>> वर्षा चोपडे
रघुराजपूर हे पुरी जिह्यातील एक हेरिटेज क्राफ्ट व्हिलेज. 2000 मध्ये संशोधन आणि दस्तऐवजीकरण प्रकल्पानंतर, ओडिशाचे पहिले हेरिटेज गाव म्हणून या गावाचा विकास करण्यात आला. पट्टचित्र कलेचे उगमस्थान मानले जाणाऱया गावात पारंपरिक हस्तकलेशी निगडित अनेक गोष्टी बघायला मिळतात.
हिंदुस्थान विविधतेने नटलेला देश आहे आणि या देशातल्या ओडिशा राज्यावर कलिंगाचे प्राचीन राज्य होते, ज्यावर मौर्य सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 261 मध्ये आक्रमण केले होते, ज्याचा परिणाम कलिंग युद्धात झाला होता. ओडिशाच्या आधुनिक सीमांचे सीमांकन ब्रिटिश भारतीय सरकारने केले होते, ओरिसा प्रांताची स्थापना 1 एप्रिल 1936 रोजी करण्यात आली होती. असे हे ऐतिहासिक प्राचीन ओडिशा राज्य कला आणि संस्कृतीचे माहेरघर आहे.
जगन्नाथ पुरी, भुवनेश्वर, चिलिका लेक, कोणार्क सूर्यमंदिर, गोपालपूर, हिराकूड डॅम, भीतर्कनिक नॅशनल पार्क आणि इतर अनेक पर्यटनस्थळे ओडिशाच्या सौंदर्यात भर घालतात. ओडिशा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, पण जगन्नाथपुरी आणि सूर्यमंदिरासाठी ओडिशा जगभर प्रसिद्ध आहे. जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील विष्णूचे रूप असलेल्या जगन्नाथ देवाला समर्पित मंदिर आहे. स्थानिक दंतकथा या मूर्तींचा संबंध आदिवासी जमातींशी जोडतात आणि दैतपती (सेवक) आदिवासींचे वंशज असल्याचा दावा करतात. पौराणिक कथांनुसार, पहिल्या जगन्नाथ मंदिराचे बांधकाम महाभारत आणि पुराणांमध्ये उल्लेखित मालव राजा इंद्रद्युम्न याने केले होते. हे मंदिर वार्षिक रथयात्रा किंवा रथोत्सवासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये तीन प्रमुख देवता भगवान जगन्नाथ, बलराम, सुभद्रा मोठय़ा आणि विस्तृतपणे सजवलेल्या रथांवर ओढल्या जातात. ही पूजा भिल, साबर आदिवासी पुजारी, तसेच मंदिरातील इतर समाजाचे पुजारी करतात.असे म्हणतात की, भगवान कृष्णाचे हृदय येथील कडुनिंबाच्या लाकडाच्या मूर्तीत आहे आणि लाकडाने बनवलेल्या सामग्रीमुळे हृदयाला नुकसान होऊ नये, म्हणून दर सात वर्षांनी ते बदलावे लागते. त्याचे इतरही काही कारण असावे, पण मूर्ती बदलली जाते. हे मंदिर सर्व हिंदूंसाठी आणि विशेषत वैष्णव परंपरेतील लोकांसाठी पवित्र आहे. चैतन्य महाप्रभू पुरीमध्ये अनेक वर्षे वास्तव्य करत होते.
याच मंदिरापासून चौदा किलोमीटर अंतरावर रघुराजपूर हे गाव आहे. रघुराजपूर हे पुरी जिह्यातील एक हेरिटेज क्राफ्ट व्हिलेज आहे. 2000 मध्ये, INTACH द्वारे दोन वर्षांच्या संशोधन आणि दस्तऐवजीकरण प्रकल्पानंतर ओडिशाचे पहिले हेरिटेज गाव म्हणून विकसित करण्यासाठी आणि हेरिटेज क्राफ्ट व्हिलेज म्हणून विकसित करण्यासाठी निवड करण्यात आली. हस्तकला गुरू डॉ. जगन्नाथ महापात्रा एक प्रमुख पट्टचित्र कलाकार यांचे जन्मस्थान आहे आणि त्यांनी पट्टचित्र कला आणि रघुराजपूर गावाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.
तीर्थक्षेत्र पुरी येथे भरणाऱया वार्षिक रथयात्रा उत्सवा दरम्यान भगवान जगन्नाथाच्या सिंहासनाखाली आणि तीन रथांवर वापरल्या जाणाऱया पाटस नावाच्या पारंपरिक सजावटीचे एकमेव ठिकाण असण्याचाही या गावाला मान आहे. याव्यतिरिक्त, गावात तुसार पेंटिंग, पाम लीफ कोरीविंग, दगडी कोरीव काम, लाकूड कोरीव काम, गोबर खेळणी, पेपियर-मॅश खेळणी आणि मुखवटे यांसारख्या हस्तकलेचे कामही घरोघरी चालते.
नारळ, ताड, आंबा आणि फणसाच्या झाडांमध्ये वसलेल्या या मुख्य गावात दोन रस्त्यांचा समावेश आहे. 120 हून अधिक घरे आहेत. त्यापैकी बहुतेक भित्तीचित्रांनी सजलेली आहेत. येथे चित्रकार राहतात आणि त्यांच्या पट्टचित्राचा सराव करतात. याशिवाय इतरही अनेक गोष्टी सर्वत्र प्रचलित आहेत. पारंपरिक मुखवटे, दगडी शिल्पे, पेपियर माश, शिल्पे आणि लाकडी खेळणी, देवता भुसुनी, राधामोहन, गोपीनाथ, रघुनाथ, लक्ष्मीनारायण आणि गौरांगासह विविध हिंदू देवतांना समर्पित चित्रेही फार प्रसिद्ध आहेत. पट्टचित्रे पट्टा किंवा वाळलेल्या खजुराच्या पानावर ओळखल्या जाणाऱया कापडाच्या तुकडय़ावर बनवल्या जातात. ज्याला प्रथम खडू आणि डिंकाच्या मिश्रणाने रंगवले जाते. तयार केलेल्या पृष्ठभागावर विविध देवी, देवता आणि पौराणिक देखावे यांची रंगीत आणि गुंतागुंतीची रेखाचित्रे फुले, झाडे आणि प्राणी यांच्या सजावटीने रंगवली आहेत. टसर साडय़ांवरील चित्रे, विशेषतः मथुरा विजय, रासलीला आणि अयोध्या विजय यांचे चित्रण करणाऱया संबळपुरी साडय़ा, ‘रघुराजापूर पट्टचित्र पेंटिंग’मधून चित्रित केल्या जातात. या चित्रकला डोळ्याचे पारणे फेडतात. जगन्नाथ पुरीला गेलात तर या कलेचे माहेर असलेल्या गावाला नक्की भेट द्या.
[email protected]
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)