जागर – वणव्याने हादरली महासत्ता

>> रंगनाथ कोकणे

एकीकडे रशियावर तेल आणि वायूच्या निर्यातीबाबत निर्बंध लादून आपले ‘महासत्तापण’ टिकवू पाहणाऱ्या आणि पर्यावरणीय नियमांना कचऱ्याची टोपली दाखवणाऱ्या अमेरिकेला कॅलिफोर्नियातील जंगलात पेटलेल्या वणव्याने भयभीत करून सोडले आहे. मुळात या आगीची तीव्रता का वाढली आणि ती आतापर्यंत आटोक्यात का येत नाहीये, याची मीमांसा करणेही तितकेच गरजेचे आहे.

कॅलिफोर्नियाच्या जंगलात धुमसत असणाऱ्या वणव्याला लॉस एंजेलिसच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि विनाशकारी आग म्हणून पाहिले जात आहे. वेगाने वाहणारे वारे आणि अग्निज्वालांच्या भक्ष्यस्थानी पडणाऱ्या विविध गोष्टी पाहता हा एखादा अग्नि प्रलय आहे की काय असे भासते. अलीकडच्या काळात जगभरामध्ये जंगलात वणवे पेटण्याच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. 2019 मध्ये जगातील सर्वात मोठे जंगल आणि पृथ्वीचे फुप्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅमेझॉनच्या पर्जन्यवनात अशाच प्रकारचा भयंकर वणवा पसरला होता. या जंगलामध्ये दहा हजारांहून अधिक जागी आगी लागल्या होत्या आणि या वणव्यात हजारो पक्षी, प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती जळून खाक झाले. अ‍ॅमेझॉनप्रमाणेच कॅलिफोर्निया हे जंगलांमधील वणव्याचे आधुनिक काळातील भेसूर आणि भेदक उदाहरण म्हणावे लागेल.

लॉस एंजेलिसमधील आग अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक फटका देणारी ठरत आहे. लॉस एंजेलिसच्या आगीत अनेक सेलिब्रिटींच्या घरांची हानी झाली आहे. यात हॉलीवूडचा कलाकार मेल गिब्सन, लॅटन मीस्टर आणि अ‍ॅडम ब्रोडी यांचा समावेश आहे. आगीचे तांडव सुरू झाले तेव्हा ही सर्व मंडळी गोल्डन ग्लोब पुरस्कार वितरण सोहळ्यात मग्न होती. शिवाय मॉडेल आणि अभिनेत्री पारिस हिल्टनचे घरदेखील जळून खाक झाले आहे.

या आगीत हजारो एकर जमीन भस्मसात झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे युद्धपातळीवर प्रयत्न करूनही आणि स्त्रोत उपलब्ध असतानाही आगीचे रौद्र रूप कमी होताना दिसत नाहीये. मुळात या आगीची तीव्रता का वाढली आणि ती आतापर्यंत आटोक्यात का येत नाहीये, याची मीमांसा आता सुरू झाली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियाचा भाग हा अत्यंत शुष्क असल्यामुळे आगीची व्याप्ती वेगाने वाढत गेली. जानेवारीच्या प्रारंभी दक्षिण कॅलिफोर्नियाच्या बहुतांश भागात मातीवरच्या आर्द्रतेचा स्तर दोन टक्के एवढा नीचांकी पातळीवर आला. कॅलिफोर्नियात ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडतो. परंतु यंदाच्या वर्षी तेथे पाऊस खूपच कमी पडला. त्यामुळे या क्षेत्रातील नैसर्गिक जलस्त्रोतही आटले. गरम हवा आणि कोरडय़ा वातावरणात बाष्पीभवनामुळे रोपटय़ांतील आणि मातीतील पाण्याचे प्रमाण आणखीच कमी झाले. परिणामी, हिरव्यागार वनस्पतींमुळे असणारा जंगलातला एकंदरीतच ओलसरपणा कमी झाला आणि आग वेगाने पसरण्याला वाव मिळाला. या आगीचे दूरगामी परिणाम अमेरिकेला भोगावे लागणार आहेत. आगामी काळात कॅलिफोर्नियात दुष्काळ पडू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

10 जानेवारीपर्यंत या आगीमुळे अनेक शाळांसह हजारो घरे आणि अन्य पायाभूत सुविधांची राखरांगोळी झाली. 1 लाख 80 हजारांहून अधिक नागरिकांना घर सोडण्याची वेळ आली. याशिवाय अनेक भागांतील नागरिकांना विजेविना रहावे लागत आहे. शक्तिशाली सांता एना वाऱ्याने लॉस एंजेलिसमधील आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.  सांता एना वारे कोरडे आणि शक्तिशाली असून ते पर्वतरांगातून दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याकडे वाहतात. कॅलिफोर्नियात एका वर्षात सरासरी 10 वेळा सांता एना वारे वाहण्याची नोंद होते आणि ते साधारणपणे पानगळीच्या हंगामापासून ते जानेवारीपर्यंत वाहत असतात. या काळात वातावरणात आतासारखी परिस्थिती निर्माण होते. तेव्हा वाऱ्यामुळे जंगलांमध्ये आग भडकण्याचा धोका निर्माण होतो. सामान्यत वेगाने वाहणाऱ्या या कोरड्या वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर इतका असतो.  मात्र या वेळी जानेवारीत प्रारंभी वाऱ्याची गती ही 80 किलोमीटर प्रती तास इतकी म्हणजेच दुप्पट नोंदवली गेली आहे.

