लेख – रसाळांना पुरस्कार : अकादमीची प्रतिमा वाढली!

>> अनिरुद्ध प्रभू

पुरस्कारासाठी सरांचे अभिनंदन करताना दोन गोष्टी नमूद करायलाच हव्यात, एक म्हणजे सरांना अकादमी मिळाल्यामुळे सरांचा बहुमान झाला असे नाही. मुळात त्यांना हा पुरस्कार आधीच मिळायला हवा होता. उलट आता अकादमीची शोभा आणि प्रतिमा वाढली आहे हे खरं! दुसरे सरांना अकादमी मिळणे हे साहित्य अकादमीचे एक अर्थी सुटका आणि एक अर्थी उदारीकरण (liberalization) आहे हेही खरं 

प्रथेप्रमाणे साहित्य अकादमीने सगळय़ा भारतीय भाषांमधल्या साहित्य अकादमी पुरस्कार 2024 ची घोषणा बुधवारी केली. मराठी भाषेसाठी हा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर झाला व मराठी साहित्य विश्वातून आनंद व्यक्त झाला. अनेक लेखक, वाचकांनी समाज माध्यमांवर व्यक्त होत आनंद साजरा केला. इतर वेळेस असे पुरस्कार ही खासगी स्वरूपाची मिळकत असते किंवा मानली जाते, पण यावेळेस अनेकांनी हा पुरस्कार मराठी साहित्याचा मान असल्याचे जाहीररीत्या मांडले जे एका अर्थी नवीन, वेगळे आणि स्वागतार्ह आहे. यानिमित्ताने थोडे महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे वळायला हवे, पुरस्कार त्याचसाठी असतात!

मराठी भाषेतल्या वाचकांचा एकूण टक्का हा पाचपेक्षा जास्त नाही. आकडा म्हणून लक्षणीय असला तरीही जे वाचले जाते त्याचा दर्जा आणि एकूण वाचनाची संस्कृती बघता ठरावीक विषय जसे की, सेल्फ हेल्प, काही सर्वमुख असलेल्या कादंबऱ्या, निवडक लेखक आणि प्रचारकी साहित्य वगळता त्यात नोंद घ्यावे असे काहीच नाही. तरीही आपण असे म्हणू की पाचपैकी एक म्हणजे जवळपास 20 टक्के वाचक हे सजग वाचक आहेत, तो आकडाही मोठा आहे. या आकड्य़ाला आपण डॉ. सुधीर रसाळ कोण असे विचारले तर काय उत्तर येईल? पाच हजारपेक्षा जास्त लोक काही माहिती सांगू शकतील हे पटणारे नाही, ही वस्तुस्थिती नुसती वाईट नाही तर लाज आणणारी आहे.

याला प्रत्युत्तर असे येऊच शकते की, याआधीच्या अकादमी विजेत्यांमधल्या किती लोकांबाबत वाचक काही सांगू शकतील? आपण मागचे संदर्भ सोडू, पण गेल्या 18 किंवा 20 वर्षांत अकादमी मिळालेल्या लोकांपैकी मोजून पाच-सहा लोक वगळता उरलेले (त्यांना साहित्यिक म्हणावे, लेखक म्हणावे की अजून काही हा वादाचा मुद्दा आहेच) दर्जा, आशय, मांडणी आणि प्रतिभा या मुद्दय़ांवर नव्हे तर एक विशिष्ट गट आणि त्यांचा प्रमुख यांच्याशी नाळ जोडलेले आहेत म्हणून मोठे झालेले किंवा केलेले आहेत याबाबत सजग वाचकांना असहमती असण्याचे काही कारण नाही. ज्या व्यक्तीने समीक्षेची समीक्षा कशी असावी, कविता आणि तिच्यातल्या प्रतिमा यांची मांडणी व विश्लेषण तसेच पृथक्करण सैद्धांतिक आणि पायाभूत पातळीवर केले, मराठी भाषेच्या विकासासाठी आणि आता संवर्धनासाठी नेमकी मांडणी केली त्यांची आणि फक्त कुठेतरी मराठीचे प्राध्यापक किंवा लेखक आहेत तसेच एका गटाचे होयबा आहेत अशांची तुलना एका पुरस्काराच्या मिळण्याने करावी का? ती करावी लागते हे मराठी साहित्याचे दुर्दैव आहे. याचे कारण चांगले पोहोचत नाही, पण सुमार असलेले उर बडवून बडवून आपले खोटे नाणे चालवून घेते हे वैश्विक सत्य आहे.

