>> डॉ. समिरा गुजर जोशी
दसरा व दिवाळी हे सण आपण रामायणाशी जोडतो. दसऱ्याला रामाने रावणाचा वध केला. त्या विजयाचा दिवस म्हणून विजयादशमी आपण साजरी करतो. रावणवध करून लक्ष्मण आणि सीतेसह परतलेल्या विजयी श्रीरामांचे अयोध्यावासीयांनी दिवे उजळून, रांगोळ्या घालून स्वागत केले अशी लोककथा दिवाळीशी जोडली गेली आहे. रामायणात अर्थातच थेटपणे दसरा किंवा दिवाळीचा उल्लेख नाही. पण शरद ऋतू आणि हेमंत ऋतू, ज्या ऋतूंमध्ये आपण दसरा व दिवाळी साजरी करतो, त्यांचे वर्णन मात्र नक्की आहे. आज ज्या प्रथा, रीतिरिवाज आपण पाळतो त्याचे रामायणातील वर्णनाशी असलेले साधर्म्य चकित करणारे आहे.
रामायणात शरद ऋतू आणि हेमंताचे वर्णन वेगवेगळ्या ठिकाणी आले आहे. शरद ऋतू म्हणजे जेव्हा आपण हे शारदीय नवरात्र साजरे केले तो काळ. त्याचे वर्णन करताना रामाने आवर्जून उल्लेख केला आहे तो पिकांचा. श्रीराम म्हणतात, इंद्राने वर्षाव करून पृथ्वीला तृप्त केले आहे आणि धान्य पिकवून तो कृतार्थ झाला आहे. दिवाळी व दसरा हे सण शेतीचा हंगाम उत्तम झाला, सुगी छान झाली या आनंदाप्रीत्यर्थ साजरे करायचे सण आहेत. ऋतुपातील या कालखंडाचे हे वैशिष्ट्य इथेही अधोरेखित होते.
श्रीराम पुढे म्हणतात, गर्जना करणारे मेघही पर्वतांवर, वनराजीवर आणि नगरांवर पावसाचा वर्षाव करून आता शांत झाले आहेत. शरद ऋतूची जी वैशिष्टय़े मानली जातात, त्यांचे फार बारकाईने वर्णन वाल्मिकींनी केले आहे. निसर्गाशी सुसंवाद असल्यामुळे कोणत्या ऋतूत कोणत्या फुलांना बहर असतो, कोणते वृक्ष फळे धरतात या सगळ्याची माहिती रामायणासारख्या महाकाव्यातून सहजपणे मिळते. या काळात जलाशयातून कमळे फुललेली दिसतात. त्यामुळे हंस, सारस, पावाक यांसारखे पक्षी आनंदित होऊन तिथे गर्दी करतात. नव्या धान्यावर ताव मारून सारस पक्ष्यांचा थवा उडाला की, असे वाटते कोणीतरी वाऱ्यावर पुष्पमाला उधळून दिली आहे. मोरांचा केकारव आणि बेडकांचे डराव डराव मात्र आता थांबले आहे. मेघांच्या गर्जना आता ऐकू येत नाहीत. पाण्याचे प्रवाह आता शांत, तृप्त वाहत आहेत. पावसाळ्यात सुरू झालेला खळखळाट आता मंदावला आहे. रात्री आता चांदण्याने खुलल्या आहेत. जणू चंद्रमुखी रात्रीने चांदण्याचा शालू परिधान केला आहे. आता सगळ्यांना हिंडण्या, फिरण्याला वाव मिळाला आहे. त्याचा परिणाम असा की, इतके दिवस बिळात लपलेले रंगीबेरंगी सापही आता बाहेर आले आहेत, पण पावसाळ्यात उपास झाल्यामुळे बिचारे कृश दिसत आहेत. निसर्गातील किती बारकावे त्यांनी या वर्णनात टिपले आहेत. त्यात पुन: पुन्हा उल्लेख आला आहे तो सप्तच्छद नावाच्या झाडाचा. हा सप्तच्छद वृक्ष म्हणजे सातपर्णीचे झाड. त्याला सातविणीचं झाड म्हणतात. गुलमोहर, बहावा या झाडांच्या बरोबरीनेच सातपर्णीची झाडे रस्त्याच्या कडेला आजही अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. या झाडाला सात पानांचा झुबका येतो म्हणून त्याला सातपर्णी म्हणतात. त्याला शरद ऋतूमध्ये फुले येतात. ही फुलं कशी पानांच्या आड दडल्यामुळे पटकन दिसत नाहीत. त्यांचा सुगंध मात्र दूरवर जाणवतो. त्यामुळेच भ्रमर या झाडांभोवती गुंजारव करत असतात. हा सुगंध वाऱ्यावर पसरून मदमस्त हत्तींनाही आकर्षित करतो. अशा प्रकारचे वर्णन वाल्मिकी रामायणात आले आहे.
दसऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सीमोल्लंघन. पाऊस थांबून हवा स्वच्छ झाली आहे. प्रवासासाठी रस्ते खुले झाले आहेत. अशा काळात पूर्वी आपले वीर मोहिमांची आखणी करायचे. शरद ऋतू संपून हेमंत ऋतू येत असताना जो काळ आहे त्याचे वर्णन प्रभू श्रीरामांनी अरण्यकांडात केले आहे. या काळात थंडी वाढू लागली आहे. त्यामुळे दव अधिक प्रमाणात पडते आहे. थंडीमुळे लोकांची त्वचा खडबडीत झाली आहे. भूमी मात्र धान्यराशींनी संपन्न आहे. नवान्न भक्षण करण्याकरिता लोक आग्रायण नावाची पूजा करत आहेत. सर्वत्र अन्नाची समृद्धी असून दूध, दुभत्याची चंगळ आहे. लोकांनी देवांना आणि पितरांनाही संतर्पण केले आहे. विजयेच्छु राजे स्वारी करण्यासाठी तयार आहेत. म्हणजेच ते आता सीमोल्लंघन करणार आहेत.
या ठिकाणी नवान्न अर्थात नवीन धान्याचा उल्लेख आहे. आग्रायण या विधीचे स्वरूपही देवतांना नवीन आलेल्या पिकाचा नैवेद्य दाखवणे असेच आहे. आपण नवरात्रीच्या पूजेत परडीत अंकुर जोपासतो आणि ते दसऱ्याला देवीला अर्पण करतो. दसऱ्याला गावाच्या सीमेपर्यंत गेलेले सैन्याचे शिलेदार प्रतीकात्मक असे एखादे कणीस तोडून आणत असत. दसऱ्याला नवीन धान्याच्या लोंब्या पूजेत ठेवल्या जातात. म्हणजे प्रथा थोड्या बदलल्या असल्या तरी त्यामागचा विचार फारसा बदलला नाही आहे. पितरांचे स्मरण या काळात केले आहे. आपण पितृपक्षात पितरांचे असेच स्मरण करतो. आपण आज पालन करतो त्या प्रथा किती प्राचीन आहेत हे यानिमित्ताने लक्षात येते.
कोणत्याही वर्णनाला भावनिक कलाटणी देऊन कथानकाशी जोडून घेणे हे वाल्मिकींच्या शैलीचे वैशिष्टय़ आहे. या दिवसात वाढू लागलेल्या थंडीचा उल्लेख होतो आणि लक्ष्मण सहज बोलून जातो, श्रीरामा, तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे भरत अयोध्येचे राज्य सांभाळत तापसी जीवन जगत आहे. त्याला अनुसरून तो राजमहालात स्नान न करता नदीवर आंघोळीला येत असणार. बिचारा कुडकुडत असेल नाही? अशा सहज झालेल्या आठवणीने राम, सीता, लक्ष्मण सगळेच व्याकूळ होतात. रामायण आपल्याला ‘आपले’ वाटते ते अशा खास वाल्मिकी टचमुळे! यामुळेच ते अतिशय खरे, जिवंत वाटू लागते.
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)