
>> साधना गोरे
नारळातला गर किंवा गाभा म्हणजे खोबरं. ओलं नाहीतर सुकं खोबरं प्रत्येक घरी रोजच्या स्वयंपाकात असतंच असतं. खोबऱयाशिवाय जेवणाला चव ती काय! पण खोबरं या खाद्यपदार्थाविषयी अगदी विपरीत अर्थाचा एक वाक्प्रचार मराठीत आहे. तो म्हणजे ‘अब्रूचं खोबरं होणं.’ एखाद्याची समाजात नाचक्की झाली, अप्रतिष्ठा झाली की ‘अब्रूचं खोबरं झालं’ म्हणतात. शिवाय झोपमोड झाली की झोपेचं आणि काम वाया गेलं की कामाचंही खोबरं होतं. आता हे खोबरं होतं म्हणजे नेमपं काय होतं? तर नुकसान होतं, नाश होतो. या अर्थाचा नारळातल्या खोबऱयाशी कसा नि काय संबंध? बरं संबंध असला तर असू दे, पण तो इतका तिरपागडा कसा काय?
खोबऱयाचं फळ म्हणजे अर्थात नारळ. नारळाचं पीक भारतात समुद्रकिनारपट्टीच्या सर्व राज्यांमध्ये होतं. त्यातही केरळ, तामीळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश ही दक्षिणेकडची राज्ये नारळ उत्पादनात आघाडीवर आहेत. त्यामुळे तिथल्या भाषांमध्ये खोबऱयाला काय काय शब्द आहेत ते आधी पाहू. खोबऱयाला तामीळमध्ये ‘कोम्बै’, मल्याळीमध्ये ‘कोप्पर’, कानडीमध्ये ‘कोब्बरि’ किंवा ‘कोबरि’, तेलुगूमध्ये ‘कोब्बरि’ असे शब्द आहेत. आताच्या मराठीत ‘खोबरे’ असा शब्द असला तरी महाराष्ट्री प्राकृतमध्ये ‘कोप्पर’ असा शब्द होता. मल्याळी आणि महाराष्ट्री प्राकृतमधला शब्द अगदीच सारखा आहे, हे स्पष्टपणे दिसतं.
उत्तरेकडील भाषांमध्ये खोबऱयाला काय शब्द आहेत? कश्मिरीमध्ये ‘खूपरा’, हिंदीमध्ये ‘खोप्रा’, पंजाबीमध्ये ‘खोप्पा’, सिंधीमध्ये ‘खोपो’, गुजरातीमध्ये ‘खोपरूं’ म्हटलं जातं. कृ. पां. कुलकर्णींनी ‘व्युत्पत्तिकोशा’मध्ये संस्कृतमध्ये खोबऱयाला ‘खर्पर’ आणि प्राकृतमध्ये ‘खप्पर’ असे शब्द असल्याचं म्हटलं आहे. मात्र पुढं कुलकर्णी असंही म्हणतात की, ‘खर्पर हे उत्तरकालीन संस्कृतीकरण दिसते.’ म्हणजे हा शब्द संस्कृतने नंतरच्या काळात घेतला असावा. नारळ पिकाचं भारतातलं भौगोलिक स्थान लक्षात घेतलं तर हा शब्द मूळ द्राविडी भाषेतलाच असावा.
संस्कृतमधील ‘खर्पर’ शब्दाच्या अनेक अर्थांपैकी एक अर्थ आहे डोक्याची कवटी. मनुष्याच्या डोक्याची कवटी आणि नारळ यांचा आकार आणि बाह्यरूप बरंचसं सारखं दिसतं. दोन्ही गोलाकार दिसतात आणि बाहेरून टणक असतात. त्यामुळेच या दोन्हींसाठी संस्कृतमध्ये एकच शब्द वापरला गेला असावा किंवा आधी फक्त मनुष्याच्या कवटीसाठी वापरला जाणारा ‘खर्पर’ शब्द नंतरच्या टप्प्यावर उच्चार आणि रूपसाधर्म्यामुळे खोबऱयालाही वापरला गेला असावा. संस्कृत भाषा ही आजच्या इंग्लिश भाषेसारखी आहे. इंग्लिशचा ज्या-ज्या भाषांशी संपर्क आला त्या-त्या भाषांमधून तिने शब्दांची उसनवारी केली आहे. अगदी तसंच प्राचीन काळी संस्कृतनेही केलेलं दिसतं. प्रत्येक जिवंत भाषा अशी उसनवारी करतच असते, त्यात वावगं काहीच नाही.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय वातावरणात एक म्हण फार वापरली गेली, इतकी की या म्हणीने बातम्यांचे मथळे सजले. ती म्हण म्हणजे ‘जिकडं खोबरं तिकडं चांगभलं.’ समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांमध्ये सर्वात जास्त वापरल्या गेलेल्या म्हणीचा मान कोणाला द्यायचा झाला तर तो या म्हणीला द्यावा लागेल. महाराष्ट्रात खंडोबा, ज्योतिबा या लोकदैवतांच्या पालख्या निघतात तेव्हा गुलाल, भंडारा, खोबरं उधळण्याची आणि सोबत चांगभलं म्हणून या दैवतांचा जयजयकार करण्याची प्रथा आहे. यावरून जिथं फायदा, संधी असेल तिथंच लोक जातात, या अर्थाने ही म्हण वापरली जाते.
आता सुरुवातीला ज्या वाक्प्रयोगाचा उल्लेख केला त्याकडे येऊ. अब्रूचं/कामाचं/झोपेचं खोबरं होणं हा तो वाक्प्रचार. यातल्या खोबऱयाचा नारळाच्या खोबऱयाशी संबंध नाही असं कुलकर्णी म्हणतात. त्यांच्या मते, ‘इथे जो नाश, नुकसान हा अर्थ अभिप्रेत आहे, त्याचा संबंध कन्नडमधल्या दुसऱया एका शब्दाशी आहे. तो शब्द आहे ‘खोब्बरी.’ कन्नडमध्ये ‘खोब्बरी’ म्हणजे नाश, नुकसान.’ पण कुंडलीकजी कातगडे यांच्या ‘कन्नड-मराठी शब्दकोशा’त ‘खोब्बरी’ असा शब्द आढळत नाही. तर नाश करणे या अर्थाचा ‘कोप्परिसु’ असा एक शब्द त्यांच्या शब्दकोशात आहे. म्हणजे आता प्रश्न असा निर्माण होतो की, या वाक्प्रचारातला ‘खोबरं’ हा शब्द कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे, कानडीतल्या ‘खोब्बरी’ या शब्दावरून आला आहे की ‘कोप्परिसु’ या शब्दाचा तो अपभ्रंश आहे? की नारळाच्या खोबऱयाशी त्याचा संबंध आहे? या वाक्प्रचारातल्या खोबऱयाची संगती लावताना डोक्याचं खोबरं व्हायला लागलंय एवढं मात्र खरं!