मागील काही वर्षांपासून ईव्हीएम यंत्रणा पूर्णपणे वादाच्या आणि संशयाच्या भोवऱयात सापडली आहे. ‘ईव्हीएम घोटाळा’ हा गेल्या दहा वर्षांत प्रत्येक निवडणुकीतील कळीचा मुद्दा बनला आहे. या घोटाळ्याच्या अनेक बाजूंवर प्रकाशही टाकण्यात आला आहे. ईव्हीएम हॅक होते इथपासून त्यात मतांची छेडछाड करता येते का, इथपर्यंत अनेक विषय वेळोवेळी चव्हाटय़ावर आले आहेत. मात्र अलीकडे हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळी यासंदर्भात एक नवीन पैलू समोर आणला गेला. तो म्हणजे ईव्हीएमच्या बॅटरींचा. त्या किती टक्के ‘चार्ज’ होत्या, त्यांचे चार्जिंग कमी-अधिक होण्याचा परिणाम झालेल्या मतदानावर झाला का, असे आक्षेप घेतले गेले. त्याअनुषंगाने आता महाराष्ट्र-झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विरोधी पक्षांनी सजग राहायला हवे.
ईव्हीएमची बॅटरी आणि चार्जिंग हे तपासण्याचा एक साधा मार्ग पुढीलप्रमाणे सुचविण्यात आला आहे. दहा ईव्हीएम मशीन घ्या. त्यांच्या वापरलेल्या बॅटरीज बदलून नवीन बॅटरीज बसवा. साधारण दहा हजार मतदान होईल या पद्धतीने त्या संपूर्ण चार्ज करून ठेवा. त्या ईव्हीएम मशीनवर दहा हजार वेळा बटन दाबा आणि त्याअनुषंगाने बॅटरींचे ‘चार्जिंग’ किती राहते, म्हणजे 100 टक्क्यांवरून ते किती खाली घसरते याचा अंदाज घ्या. याच पद्धतीने 50 हजार मतदान झाले तर ईव्हीएमची बॅटरी किती डाऊन होते याचाही अंदाज घेता येईल. त्यावरून हरयाणामध्ये बदललेल्या नवीन ‘ईव्हीएम बॅटरी’ या ‘फ्रॉड’ होत्या की नव्हत्या, हे समजू शकेल.
‘इंडिया आघाडी’ने यादृष्टीने कटाक्षाने लक्ष ठेवण्याची गरज आहे. ईव्हीएम मशीनचा ‘बॅटरी फ्रॉड’ रोखण्यासाठी प्रत्येक ईव्हीएम मशीनला नवीन 100 टक्के ‘चार्ज’ बॅटरीच बसविण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करायला हवी.