
>> डॉ. जयदेवी पवार
1901 ते 1927 या काळात जन्मलेल्या पिढीला द ग्रेटेस्ट जनरेशन असे म्हटले गेले. त्यानंतर द सायलेंट जनरेशन, बेबी बूम जनरेशन, जनरेशन एक्स, वाय, झेड असे करत 2010 ते 2024 या काळातील जनरेशन अल्फा अवतरली. आता 2025 पासून 2039 पर्यंतच्या काळात जन्माला येणाऱया पिढीला जनरेशन बीटा अर्थात जेन बीटा असे म्हटले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात एआयच्या युगात जन्मलेली ही पहिली पिढी असेल. 2035 पर्यंत ही पिढी जागतिक लोकसंख्येच्या 16 टक्के भाग असेल असे मानण्यात येते. कशी असणार आहे ही जनरेशन? त्यांच्यापुढील आव्हाने कोणती असतील? त्यांच्या संगोपनासाठी पालकांपुढे कोणती आव्हाने असतील?
मानवाच्या प्रत्येक पिढीचा स्वतःचा एक वेगळा ठसा असतो. वेळ, समाज व्यवस्था, तंत्रज्ञान आणि जगातील घडामोडींमुळे प्रत्येक पिढीची वैशिष्ट्ये बदलत जातात. वेगवेगळ्या कालखंडात जन्मलेल्या लोकसमूहांना विशिष्टय़ नावे दिली जातात, जसे की बेबी बूमर्स, जनरेशन एस, मिलेनियल्स, जनरेशन झेड इत्यादी. प्रत्येक पिढीची ओळख त्या काळातील तंत्रज्ञानावर आधारित असते. उदाहरणार्थ, जनरेशन झेड ही इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या युगात वाढलेली आहे. या मालिकेत आता 1 जानेवारीपासून अल्फाला मागे टाकत ‘जेन बीटा’ दाखल झाले आहे. नवी पिढी जुन्या पिढीच्या तुलनेत कितपत वैशिष्टय़पूर्ण आहे, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. 31 डिसेंबर 2024 च्या रात्री न्यू जनरेशनच्या खुर्चीवरून जेन अल्फाला उतरविले आणि 1 जानेवारी 2025 मध्ये ‘जेन बीटा’ला विराजमान करण्यात आले. काही मंडळी यासंदर्भात संभ्रमित आहेत. जेन बीटा ही एक प्रकारे ‘हायपोथिसियल टेक्नोजनरेशन’ आहे. जेन अल्फादेखील कल्पना केलेली पिढी होती, असे मानण्यात येते.
जनरेशन बीटा ही पूर्णपणे सुपर टेक्नॉलॉजी युगावर स्वार आहे. त्यामुळे ही जनरेशन तंत्रज्ञानात इनोव्हेटेड लाईफ स्टाईलयुक्त असेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक, ऑगमेटेंड रिऍलिटी (एआर), व्हर्च्युअल रिऍलिटी (व्हीआर) आणि लाखो प्रकारचे स्मार्ट डिव्हाईस या गोष्टी नव्या पिढीच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असतील. विचार करणे, समजून घेणे, वर्तन करणे आणि सर्वंकष जीवन जगण्याच्या सर्व प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करणारी ही कदाचित पहिलीच पिढी असेल. साहजिकच जनरेशन बिटासाठी पारंपरिक शिक्षण पद्धती दुय्यम ठरेल. त्याऐवजी व्हीआर, एआर आणि जनरेटिव्ह एआयद्वारे शिकवले जाणारे शिक्षण महत्त्वाचे ठरेल. शिक्षकांऐवजी एआयआधारित स्मार्ट टय़ूटर शिकवणाऱया प्रणाली अस्तित्वात येतील. ज्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतांनुसार अभ्यासक्रम तयार करतील. या पिढीसाठी नोकऱया आणि व्यवसायांचे स्वरूपही पूर्णपणे बदललेले असेल. ऑटोमेशनमुळे अनेक पारंपरिक नोकऱया नष्ट होण्याची शक्यता असली तरी नव्या कौशल्यांसाठी भरपूर संधी असतील. डेटा सायन्स, रोबोटिक्स, पर्यावरणशास्त्र आणि डिजिटल मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होतील.
