तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना तरुणपिढीचे लक्ष वेगवेगळय़ा गोष्टीकडे आकर्षित होते. त्यातून ते आपले रोल मॉडेल बनवतात. चित्रपट कथा व कादंबरी यातील पात्र त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. तशीच काहीशी या कादंबरीतील नायिकेच्या प्रवासाची सुरुवात आहे.
प्राजक्ता कादंबरीतील मुख्य पात्र आहे. तिच्यावर प्रेमकथांचा पगडा आहे. तारुण्यसुलभ रम्य स्वप्न पाहणारी प्राजक्ता वैचारिक प्रगल्भतेतून घडत जाते. अगोदर अल्लडपणात घेतलेले निर्णय योग्य कसे हे ती सिद्ध करून दाखते. एकंदरीत उन्हाची सावली हा कादंबरीपट स्वप्न कर्तव्य, कदर, आदर व प्रेम या भावनांना अधोरेखित करतो. मातृत्व, पितृत्व व कर्तृत्व या आदर्शांना जपतो. बदलत्या जगाच्या बदलत्या संकल्पनांचा समतोल लेखाजोखा या कादंबरीत येतो. मर्यादा व संस्कृती याही पलीकडे जाऊन मानवता धर्माची शिकवण या कादंबरीत मिळते.
उन्हाची सावली
लेखिका ः आराधना कुलकर्णी
प्रकाशक ः साकेत प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठ संख्या ः 104
किंमत ः 150 रु.