साधारणतः ज्याचे कार्य ठाऊक असते त्याला पुरस्कार मिळतात किंवा पुरस्कार मिळाल्याने कार्य ठाऊक होते. डॉ. सुधीर रसाळ सरांबाबत असे स्पष्ट ठरवणे जरा कठीण आहे. अर्थात, त्यामागे त्यांचा विषय हा मुद्दा आहेच. समीक्षा आणि साहित्य संस्कृती हा विषय जड असला तरी जनसामान्यांच्या नजरेतून मूल्यहीन किंवा टाकाऊ नाही, पण विषयाच्या प्रतिमेमुळे अर्थातच वाचकांची संख्या कमी होते. ती मर्यादा आहेच. याउलट त्या विषयाशी संबंधित असलेल्या लोकांत, जगात सरांच्या ज्येष्ठत्व आणि अधिकारी असण्याबाबत दुमत नसले तरीही त्यांच्याविषयी इतर अनेक व्यक्तिविशेष लोकांपेक्षा अत्यंत तुरळक व त्रोटक लिहिले, बोलले, व्यक्त केले जाते. काही विशिष्ट गटांच्या मक्तेदारीत मराठी साहित्य विश्व अडकले असल्याने कदाचित हे होत असावे. मराठी साहित्य विश्वात अनेक गट-तट आहेत. प्रवाह आहेत. मात्र रसाळ सरांना अशा कुठल्याही बाजूत ठेवता येत नाही.

साधारणतः पुरस्कार मिळाल्यावर लिहिल्या जाणाऱ्या लेखात व्यक्तिविशेष चरित्र लिहिण्याची प्रमाण पद्धत आहे. सरांच्या कार्याविषयी, मांडणीविषयी इथे लिहिलेले नाही. हा लेख तसा घेतलेला नाही याचे कारण शेवटी स्पष्ट करायला हवे. सरांना अकादमी मिळाला म्हणून सरांची पुस्तके (मुख्य विषयाची – समीक्षेची, इतर नव्हेत) वाचली जातील असे अजिबातच नाही, परंतु त्यानिमित्ताने मराठीतले एक मोठे, पण झाकोळलेले व्यक्तिमत्त्व समोर येईल. त्यांच्यावर आणि त्यांच्या मांडणीचे बोलले जाईल, अल्पकाळ का असेना! दुसरे असे साहित्यातल्या राजकारणावर उघडपणे बोलले जाईल. जी आजची गरज आहे.

डॉ. सुधीर रसाळ या 90 वर्षांच्या ज्येष्ठाला साहित्य अकादमी मिळाला म्हणून सामान्य वाचक जे थोड्य़ाबहुत प्रमाणात साहित्य विश्वाशी संबंधित आहे ते का खूश होत आहेत? या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याने शोधायला हवे. कफ़ील आज़र अमरोहवी म्हणतो तसे बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी! ते होईल अशी आशा आहे. पुरस्कारासाठी सरांचे अभिनंदन करताना दोन गोष्टी नमूद करायलाच हव्यात, एक म्हणजे सरांना अकादमी मिळाल्यामुळे सरांचा बहुमान झाला असे नाही. मुळात त्यांना हा पुरस्कार आधीच मिळायला हवा होता. उलट आता अकादमीची शोभा आणि प्रतिमा वाढली आहे हे खरं! दुसरे सरांना अकादमी मिळणे हे साहित्य अकादमीचे एक अर्थी सुटका आणि एक अर्थी उदारीकरण (liberalization) आहे हेही खरं!

साहित्य अकादमी पुरस्कार मराठीसाठी डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर केल्याबद्दल साहित्य अकादमीचे अभिनंदन आणि तो स्वीकारल्याबद्दल रसाळ सरांचे आभार!

[email protected]