हायपर कनेक्टेड जनरेशन
जेन बीटा ही संपूर्ण जगाशी एकाच वेळी फिजिकली आणि व्हर्च्युअली कनेक्टेड असेल. मात्र यात अडचण म्हणजे वास्तव जग आणि आभासी जग या दोहोंकडे जेन बीटा एकाच वेळी एकाच नजरेने पाहणारी आहे. त्यामुळे या दोन्हींमध्ये त्यांना फार फरक करता येणार नाही. कदाचित यामुळे ही जनरेशन दोन्हींमध्ये सहजपणे सामावून जाणारी ठरू शकते. त्याचबरोबर बीटा जनरेशनची ओळख ही एखाद्या संस्कृतीच्या भागापुरती मर्यादित न राहता ती मल्टीकल्चरल म्हणजेच बहुसांस्कृतिकतावादी पिढी असेल. इंटरनेट आणि ग्लोबलायझेशनमुळे ही पिढी जुन्या पिढीच्या तुलनेत सांस्कृतिक वैविध्यता अधिक प्रमाणात जोपासणारी व सर्वंकष विचारांसह नावारूपास येईल. त्यामुळे आपली संस्कृती आणि इतरांची संस्कृती यामध्ये फरक करणे जेन बीटाला कठीण ठरू शकते. आजवरच्या पिढय़ांना हा फरक किंवा विभागणी सहजगत्या लक्षात आली. या जनरेशनमधील तरुण पिढी त्यांच्या गाण्यात पहिली पसंती अमेरिका आणि आफ्रिकन रॅपला देऊ शकतात. याउलट अमेरिकी तरुणांच्या आवडीच्या खाद्यपदार्थात जिलेबीसारख्या भारतीय पदार्थांचा समावेश होऊ शकतो. कारण बीटा जनरेशनमध्ये पूर्वीसारखा सांस्कृतिक भेदभाव असणार नाही.
पालकांसमोरील आव्हाने
तंत्रज्ञानावर आधारित जीवनशैलीचे वाढते प्रस्थ पाहता या नव्या पिढीतील मुलांचे पालकत्व वाटते तेवढे सोपे राहणार नाही. जेन बीटाच्या काळातील मुलांचा सांभाळ आणि संगोपन करताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण ही मुले तुलनेने अधिक स्मार्ट आणि बुद्धिमान असतील. तरीही त्यांना आयुष्यातील अनेक गोष्टींशी ताळमेळ बसविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी पालकांची जबाबदारी वाढू शकते. त्यांना स्वतःलाच अपडेट रहावे लागेल आणि पालकत्वाची नवीन शैली अंगीकारावी लागेल. या मुलांत सर्वंकष विकास (शारीरिक, मानसिक, भावनात्मक, सामाजिक विकास) चांगल्या रीतीने होण्यासाठी पालकांना त्यांच्याशी ताळमेळ बसविणे गरजेचे आहे. यात क्रीन टाईममधील समतोल राखण्यावर भर देणे, त्यांच्या कौशल्याला वाव देणे, मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे, सायबर सुरक्षेची माहिती देणे या गोष्टींच्या माध्यमातून पालकांना जेन बीटाच्या पिढीची जडणघडण करावी लागणार आहे. एआय युगातील या पिढीला सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वापरातील धोक्यांचाही सामना करावा लागू शकतो. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर आणि व्यक्तिमत्त्वावर होऊ शकतो. अशा वेळी पालकांनी आपली आधारवडाची भूमिका बजावत या नव्या पिढीला सुरक्षिततेचे कवच देणेही आव्हानात्मक असेल.
एकंदरीत सरकार, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांसह पालक व एकूण समाजानेच या नव्या पिढीसाठी आवश्यक ते बदल आतापासूनच आखायला हवेत. भविष्यातील जगासाठी ही पिढी कशी घडेल, यावरच समाजाच्या पुढील प्रगतीचा वेग ठरेल.
जनरेशनमधील फरक
सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाचा विकास, जीवनशैली, कामकाज, विचारसरणी आणि भविष्यवेधी दृष्टिकोनाला बीटा जनरेशनच्या माध्यमातून पाहण्याचा आहे. दुसऱया शब्दांत सांगायचे झाल्यास बीटा जनरेशन म्हणजे समाजशास्त्राrय दृष्टिकोनातून एका ठरावीक काळात जन्मलेल्या लोकांच्या माध्यमातून जगाला पाहण्याची एक दृष्टी होय. पिढ्यांच्या वर्गीकरणाची सुरुवात विसाव्या शतकातच झाली आहे. तत्कालीन काळात नव्या पिढीला हिप्पी किंवा यिप्पीज या रूपातून ओळखले जायचे. वास्तविक खऱया अर्थाने 1980 च्या दशकापासून काल्पनिक पिढीची प्रथा सुरू झाली. त्या-त्या कालावधीत जन्मलेल्या लोकांचे सामूहिक अनुभव, मूल्य, सांस्कृतिक प्रभावांवर हे वर्गीकरण आधारित असते. यानुसार 1901 ते 1927 या काळात जन्मलेल्या पिढीला द ग्रेटेस्ट जनरेशन असे म्हटले गेले. त्यानंतर द सायलेंट जनरेशन, बेबी बूम जनरेशन, जनरेशन एक्स, वाय, झेड असे करत 2010 ते 2024 या काळातील जनरेशन अल्फा अवतरली आणि आता ‘जेन बीटा’ अवतरली आहे. जनरेशन बीटा हा आपल्या विकसित होत असलेल्या जगाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे.