सूर-ताल- बोले स्वर बासरीचा

>> गणेश आचवल

अनेक मान्यवरांच्या कार्यक्रमांतून आपल्या बासरीचा प्रभाव निर्माण करणारा वरद कठापूरकर! बासरी वादनाच्या क्षेत्रात पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ त्याने आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतरही रियाजाला रिप्लेसमेंट नसते हे तत्त्व तो आवर्जून पाळतो.

बासरी वादनाच्या क्षेत्रात पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ आपला ठसा उमटवणारा बासरी वादक म्हणून आपल्याला वरद कठापूरकर परिचित आहे. सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, श्रीधर फडके,  शंकर महादेवन, सोनू निगम, संगीतकार अशोक पत्की, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि अशा अनेक मान्यवरांच्या सांगितिक कार्पामांतून वरदचे बासरी वादन आपण ऐकले आहे. त्याचा या क्षेत्रातील प्रवास मोठा रंजक आहे. तो जेव्हा  साडेतीन वर्षांचा होता तेव्हाची गोष्ट. तो आजोबांकडे गेला होता. त्याचे आजोबा उभी बासरी वाजवत होते. वरद त्या बासरीकडे आकर्षित झाला.  आजोबांना सांगून त्याने ती बासरी घरी आणली. घरी आल्यावर  त्याने त्याच्या आजोबांनी वाजवलेली धून सर्वांना वाजवून दाखवली. मग वरद स्वतहूनच विविध गाणी बासरीवर वाजवू लागला होता. त्याची आत्या शास्त्राrय संगीत गायिका. तिच्या सांगण्यानुसार वरद आणि त्याचे बाबा बासरी वादक सुनीलकांत गुप्ता यांना भेटायला गेले.

वरद कल्याणला राहत होता. सुभेदारवाड्य़ातील गणेशोत्सवात श्रीधर फडके यांचा ‘गीत रामायणा’चा कार्यक्रमात होता. तिथून वरदचे घर अगदी जवळ होते. श्रीधरजींना घरी येण्याची विनंती वरदच्या बाबांनी केली. वरदचे बासरी वादन ऐकून श्रीधर फडके यांनी त्याच्या वडिलांना मुंबईत वरदला घेऊन या, असे सांगितले. मुंबईला आल्यावर श्रीधरजींनी सुचवल्याप्रमाणे सुप्रसिद्ध बासरी वादक रमाकांत पाटील यांच्याकडे दर रविवारी कल्याण ते वरळी असा प्रवास करून वरद बासरी शिकायला येऊ  लागला. तेव्हा वरद फक्त साडेपाच वर्षांचा होता. त्यानंतर पंडित मल्हार कुलकर्णी यांच्याकडे वरद बासरी शिकत होता.

1998 पासून विविध वाद्यवृंदांतूनही वरद आपली बासरी वादनाची कला सादर करू लागला. नववीमध्ये असतानाच लखनऊ येथे होणाऱया राष्ट्रीय स्तरावरील बासरी वादन स्पर्धेत वरद प्रथम आला. 2004 नंतर आजपर्यंत तो पंडित रूपक कुलकर्णी यांच्याकडे बासरी वादनाचे शिक्षण घेत आहे. मुंबईत स्थायिक झाल्यावर कमलेश भडकमकर याच्याशी वरदची ओळख झाली.  ‘सा…रे…ग…म…प…लिटिल  चॅम्प्स’ आणि ई-टीव्ही मराठीच्या ‘माझे जीवनगाणे’ या कार्पामातून त्याचे बासरी वादन प्रेक्षकांपर्यंत पोहोचले.

‘गौरव महाराष्ट्राचा’ या रिआलिटी शोमध्येदेखील तो बासरी वादनासाठी होता. मग पुढे अजय-अतुल यांच्या कॉन्सर्टमधून तो बासरी वाजवायचा. चित्रपट क्षेत्राचं  नवं दालन त्याच्यासाठी खुलं झालं होतं. ‘बालगंधर्व’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘सैराट’, ‘चंद्रमुखी’, ‘मी वसंतराव’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘मानापमान’ अशा अनेक चित्रपटांतील गाण्यांसाठी आणि पार्श्वसंगीतासाठी वरदने बासरी वाजवली आहे. ‘सिंघम’, ‘तानाजी’, ‘पानिपत’, ‘धडक’, ‘झीरो’, ‘पीके’ अशा हिंदी चित्रपटांसाठीदेखील त्याने बासरी वादन केले आहे. ‘म्युझिक का महामुकाबला’, ‘इंडियन आयडाल’, ‘सा…रे…ग…म…’, ‘सूर नवा ध्यास नवा’ अशा कार्पामांतून त्याला ओळख मिळत गेली. आकाशवाणीचासुद्धा तो मान्यताप्राप्त कलाकार आहे .

वरदची जेव्हा सुधीर फडके यांच्याशी भेट झाली होती तेव्हा त्याच्या वडिलांना सुधीर फडके यांनी सांगितले होते की, तुम्ही वरदला गाण्याच्या क्लासला पाठवा. जोपर्यंत तो ‘आतून’ गाणार नाही  तोपर्यंत त्याची बासरी गाणार नाही. बाबूजींचे हे वाक्य वरदच्या मनात कायमचे ठसले. रियाजाला रिप्लेसमेंट नसते. त्यामुळे रियाज ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, असे तो सांगतो. अमेरिका, बँकॉक, दुबई, कुवेत, आफ्रिका अशा परदेश दौऱयातदेखील त्याने आपल्या बासरी वादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. पन्नालाल घोष स्मृती पुरस्कार, ठाण्यातील इंद्रधनु संस्थेचा युवोन्मेष पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा तो मानकरी ठरला आहे. उस्ताद झाकीर हुसेन, बप्पी लाहिरी, सलीम-सुलेमान, शंकर -एहसान-लॉय अशा अनेक मान्यवरांच्या कार्पामांतून आपल्या बासरीचा प्रभाव निर्माण करणाऱया वरदने खूप लोकप्रियता मिळवली आहे.

[email protected]