश्व जाणून घेताना हेसुद्धा समजून घ्यायला हवं की, आपण डोळय़ांनी आणि विविध प्रकारच्या दुर्बिणींनी ज्या ‘विश्वा’चा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तो संपूर्ण विश्वाचा अवघा 4 टक्केच भाग आहे. त्यालाच ‘ऑब्जर्व्हेबल’ किंवा पाहता येण्यासारखे विश्व म्हणतात. विश्वातील उरलेल्या 96 टक्के भागांपैकी 23 टक्के डार्क मॅटर आणि 73 टक्के डार्क एनर्जी असून रेडिएशन आहे. तो आपल्यासाठी अजूनही बराचसा अज्ञाताचा प्रांत. त्यातील अनेक कोडी जसजशी उलगडली जातील तसतशी आपली आपल्या विश्वविषयीची जाणीव प्रगल्भ होईल.

गुंतागुंतीच्या विश्वरचनेचा आपण विचार करतो तो एक प्रकारे आपल्याच अस्तित्वाचा. कारण या विराट विश्वातीलच आपणही एक अतिसूक्ष्म कणाप्रमाणे आहोत.