साधारणत 7 जानेवारीच्या पूर्वी कॅलिफोर्नियाच्या जंगलात आगीची ठिणगी पडली असे सांगण्यात येते. तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. यात लॉस एंजेलिस काऊंटीत 40 हजारांहून अधिक एकरचा भाग जळाला आहे. आतापर्यंत तीन मोठय़ा आगीत लॉस एंजेलिसमध्ये 12 हजारांहून अधिक इमारती नष्ट झाल्या आहेत. हर्स्ट, ईटन, हॉलीवूड हिल्स, पॅलिसेड्स या भागांत आगीच्या घटना घडल्या आहेत. सर्वाधिक नुकसान सँट मोनिका आणि मेलिबी यादरम्यानच्या पॅसेफिक पॅलिसेड्स भागांत झाले आहे. या ठिकाणी आतापर्यंत 24 हजार एकरचे क्षेत्र नष्ट झाले असून त्यात 5300 पेक्षा अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. पॅलिसेड्स येथे अग्निशमन दलाच्या हजारो कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करत जवळपास 13 टक्के क्षेत्रावरील आग नियंत्रणात आणली. वाऱ्यामुळे हा अग्नी आता पूर्वेकडे वळत आहे आणि त्यामुळे शेजारच्या ब्रॅटवूडवर सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. याशिवाय अल्टाडेना आणि पॅसाडेनादरम्यान भडकलेल्या ईटन आगीनेही हाहाकार माजविला आहे.

कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. पाण्याचा साठा कमी असल्याने लॉस एंजेलिसमधील आग कशा रीतीने पसरली आणि त्यावर नियंत्रण मिळवताना किती नुकसान झाले, याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. अग्निशमन दलाच्या पथकात पाणीपुरवठ्याचा अभाव आणि सेंटा यनेज धरण देखभालीसाठी बंद असल्याच्या कारणांचा तपास केला जात आहे. विशेष म्हणजे सेंटा यनेजच्या राखीव साठय़ातही पाणी नसल्याचे उघडकीस आले आहे. येत्या काही दिवसांत वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून ही आग पूर्वेकडे पसरण्याचा धोका आहे. सखल भागात वाऱ्यांचा वेग 80 किलोमीटर प्रती तास, तर पर्वतीय भागात त्याचा वेग 113 किलोमीटर प्रती तास राहू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

एकीकडे रशियावर तेल आणि वायूच्या निर्यातीबाबत निर्बंध लादून आपले ‘महासत्तापण’ टिकवू पाहणाऱ्या आणि पर्यावरणीय नियमांना कचऱ्याची टोपली दाखवणाऱ्या अमेरिकेला कॅलिफोर्नियातील जंगलात पेटलेल्या वणव्याने भयभीत करून सोडले आहे. महत्त्वाचे म्हणजे हिवाळ्यात हा वणवा भडकला आहे. कॅलिफोर्नियात या ऋतूमध्ये सहसा वणवा पेटत नाही, पण वीज वाहून नेणाऱ्या उच्च क्षमतेच्या विजेच्या तारा आणि सोसाटय़ाचा वारा यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता आहे. आगीमुळे भस्मसात झालेल्या भौतिक गोष्टी विज्ञान-तंत्रज्ञानाने काही महिन्यांत पुन्हा उभ्या राहतीलही, परंतु वनसंपदेची, पशूसंपदेची झालेली हानी कधीच भरून निघणार नाही. याचे जागतिक हवामानावरही अत्यंत प्रतिकूल परिणाम होणार आहेत.

वनसंपदेचा नाश म्हणजे पृथ्वीवरील मानवजातीला बसलेला मोठा तडाखा आहे हे नीट समजून घेतले पाहिजे. आगीमुळे वनसंपदा नष्ट होण्याबरोबरच वन्यजीवांनाही प्रचंड धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन आणखी बिघडते. त्याचबरोबरीने अशा वणव्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर धूर होऊन हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण प्रचंड वाढते. सध्या लागलेल्या आगीमुळे कार्बन मोनॉक्साइड हा घातक वायूही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. हे सर्व परिणाम विचारात घेता या आगीमुळे आपली किती हानी झाली आहे, हे लक्षात येते. वनसंपदेची हानी आर्थिक स्वरूपात मोजली जात नसल्याने तिची तीव्रता आपल्या लक्षातच येत नाही. जलवायू परिवर्तनाचे धोके सौम्य करण्यात ही जंगले मोठी भूमिका बजावतात. कारण दरवर्षी लाखो टन कार्बन जंगले शोषून घेतात. परंतु जेव्हा झाडे तोडली जातात किंवा जळतात, तेव्हा त्यांच्या आत साठलेला कार्बन वातावरणात मिसळतो. जंगलांना लागणाऱ्या आगी आणि वितळत चाललेल्या हिमनद्या हे जगापुढील प्रमुख धोके आहेत. आपल्या समृद्ध पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने कोणत्या ना कोणत्या कारणाने नष्ट होत चालली आहेत, हे खूप दुर्दैवी आहे आणि भविष्यासाठी ती धोक्याची घंटाही आहे.

जगाच्या पाठीवरील काही मोजके नैसर्गिक स्रोतच आज शिल्लक आहेत आणि तेच या पृथ्वीवरील पर्यावरणाचे संतुलन साधतात. या नैसर्गिक स्रोतांचे कोणत्याही कारणांनी नुकसान झाले तर होणाऱ्या भयंकर परिणामांची आपल्याला कल्पनासुद्धा करता येणार नाही, परंतु आर्थिक प्रगतीच्या वेडाने झपाटलेल्या जगाला त्याचे सोयरसुतक उरलेले नाही, याहून मोठे दुर्दैव नाही. आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे म्हणतात ते हेच!

(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत)