
<<< प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे >>>
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास होता की, जनतेच्या कल्याणासाठी संसदीय लोकशाहीनिष्ठ राज्यपद्धती अतिशय उपयोगाची असते. ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाहीनिष्ठ राज्यपद्धती प्रचलित होती. ब्रिटनमध्ये राज्यकारभार करणारे सरकार संसदीय लोकशाही पद्धतीप्रमाणे दरवेळी काही ठरावीक काळानंतर निवडून आलेल्या पक्षाचे बनत होते. अशा प्रकारे अस्तित्वात येणारे ब्रिटनचे सरकार आपल्या साम्राज्यांतर्गत असलेल्या हिंदुस्थानातही संसदीय लोकशाहीनिष्ठ राज्यपद्धती प्रचलित करण्याचा प्रयत्न करीत होते. म्हणून लोकशाहीप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते की, हिंदुस्थानातील जनतेचे कल्याण संसदीय लोकशाही प्रणालीनेच होऊ शकेल.
संसदीय लोकशाही प्रणालीवर निष्ठा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र भारताचे पहिले विधिमंत्रीपद आणि राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद मोठ्या आदराने व सन्मानाने देण्यात आले. त्यांनी दोन्ही पदे संस्मरणीय कर्तबगारीने उत्तम सांभाळली. ते आपल्या थोर कर्तृत्वाने स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार आणि महान घटनाकार म्हणून कीर्तिमान झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीय मतदारांना एक महत्त्वाचा सिद्धांत दिला. ‘एक व्यक्ती एक मत म्हणजे एक मत एक मूल्य’ असा तो सिद्धांत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील संसदीय लोकशाही प्रणाली यशस्वी होण्यासाठी ‘एक व्यक्ती एक मत म्हणजे एक मत एक मूल्य’ या सिद्धांताचे जागरूकतेने आणि यथायोग्य विचाराने पालन होणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संसदीय लोकशाही प्रणाली अतिशय प्रिय होती, म्हणूनच ते एकपक्षीय हुकुमशाही म्हणजेच कामगारांना मान्य असलेल्या साम्यवादाचा आणि साम्यवादी राज्यप्रणाली असलेल्या साम्यवादी रशिया व चीन या राष्ट्रांचा कठोरपणे विरोध करीत होते.
दि. 20 नोव्हेंबर 1956 रोजी काठमांडू येथे दिलेल्या भाषणात त्यांनी खालीलप्रमाणे उद्गार काढले… ‘‘कम्युनिस्टांना मान्य असणारी कामगारांची हुकूमशाही धोकादायक आहे. मुळात कोणतीही हुकूमशाही धोकादायक असते. ‘कामगारांच्या हुकूमशाहीचा शेवट काय?’ या प्रश्नाचे निश्चित उत्तर साम्यवाद्यांकडून मिळत नाही. ‘जर कामगारांची हुकूमशाही अयशस्वी झाली तर काय घडेल? जर अशी परिस्थिती कम्युनिस्ट रशियात निर्माण झाली तर तेथे काय घडेल ?’ या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘‘मी जे पाहतो आहे, त्याप्रमाणे रशियन लोक राज्याची मालमत्ता बळकावण्यासाठी आपापसात रक्तपात, युद्ध करीत राहतील.’’
डॉ. बाबासाहेबांची ती भविष्यवाणी जवळ जवळ 35 वर्षांनी म्हणजे 25 डिसेंबर 1991 रोजी तंतोतंत खरी ठरली. त्या दिवशी रशियातील कामगारांची हुकूमशाही म्हणजे साम्यवादी पक्षाची एकपक्षीय हुकूमशाही कोलमडून पडली आणि अराजकतासदृश परिस्थिती निर्माण झाली. रशियाच्या ताब्यात असलेले अनेक युरोपियन देश स्वतंत्र झाले आणि त्यांचे रूपांतर सार्वभौम राष्ट्रांमध्ये झाले. अजूनही चेचेन्यासारखे काही देश स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र बनण्यासाठी रशियांतर्गत युद्धसदृश कृती करीत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संसदीय लोकशाहीवर खूप निष्ठा होती. लोकशाहीच्या विकासासाठी खालील सात गोष्टींची आवश्यकता असते, असे त्यांचे म्हणणे आहे. 1. लोकशाहीच्या विकासासाठी सर्वप्रथम समतेची आवश्यकता असते. 2. लोकशाही यशस्वी होण्यासाठी मजबूत विरोधी पक्ष असला पाहिजे. 3. लोकशाहीच्या विकासासाठी कायदा आणि प्रशासन सर्वांसाठी समान असले पाहिजे. 4. लोकशाहीच्या विकासासाठी घटनात्मक नीतिमत्तेची आवश्यकता असते. 5. लोकशाहीच्या विकासासाठी बहुसंख्याकांचे अल्पसंख्याकांवर राज्य नसावे. बहुसंख्याकांनी आपल्या बहुमताच्या जोरावर अल्पसंख्याकांना डावलून चालू नये. त्यांच्या मतांचा आदर करावा. अल्पसंख्याकांनीही आपले मत व्यक्त करीत असताना सनदशीर मार्गाचा अवलंब करावा. केवळ विरोधासाठी विरोध न करता तत्त्वासाठी विरोध केला पाहिजे. 6. लोकशाहीच्या विकासासाठी नागरिक नीतिमान असले पाहिजेत. कायदे व्यक्तींच्या बाह्यांगांचे नियंत्रण करतात. नीतिमान व्यक्तीच्या आंतर अंगाला व बाह्य अंगाला, दोन्हीला नियंत्रित करते. लोक नीतिमान असतील तर कायद्याची कमीत कमी गरज पडते. मात्र लोक नीतिमान नसतील तर कायदे कितीही केले तरी अंमल मात्र कमीत कमी होईल. नीतीमुळे कायद्यांचे पालन होण्यास मदत होते. 7. सदसद्विवेक बुद्धी (Public Coscience) ही लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक असते. अन्याय आणि अत्याचार, मग कोणावरही कोणाकडूनही होवो, तो दूर करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक सदसद्विवेक बुद्धी म्हणजे सर्व अन्यायाविरुद्ध बंड करण्याची बुद्धी होय. आपण परराष्ट्रात होणाऱ्या अन्यायाबद्दल खूप बोलतो. मात्र आपल्याच देशात होणाऱ्या अन्यायाबद्दल गुपचूप बसतो. हे योग्य नाही.
(लेखक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणेचे कार्याध्यक्ष आहेत. )