जाऊ शब्दांच्या गावा – चावडी आणि चोल्ट्री कोर्ट

>> साधना गोरे

शीर्षकातला ‘चोल्ट्री कोर्ट’ शब्द वाचून लगेच गुगलला विचारू नका. थोडं थांबून लेख तर वाचा… जगात औद्योगिकीकरणाने अवतार घ्यायच्या आधी सगळीकडेच ग्रामसंस्कृती अस्तित्वात होती. भारतातली गावं तर स्वयंपूर्ण समजली जायची. स्वयंपूर्ण यासाठी की, गावातल्या दैनंदिन गरजा गावातच पूर्ण होत. अर्थात, औद्योगिकीकरणपूर्व काळात माणसाच्या गरजासुद्धा मोजक्या होत्या. भारतात ब्रिटिशांचा अंमल सुरू झाल्यावर काही प्रशासकीय बदल झाले, पण गावांची मूळची रचना आहे तशीच राहिली. तत्कालीन भारतातील, विशेषतः दक्षिण भारतातील ग्रामसंस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक होता चावडी.

आज आपण ‘चावडी’ शब्द फारच मर्यादित अर्थानं वापरतो. पण एकेकाळी चावडी हे गावातलं बहुउद्देशीय ठिकाण होतं. त्यामुळे आपसुकच त्याला बहुअर्थही लाभले. ‘व्युत्पत्तिकोश’कार कृ.पां. कुलकर्णींनी हा शब्द संस्कृतमधील ‘चौहाट’ शब्दावरून चाहवडी-चौवाडी-चावडी असा बदलत मराठीत आल्याचं म्हटलं आहे. यादवकालीन मराठीत ‘चाहवडी’ हे रूप वापरात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पण ‘व्युत्पत्तिकोशा’च्या पुरवणी आवृत्तीत कुलकर्णींनी कानडी शब्द ‘चावडि’ आणि तामीळमधला ‘शावडि’ हा शब्द दिला आहे. ‘चौहाट’ किंवा ‘चौवाडी’ ही रूपं ‘गीर्वाणलघुकोश’ या संस्कृत-मराठी शब्दकोशात आढळत नाहीत. वि. का. राजवाडे यांच्या ‘नामादिव्युत्पत्तिकोशा’त मराठी शब्दांची मुळे संस्कृत शब्दांमध्ये दाखवली आहेत; पण राजवाडय़ांच्या या कोशातही ‘चावडी’ शब्दाची माहिती आढळत नाही.

एकूण, ‘चावडी’ हा शब्द मूळ तामीळ असावा. तामीळमधून तो कानडीत आणि मग मराठीत आला असावा. संस्कृतमधील ‘चौहाट’ हे उत्तरकालीन म्हणजे नंतर स्वीकारलेलं रूप असावं असं म्हणायला जागा आहे.

तामीळ ‘शावडि’ आणि कानडी ‘चावडि’ या शब्दांचे अर्थ मराठीतल्या ‘चावडी’पेक्षा अधिक व्यापक आहेत असं दिसतं. तामीळ ‘शावडि’चे – धर्मशाळा, खेडेगावातील सार्वजनिक इमारत, चावडी, पोलीस चौकी आणि घरासमोरचा ओटा – इतके अर्थ आहेत. तर कानडी ‘चावडि’चे चौकी, मंडप, स्थान, कचेरी, सभागृह, लोकसमूह, चावडी, न्यायालय, पडवी, घरापुढील अंगण एवढे अर्थ आहेत. आता मराठी चावडीचा शब्दकोशातला अर्थ पाहू – कचेरी, पोलीस चौकी, गावातील कामकाजाची जागा, धर्मशाळा, कुटाळपंपूचा अड्डा, सारा, सरकारला द्यावयाचा कर. याशिवाय ग्रामपंचायतीचं कार्यालय, गावातलं पाटील-कुलकर्ण्याचं घर, बाजाराची जागा, ग्रामसभा भरते ते ठिकाण यांनाही आज ‘चावडी’ म्हटलं जातं.

तामीळ व कानडी भाषेत ‘चावडी’चे जे अर्थ दिले आहेत त्यांपैकी घरापुढील अंगण किंवा ओटा, पडवी हा अर्थ मराठी अर्थापेक्षा एकदमच वेगळा आहे. मराठीत सार्वजनिक, सगळय़ा गावाची गोष्ट ती चावडीची. गोष्ट चावडीवर आणणं म्हणजे चव्हाटय़ावर आणणं, लोकांसमोर आणणं. याचा अर्थ मराठीने चावडीचा अंगण किंवा ओटा, पडवी हा अर्थ स्वीकारला नाही. त्यासाठी मराठीत चावडी शब्दाशी साधर्म्य असणारा आणखी एक शब्द आहे. तो शब्द म्हणजे ‘देवडी’. ‘देवडि’ हा शब्दसुद्धा कानडी आहे आणि कानडीत त्याचा अर्थ आहे उंबरा.

आता फिरून ‘चावडी’वर येऊ या. ब्रिटिशपूर्व काळात चावडी हे न्यायनिवडा करण्याचंसुद्धा ठिकाण होतं. एखाद्याच्या घरावर पडलेला दरोडा असो, वाटमारी असो नाहीतर भावाभावाचं, नवरा-बायकोचं विकोपाला गेलेलं भांडण असो; या सगळ्या प्रकरणांवर गावातला पाटील न्यायनिवाडा करत असे. त्यासाठी चावडी भरणार असल्याची रीतसर आगाऊ दवंडी दिली जात असे. आजच्या भाषेत सांगायचं तर, ‘नोटीस’ दिली जात असे. या अर्थानं चावडी हे न्यायनिवाडा करण्याचं गावातलं न्यायालयच होतं. ब्रिटिश आल्यावर त्यांनी त्यांचे कायदेकानू लागू केले, पण गावातल्या लहानसहान प्रकरणांसाठी चावडीतली न्यायनिवाडय़ाची पद्धत कायम ठेवली. यासाठी त्यांनी Choultry Justice / Choultry Court हे शब्द जन्माला घातले. यातील Choultry (चोल्ट्री) शब्द ‘चावडी’चेच अपभ्रंश रूप आहे.

‘चावडीवर दरोडा’ अशी एक मराठी म्हणही आहे. ज्यांनी लोकांचे संरक्षण करायचे, त्यांना स्वतःचेच रक्षण करता येईनासे झाले म्हणजे ही म्हण वापरतात.

मराठेशाहीच्या काळात ‘चावडी’ शब्द हिंदीमध्ये पोहोचला. दख्खनी हिंदीमध्ये त्याचं रूप ‘चावरी’ झालं आणि उत्तर भारतीय हिंदीच्या बोलींमध्ये त्याची रूपं बदलत बदलत तो ‘चावडी’ झाला. पण हिंदीमध्ये ‘चावडी’ शब्द बाजाराशी अधिक संबंधित आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिह्यातील चावरी बाजार किंवा जुन्या दिल्लीतला चावडी बाजार प्रसिद्ध आहेत. दिल्लीत तर चावडी बाजार नावाचं मेट्रो स्टेशनसुद्धा आहे.