साहित्य जगत- पुस्तकातले मनमोहन सिंग

>> रविप्रकाश कुलकर्णी

काही कळत नाही, कळायला मार्ग नाही पण एकेक गोष्टी झपाटय़ाने मागे पडायला लागल्या आहेत. जणू होत्याचे नव्हते. स्मरण – विस्मरणात काय शिल्लक राहिले?

डॉ. मनमोहनसिग यांची आठवण अशीच सांदीकोपऱयात पडून गेली. मनमोहन सिंग गेल्याची बातमी आली (जन्म ः26 सप्टेंबर 1932. मृत्यू ः26 डिसेंबर 2024) आणि त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आठवू लागल्या. ते ठसठशीतपणे ठसले पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कारकिर्दीत अर्थमंत्री असताना. आपली जागतिक पत इतकी ढासळली होती की रिझर्व्ह बँकेला 47 टन सोने जागतिक बँकेकडे गहाण ठेवावे लागले होते. अशावेळी मनमोहन सिंग यांनी आपल्या धोरणाने या संकटावर मात केली शिवाय हे सर्व गहाण पडलेले सोने सोडवून आणले. ही गोष्ट चमत्कार वाटावा अशीच होती. त्यावेळी त्यांचे आलेले फोटो पाहताना एकदम लक्षात आले अरे, या माणसाला आपण भेटलेलो आहोत. आठवताना लक्षात आले मुंबईतील फोर्टमध्ये भटकंती करत असताना शानबाग यांच्या स्टॅन्ड बुक स्टॉलवर वेगवेगळी पुस्तके हाताळण्याचे सुख काही वेगळेच. शिवाय पुस्तक विकत घेण्याची सक्ती नाही. तर अशाच एका दुपारी तिथे गेलो असताना शानबाग यांना विचारले की मागे मी सांगितलेले पुस्तक आले का? तेव्हा ते म्हणाले, ‘एकच कॉपी आलेली आहे,’ असे म्हणत शानबाग यांनी समोर बघितले. एक सरदारजी तेच पुस्तक चाळत होते. तेव्हा मनाने कौल दिला, आता पुस्तक गेले आणि तसेच झाले. मात्र पुढे येऊन मी त्या सरदारजींना म्हटले,

‘मी हे पुस्तक पाहू शकतो का?’

‘व्हाय नॉट?’ असे म्हणून त्यानी ते पुस्तक मला दिले. तोपर्यंत ते शानबाग यांच्याशी बोलत राहिले. नंतर मी आभार मानून ते पुस्तक त्यांना दिले. तेव्हा ते म्हणाले, ‘तुम्हा तरुणांना अजून मुल्क राज आनंद मध्ये इंटरेस्ट आहे?’ मुल्क राज आनंद यांच्या लेखनापेक्षा त्यांचे व्यक्तिमत्व कसे भन्नाट आहे याबद्दल मी सांगत राहिलो. मग ते पुस्तक घेऊन सरदारजी निघून गेले. त्यांचे नाव विचारण्याचेही माझ्या लक्षात आले नाही. ते गेल्यानंतर मी शानबागांना विचारले, ‘कोण हे सरदारजी?’ तेव्हा शानबाग म्हणाले, ‘हे रिझर्व बँकेचे गव्हर्नर आहेत.’

संवाद इथे संपला. पुढे वर सांगितलेल्या हकीगतीत मंत्री महोदय यांचा फोटो बघितला तेव्हा लक्षात आले स्टॅन्डमध्ये भेटलेले ते हेच सरदारजी मनमोहन सिंग! पुढे कळले मुळातच हा विद्वान माणूस आहे. मुल्क राज आनंद यांच्याबद्दल त्यांना आस्था असण्याचे कारण असे की त्यांनी सिंग यांची जवाहरलाल नेहरूंशी पहिल्यांदा गाठभेट घालून दिली होती.

मनमोहन सिंग पंतप्रधान झाले ते अनपेक्षितपणे आणि तसे अपघातानेच. सोनिया गांधी यांचे प्रस्थ इतके वाढले की आता त्याच पंतप्रधान होणार अशी लक्षणे दिसू लागली. पण सोनिया यांनी चाणाक्षपणे या गोष्टीला नकार देऊन मनमोहन सिंग यांचे नाव पुढे केले. म्हणूनच खुद्द सिंग यांनी आपण
अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर आहोत असे म्हटले होते. मात्र पुढे त्यांच्या कारकिर्दीबद्दल संजय बारू यांनी पुस्तक लिहिले. त्याचे नाव त्यांनी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर‘ असे ठेवले. तेव्हा भल्याभल्यांनी म्हटले की, बारू याने किती नेमकेपणाने सिंग यांचे वर्णन केलेले आहे. सांगायचा मुद्दा खुद्द मनमोहन सिंग स्वतःकडे किती तटस्थपणे पाहू शकत होते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

मनमोहन सिंग यांचे वेगळे दर्शन झाले ते त्यांच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकात. सिंग यांना तीन मुली. उपिंदर, दमन आणि धाकटी अमरीत. दमन सिंगचे पुस्तक आहे ‘स्ट्रिक्टली पर्सनल ः मनमोहन अॅण्ड गुरू शरण’ यामध्ये तिन्ही मुलींच्या बाबतीत वडील म्हणून मनमोहन सिंग कसे वेगळे वागले त्याचे वर्णन आहे. थोरली उपिंदर हिने कॉलेजमध्ये इतिहास हा विषय घेतल्यानंतर या विषयाला स्कोप नाही म्हणून मनमोहन केवळ नाराजच झाले नाहीत तर त्यामुळे घरातले वातावरण तंग झाले. त्यामुळे उपिंदर मनमोहन जे सांगतील त्याच्या उलट वागायला लागली. दमनने खानदानी विषय म्हणजे-गणित निवडला खरा पण नंतर तिने आणंद येथील इन्स्टिटय़ूट फॉर रुरल मॅनेजमेंटमध्ये वेगळाच कोर्स केला आणि नंतर ती मिझोराम सारख्या दुर्गम प्रदेशात काम करायला लागली. तेव्हा आपली मुलगी नेमके काय करते हे जाणून घेण्यापेक्षा मनमोहन फक्त कसे काळजीच करत हा अनुभव तिने लिहिलेला आहे. मात्र अमरीतने मनमोहन यांच्याप्रमाणे अर्थशास्त्रात प्राविण्य मिळवले मात्र त्यानंतर तिने कायद्यात प्राविण्य मिळवले. तेव्हा मनमोहन, ‘हे काय चाललंय हेच मला समजत नाही.’ असे म्हणून हैराण झालेले मनमोहन सिंग वेगळेच दिसतात… मात्र दमन सिंग म्हणते, ‘उपिंदरने जी बंडखोरी केली, व्यक्ती स्वातंत्र्याकरता लढा दिला त्यामुळेच मला व अमरीतला हवे ते करायला स्वातंत्र्य मिळाले.’

आज उपिंदर प्राचीन भारतीय इतिहासाबाबत मान्यवर इतिहासकार म्हणून ओळखली जाते. तिनेच मनमोहन सिंग यांना मुखाग्नी दिला हेही वेगळेपण. असे पुस्तकात सापडणारे मनमोहन सिंग एकदा शोधायला हवेत.